मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या एकत्रित दौऱ्यामुळे प्रशासनावर परिणाम होऊ शकतो - जयंत पाटील
Maharashtra Government : राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस लवकरच राज्याचा एकत्रित दौरा करणार असल्याची चर्चा आहे
Jayant Patil On Maharashtra Government : राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस लवकरच राज्याचा एकत्रित दौरा करणार असल्याची चर्चा आहे. यावर बोलताना राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी टीकास्त्र सोडलेय. ते म्हणाले की, 'मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना एकत्रित दौरा का करावा वाटतोय? हे माहिती नाही. पण, त्यांच्या एकत्रित दौऱ्यामुळे राज्याचे व्यवस्थापन आणि प्रशासनावर परिणाम होऊ शकतो. ' ते अहमदनगरमध्ये बोलत होते. यावेळी जयंत पाटील यांनी विविध विषयांवर प्रतिक्रिया दिली.
मंत्रिमंडळ विस्तार करणं हा मुख्यमंत्र्यांचा अधिकार आहे. मात्र, सध्या इतरांना विचारल्याशिवाय मुख्यमंत्र्यांना मंत्रिमंडळ विस्तार करता येत नाहीये. ही नवीनच परिस्थिती सध्या पाहायला मिळत आहे, असा टोला राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी मंत्रिमंडळ विस्तारावरून लगावला आहे. सोबतच मंत्रिमंडळ विस्तारात आपल्याला स्थान मिळते की नाही? यावरून शिंदे गटातील काही आमदारांमध्ये नाराजी असल्याच्या चर्चेबाबत बोलताना त्यांच्यात नाराजी आहे की नाही तो त्यांचा प्रश्न आहे, असं जयंत पाटील म्हणाले.
नुकसान पाहणी दौऱ्यादरम्यान राधाकृष्ण विखेंनी शरद पवारांवर टीका केली होती, त्यावर जयंत पाटील यांनी प्रत्युत्तर दिलं. भू-विकास बँकेचे अस्तित्वच सध्या राहिलेलं नाही, आमच्या सरकारच्या काळातच तो निर्णय झाला होता. पण शरद पवारांच्या मुळेच भारतातील स्वतंत्र्यांनंतरची सर्वात मोठी कर्जमाफी झाली होती. याबाबत राधाकृष्ण विखे पाटील यांनी काँग्रेसमध्ये असताना कौतुक केलं होतं. पण सध्या ते भाजपमध्ये गेलेत त्यामुळे ते शरद पवारांवर टीका करत असतील, असं जयंत पाटील म्हणाले.
महाराष्ट्रातील शेतकरी आज दिवाळी साजरी करू शकत नाही. राज्यात ओला दुष्काळ जाहीर करणं ही मुख्यमंत्र्यांकडून लोकांची अपेक्षा होती. मुख्यमंत्र्यांनी ओला दुष्काळ जाहीर केला नाही. त्यामुळे सर्वांच्याच उत्सवावर विरजन पडलं आहे. तर दुसरीकडे आनंदाचा शिधा देखील काही ठिकाणी वाटला गेलाय काही ठिकाणी नाही. महाराष्ट्रातील युवकांचा रोजगार हा फॉग्सवॅगन गेल्यामुळे बुडाला असल्याची टीका राष्ट्रवादीचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांनी केलीय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधला आणि सरकारने केलेल्या कामांचा पाढा वाचला, त्यावर जयंत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की, महाराष्ट्रातील सरकारी नोकऱ्याना आम्हीच मान्यता दिल्या होत्या. महाराष्ट्रामध्ये सरकारी नोकऱ्यांच्या पलीकडे ज्या खासगी नोकऱ्या निर्माण करण्याची खासगी गुंतवणूक आणून सरकारची जबाबदारी होती. त्यातला फॉग्सवॅगनसारखा मोठा प्रकल्प गेल्यामुळे महाराष्ट्राचं आणि बेरोजगार युवकांच प्रचंड मोठं नुकसान या सरकार ने केलं आहे. ते आता भरून निघेल असं मला वाटत नाही, असं ही जयंत पाटील म्हणाले.