Prakash Ambedkar : जिन्नांच्या मजारीवर फुलं चढवल्याने पक्षातून काढले, आता भारतरत्न दिल्याने अडवाणी दोषमुक्त झाले का? प्रकाश आंबेडकरांची खोचक टीका
Ahmednagar News : लालकृष्ण अडवाणी यांना जाहीर झालेला भारतरत्न पुरस्कार म्हणजे एक प्रकारे फार्स आहे, अशी जोरदार टीका वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे.
Prakash Ambedkar अहमदनगर : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी आज (3 फेब्रुवारी) भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी (Lal Krishna Advani) यांना भारतरत्न देण्याची घोषणा केली. लालकृष्ण अडवाणी यांना जाहीर झालेला भारतरत्न पुरस्कार म्हणजे एक प्रकारे फार्स आहे, असे वक्तव्य वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी केले आहे.
लालकृष्ण अडवाणी यांनी पाकिस्तानमध्ये जाऊन त्यांनी मोहम्मद जिन्ना यांच्या मजारीवर फुलं चढवले तर त्यांना पक्षातून काढले,आता त्यांना भारतरत्न जाहीर केला म्हणजे ते दोष मुक्त झाले आहेत का? असा सवाल उपस्थित करत प्रकाश आंबेडकर यांनी जोरदार टीका भाजपवर केली आहे.
संपूर्ण सरकार अपयशी
उल्हासनगरमध्ये झालेल्या गोळीबार प्रकरणावर प्रकाश आंबेडकर म्हणाले की, केवळ गृहमंत्रीच नाही तर हे संपूर्ण सरकारच अपयशी ठरले आहे. या सरकारमध्ये आमदार राजे झाले आहेत. कारण त्यांना माहिती आहे की, हे सरकार आमदारांच्या भरोशावर चालत आहे. त्यामुळे त्यांना जसं पाहिजे तसं ते शासनाला झुकवतात. याबाबत एका कार्यक्रमात सोबत असल्यामुळे सकाळीच फडणवीस यांना मी बोललो त्यांनी कारवाईचे आदेश दिल्याचे म्हटलं. पण नेमके कोणते आदेश दिलेत हे मात्र मी विचारू शकलो नाही, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.
काही नेत्यांना मराठा - ओबीसीत तेढ निर्माण करायचीय
तसेच, काही ओबीसी नेत्यांना जाणीवपूर्वक मराठा-ओबीसी असा तेढ निर्माण करायचा आहे, असा खळबळजनक दावा प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे. ओबीसींच्या ज्या ज्या मेळाव्याला आपल्याला बोलवलं त्या मेळाव्याला गेलो आहे. ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का न लागता मराठा समाजाला आरक्षण कसे देता येईल या संदर्भाची भूमिका मी मांडली आहे. मागणी करण्याचा अधिकार सर्वांना आहे. शेवटी मागणी मान्य करण्याचा अधिकार सरकारचा आहे, असे देखील त्यांनी स्पष्ट केले आहे.
समाजात तेढ वाढवणे माझ्या दृष्टीने गुन्हा
आता दोन्ही समाजाने आरक्षणवाद्यांनाच मतदान करण्याची भूमिका घेतली आहे. पूर्वीपासून निजामी आणि श्रीमंत मराठ्यांकडेच सत्ता राहिली आहे. त्यांनी आपली संपत्ती ही गोरगरीब मराठ्यांच्या जोरावरती वाढवली आहे. स्वतःच्या फायद्यासाठी आणि राजकारणासाठी समाजामध्ये तेढ वाढवणे माझ्या दृष्टीने गुन्हा आहे, असेही प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले आहे.
आणखी वाचा