Dancing Deer Viral Video: टाळ, मृदूंग, हरिनामाच्या जयघोषावर हरणाचा ठेका, कन्हैया आश्रमातल्या हरणाचा व्हिडीओ व्हायरल
Dancing Deer : हरिनामाच्या जयघोषात "रमणी" बेधुंद होऊन नाचत आहे.या रमणीचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आणि लोकांनीही प्रचंड आवडला.
अहमदनगर : हरिनामाच्या गजरात तल्लीन होऊन चक्क एका हरणाने ठेका धरला असं म्हंटलं तर कदाचित तुमचा विश्वास बसणार नाही, पण हे खरं आहे. मागच्या काही दिवसांपासून एका हरणाचा पाऊली खेळतांनाचा व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे.या हरणाचा एबीपी माझाने शोध घेतला अखेर त्या हरणाचा शोध घेण्यात यश आलं आहे. अहमदनगरच्या शेवगाव तालुक्यातील कन्हैया आश्रमातील हा व्हिडीओ आहे
अहमदनगरच्या शेवगाव तालुक्यातील कन्हैया आश्रमात "रमणी" नावाचं हे हरीण इथल्या बालगोपालांसह हरी नामाच्या गजरात पाऊली खेळते. हरिनामाच्या जयघोषात "रमणी" बेधुंद होऊन नाचत आहे.या रमणीचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आणि लोकांनीही प्रचंड आवडला. एवढंच काय तर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ट्विटरवरही या "रमणी"चा व्हिडीओ शेअर केला
अहमदनगरच्या शेवगाव तालुक्यातील बालमटाकळी येथील हा व्हिडीओ आहे. बालम टाकळी येथील ह.भ.प शीतलताई देशमुख यांच्या कन्हैया या आश्रमात हे हरीण दररोज ठेका धरतंय. दीड वर्षांपूर्वी जखमी अवस्थेत त्यांना हे हरीण मिळून आलं होतं. त्याच्यावर उपचार करून त्यांनी या हरणाला त्याच्या नैसर्गिक अधिवासात सोडून दिलं पण ते पुन्हा कन्हैया आश्रमात परतलं. वारंवार सोडून देऊनही हे हरीण काही जंगलात जायला तयार झालं नाही आणि याच परिसरात ते रमलं.
पाहा व्हिडीओ :
शीतल देशमुख यांच्या आश्रमात शिकण्यासाठी आलेल्या मुलांनी हरिपाठ किंवा मंत्रोच्चार सुरू केला की "रमणी" धावतच त्यांच्या जवळ येते आणि टाळ मृदुंगाच्या आवाजावर ठेका धरते .सुरुवातीला त्यांनी या हरणाचे नाव "श्रीराम" ठेवले होते पण हे हरीण मादी असल्याचे माहिती झाल्यावर त्यांनी त्याचे नाव "रमणी" ठेवले. कन्हैया आश्रमातील विद्यार्थ्यांकडून त्याला कोणतेही इजा पोहचली जात नाही किंवा "रमणी" देखील या चिमुकल्यांना इजा पोहचवत नाही. त्यांच्यात इतकी गट्टी झालीये की मुलांची चाहूल लागली की ते अगदी धावतच आश्रमात येत.
"रमणी" प्रमाणेच कन्हैया आश्रमात इतरही प्राण्यांची ये- जा असते. त्यात मुंगूस, मांजर एवढंच काय तर भला मोठा साप देखील आश्रमात येत जात असतो. ह भ प शीतलताई देशमुख या वन्य प्राण्यांना मारू नका असंच सर्वांना सांगत असतात. त्यांच्या आश्रमात आलेलं मुंगूस आणि मांजर हे एकाच ताटात दूध पितात त्याचाही व्हिडिओ त्यांनी बनवला आहे. मात्र "रमणी" आणि इतर प्राण्यांना जीव लावत असल्याने आजूबाजूच्या लोकांकडून त्रास होत असल्याचे शीतल यांचे वडील रतन देशमुख सांगतात.त्यामुळे वारंवार "रमणी" ला आम्ही जंगलात सोडतो पण ती पुन्हा माघारी येते त्यामुळे काय करणार आमचा नाइलाज होतो असं ते भावुक होऊन सांगतात.
शीतल देशमुख यांच्या आश्रमाच्या परिसरात एक गावरान गाय ही रस्ता चुकून आली, ही गाय नेमकी कुणाची याचा शोध त्यांनी घेतला. तिलाही त्यांनी नैसर्गिक अधिवासात सोडून दिले पण ती गाय देखील परत या आश्रमात येऊन थांबली...तीच नाव त्यांनी "लक्ष्मी" ठेवलं तिचाही सांभाळ देशमुख कुटुंबीय करत आहे