Nitesh Rane : नितेश राणेंना वादग्रस्त वक्तव्य भोवण्याची चिन्हं, अहमदनगर, श्रीरामपूरमध्ये गुन्हा दाखल
Nitesh Rane : महंत रामगिरी महाराज यांच्या समर्थनार्थ सकल हिंदू समाजाच्या वतीने अहमदनगरमध्ये नितेश राणे यांच्या उपस्थितीत मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात नितेश राणेंनी वादग्रस्त वक्तव्य केलं होतं.
अहमदनगर : महंत रामगिरी महाराज (Ramgiri Maharaj) यांच्या समर्थनार्थ आणि बांगलादेशातील हिंदू अत्याचाराविरोधात सकल हिंदू समाजाच्या (Sakal Hindu Samaj) वतीने अहमदनगरमध्ये (Ahmednagar) भाजप आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांच्या उपस्थितीत रविवारी मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात नितेश राणे यांनी मुस्लिम समाजाविरोधात प्रक्षोभक भाषण करून धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी त्यांच्या विरोधात अहमदनगर (Ahmednagar) आणि श्रीरामपूरमध्ये (Shrirampur) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नितेश राणे यांनी मोर्चाच्या समारोपाच्या भाषणात मुस्लिम समाजाच्या धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे. यामुळे नितेश राणेंना वादग्रस्त वक्तव्य भोवणार असल्याची चिन्ह आहेत.
सिन्नर येथील प्रवचनात सराला बेटचे महंत रामगिरी महाराज यांनी मुस्लिम समाजाबद्दल केलेले वक्तव्य वादग्रस्त ठरले होते. त्यावरून मुस्लिम समाजाने त्यांच्याविरोधात ठिकठिकाणी मोर्चे काढले होते. त्यानंतर सकल हिंदू समाजाकडून रामगिरी महाराजांच्या समर्थनार्थ मोर्चे काढण्यात येत आहेत. रविवारी नगरला रामगिरी महाराजांच्या समर्थनार्थ मोर्चा काढण्यात आला. या मोर्चाच्या समारोपाप्रसंगी नितेश राणे यांनी आक्रमक भाषण करत मुस्लिम समाजाविषयी वादग्रस्त वक्तव्य केले होते. मी हिंदूंचा गब्बर असल्याचेही त्यांनी म्हटले होते.
अहमदनगर, श्रीरामपूरमध्ये गुन्हा दाखल
रविवारी मोर्चा संपल्यानंतर रात्रीच्या सुमारास मुस्लिम कार्यकर्ते मोठ्या संख्येने पोलीस अधीक्षक कार्यालयात जमा झाले होते. नितेश राणे यांच्याविरूद्ध आक्रमक झालेल्या कार्यकर्त्यांनी पोलीस अधीक्षकांची भेट घेऊन राणेंविरूद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. त्यानंतर रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला. अहमदनगर पाठोपाठ श्रीरामपूरमध्ये नितेश राणे यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे.
अहमदनगरमध्ये मुस्लिम समाजाच्या महिलांचा मोर्चा
दरम्यान, नितेश राणे यांच्या वादग्रस्त वक्तव्याच्या निषेधार्थ मुस्लिम समाजाच्या महिलांनी अहमदनगरमध्ये पोलीस अधीक्षक कार्यालयावर मोर्चा काढला. नितेश राणे यांना अटक करा, तसेच जिल्हा बंदी करण्याची मागणी यावेळी महिलांनी केली. शहर उपनगरातील मुकुंदनगर भागातून मोर्चा काढत पोलीस उपअधीक्षकांना याबाबत निवेदन देण्यात आले.
सुजय विखेंचा नितेश राणेंना घरचा आहेर
नितेश राणेंच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर माजी खासदार सुजय विखे पाटील यांनी त्यांना घरचा आहेर दिला. शिर्डीत कोणीही असुरक्षित नाही. या मतदारसंघात हिंदू-मुस्लिम ऐक्य आहे आणि ते कायम राहिले पाहिजे. अनेक वर्षापासून आपण एकोप्याने राहतो आहे. त्यामुळे जाती धर्म पाहून आम्ही काम करत नाही. जर कोणाला जातिवाद करायचा असेल तर आम्हाला सांगा. आम्ही सुद्धा अर्ज स्वीकारताना जात-धर्म पाहू. तीस वर्षात आम्ही कधीही जात विचारली नाही. मात्र हल्ली जातीचे विष पसरवणारे लोक जनतेला आता नकोय. मतदारसंघात जाती धर्मावरून तेढ निर्माण करत द्वेष पसरवला तर गाठ माझ्याशी आहे, असा इशारा सुजय विखे पाटील यांनी नितेश राणेंना दिला आहे.
आणखी वाचा
Nitesh Rane : 'मी हिंदूंचा गब्बर, चालायला लागलो तर लोकं दारं बंद करतात'; नितेश राणेंचं वक्तव्य