Rohit Pawar : भाजपसोबत गेल्याने राधाकृष्ण विखेंना व्हायरसची लागण; शरद पवारांवरील टीकेला रोहित पवारांचे प्रत्युत्तर
Rohit Pawar : महायुतीच्या सरकारची भूमिका लोकांना पटत नाही, त्यामुळे त्यांना आता राज्यभर मेळावे घ्यावेच लागतील असं राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार म्हणाले.
अहमदनगर: महायुतीच्या मेळाव्यादरम्यान राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांनी उद्धव ठाकरे आणि शरद पवारांचा विक्रम वेताळ असा उल्लेख केला होता. या टीकेला उत्तर देताना राधाकृष्ण विखे पाटील यांना भाजप सोबत गेल्याने व्हायरसची लागण झाली आहे असं प्रत्युत्तर रोहित पवारांनी (Rohit Pawar) दिलं आहे. ते जर खालच्या पातळीवर बोलत असेल तर आम्ही देखील पुढे काय करायचे ते ठरवू असा इशारा रोहित पवारांनी दिला आहे.
लोकसभेच्या पार्श्वभूमीवर महायुतीकडून राज्यभर मेळावे घेतले जात आहेत, त्यांना असे मेळावे घ्यावेच लागतील. कारण त्यांनी जी भूमिका घेतलेली आहे ती जनतेला पटलेली नाही. ती पटवून देण्याचा प्रयत्न ते महायुती मेळाव्याच्या माध्यमातून करत असल्याचं रोहित पवार यांनी म्हटलं. सोबतच लोकसभेच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीचे देखील मेळावे होतील असं त्यांनी सांगितलं.
शरद पवार गटातील सहा ते सात मोठे नेते अजित पवारांच्या गटात येणार असल्याचा दावा अमोल मिटकरी यांनी केला होता. यावर बोलताना अजित पवार गटाचेच काही नेते भाजपच्या संपर्कात आहेतच, त्यामुळे त्यांच्यासोबत त्यांचे नेते राहतील का हे पहावं लागेल, त्यांच्यातील बहुतांश लोकांना भाजपच्या चिन्हावर लढावं लागेल असं रोहित पवार यांनी म्हटलंय.
राज्यभर महायुतीचे मेळावे
आगामी लोकसभेच्या पार्श्वभूमीवर महायुतीच्या सरकारकडून राज्यभर मेळावे आयोजित करण्यात येत आहेत. त्यात अनेक ठिकाणी महायुतीच्या घटकपक्षांमध्ये अंतर्गत वाद असल्याचं दिसून येतंय. रविवारी झालेल्या मेळव्यात सांगलीमध्ये माजी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी भाजपवर नाराजी व्यक्त केली होती. लग्न आल्यावरच वाजंत्र्यांची आठवण येते का असा संतप्त सवाल त्यांनी विचारला होता. त्यानंतर गोपीचंद पडळकरांनीही लोकसभा निवडणुकीपर्यंत तरी एकमेकांशी गोड बोला असं वक्तव्य केलं होतं.
दुसरीकडे विदर्भात यवतमाळच्या मेळाव्यात खासदारकीच्या उमेदवारीवरून वाद निर्माण होत असल्याचं चित्र आहे. भावाना गवळी यांनी आपण खासदारकीची निवडणूक लढवणार असल्याचं जाहीर केलं आहे.
बीडमध्ये झालेल्या महायुतीच्या मेळाव्यामध्ये भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांचा फोटो पोस्टरवर नसल्याने मुंडे समर्थकांनी नाराजी व्यक्त केली. खासदार प्रीतम मुंडे यांनी त्यावर नाराजी व्यक्त केली आणि असा प्रकार पुन्हा होणार नाही याची खबरदारी घेण्याचं सांगितलं.
ही बातमी वाचा :