(Source: Poll of Polls)
Raghuveer Khedkar on Gautami Patil: लोककलेची 'गौतमी पाटील' करू नका, अन्यथा महाराष्ट्राचा बिहार होईल; ज्येष्ठ तमाशा कलावंत रघुवीर खेडकर यांचा घणाघात
Raghuveer Khedkar on Gautami Patil: लोककलेची 'गौतमी पाटील' करू नका, अन्यथा महाराष्ट्राचा बिहार होईल, ज्येष्ठ तमाशा कलावंत रघुवीर खेडकर यांनी घणाघात केला आहे.
Raghuveer Khedkar on Gautami Patil: बऱ्याच गावात 100 कलाकार असलेल्या तमाशाला आयोजक दोन लाख रुपये द्यायला नकार देतात, तर दुसरीकडे गौतमी पाटीलच्या (Gautami Patil) कार्यक्रमाला पाच-पाच लाख रुपये देतात. यावरुनच लोककलेची 'गौतमी पाटील' करू नका, अन्यथा महाराष्ट्राचा (Maharashtra News) बिहार होईल, असं वक्तव्य ज्येष्ठ तमाशा कलावंत रघुवीर खेडकर (Raghuveer Khedkar) यांनी केलं आहे.
गेल्या काही दिवसांपासून गौतमी पाटील चर्चेत आहे. अनेक तरुणांच्या गळ्यातील ती ताईत आहे. गौतमी पाटील कार्यक्रम आणि तिचं नृत्य यावरुन टीकेचा सामनाही करावा लागला होता. गौतमीच्या मानधनावरून इंदोरीकर महाराजांनीही काही दिवसांपूर्वी टिप्पणी केली होती. अशातच आता ज्येष्ठ तमाशा कलावंत रघुवीर खेडकर यांनी केलेल्या वक्तव्यामुळे पुन्हा एकदा गौतमी पाटील चर्चेत आली आहे.
ज्येष्ठ तमाशा कलावंत रघुवीर खेडकर बोलताना म्हणाले की, "बऱ्याच गावचे लोक 100 कलाकार असलेल्या तमाशाला दोन लाख रुपये द्यायला तयार होत नाही आणि दुसरीकडे चार मुली अन् पाचवी गौतमी पाटील असलेल्या कार्यक्रमाला पाच-पाच लाख रुपये देतात, हे काय चाललंय...? लोककलेची गौतमी पाटील करू नका, अन्यथा महाराष्ट्र हा बिहार होईल."
"गौतमी पाटील ज्या पद्धतीनं अश्लील हातवारे करते, हे पाहण्यासाठी प्रेक्षक गर्दी करतात, मारामाऱ्या करतात कुठं घेऊन चाललोय आपण महाराष्ट्राला हे पाहायला हवं... पालकांनीही आपला पाल्य कुणाच्या कार्यक्रमाला चालला आहे, याकडे लक्ष दिलं पाहिजे, पुढाऱ्यांचे तर याकडे दुर्लक्षंच आहे.", असं म्हणत जेष्ठ तमाशा कलावंत रघुवीर खेडकर यांनी घणाघात केला.
खरंच गौतमी पाटीलला एका कार्यक्रमाचे 3 लाख मिळतात?
गौतमीच्या मानधनावरून इंदोरीकर महाराज यांनी केलेल्या टिप्पण्णीवर स्वतः गौतमीनंच खुलासा केला आहे. एबीपी माझाशी बोलताना गौतमीनं महाराजांचा कोणी तरी गैरसमज करून दिल्याचं सांगितलं. माझं मानधन नक्कीच तेवढं नाही, माझ्याबाबत सातत्यानं असे गैरसमज पसरवले जात असल्याचं तिनं सांगितलं. तीन गाण्याला तीन लाख मला कोण द्यायला लागलं आहे? असे सांगत इतके पैसे द्यायचे असतील तर ते एखाद्या अभिनेत्रीला देणार नाहीत का? असा सवाल देखील गौतमीनं केला आहे. माझ्याबद्दल रोज कोणीतरी अशा अफवा पसरवण्याचा प्रयत्न करत असतात. मात्र मला कोणाबद्दल काहीच आक्षेप नसून मला कोणत्या वादावर भाष्य देखील करायचं नाही, अशी समजुतीची भूमिका गौतमी पाटीलनं घेतली आहे.