(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Ahmednagar News : काहीही झालं तर भाजपला दोषी ठरवायचं हे संजय राऊत यांनी बंद करायला हवं, राम शिंदे यांचा घणाघात
Ahmednagar News : भाजपचे आमदार राम शिंदे यांनी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे.
अहमदनगर : 'जो चुका करतो आणि चुका जोपर्यंत लोकांच्या निदर्शनास येत नाही, तोपर्यंत तो उजळ माथ्याने वावरत असतो. संजय राऊत (Sanjay Raut) यांनी देखील चूक केली, त्यामुळे त्यांना अटक झाली, जेलमध्ये जावं लागलं. यामध्ये सत्ताधारी पक्ष किंवा भाजप यांचा अन्याय अत्याचार करण्याचा कोणताही उद्देश नव्हता, हे संजय राऊत यांनी समजून घेतल पाहिजे. कुणाचंही काहीही झालं तर भाजपला दोषी ठरवायचं, हे आता संजय राऊत यांनी बंद करायला हवं, असं म्हणत भाजप प्रवक्ते राम शिंदे यांनी संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला.
अहमदनगरच्या छत्रपती चौथे शिवाजी महाराज स्मारक येथील शेतकऱ्यांच्या मुलांसाठी होत असलेल्या अभ्यासिकेच्या भूमिपूजन प्रसंगी ते बोलत होते. राम शिंदे (Ram Shinde) यावेळी म्हणाले की, देशद्रोहाचा कायदा रद्द केल्यानंतर खा. संजय राऊत यांनी सरकारवर टीका करताना 'देशद्रोहाचा कायदा रद्द केल्याचं फार कौतुक सांगू नका, तुम्ही ब्रिटिशांपेक्षाही भयंकर कायदे केलेत आणि विरोधकांना जेरीस आणण्यासाठी या कायद्यांचा वापर केला जातो' अशी टीका केली होती. याबाबत राम शिंदे यांना विचारले असता त्यांनी संजय राऊत यांच्यावर पलटवार केला आहे. जो चुका करतो आणि चुका जोपर्यंत लोकांच्या निदर्शनास येत नाही, तोपर्यंत तो उजळमाथ्याने वावरत असतो. संजय राऊत यांनी देखील चूक केली, ती त्यांना भोगावी लागल्याचे ते म्हणाले.
ते पुढे म्हणाले की, संजय राऊत ज्या महाविकास आघाडीचे (Mahavikas Aaghadi) प्रवक्ते म्हणून काम करत होते, त्या महाविकास आघाडीतील एक- एका पक्षाचे दोन - दोन तुकडे झालेत आणि ते केवळ आणि केवळ संजय राऊत यांच्यामुळे झाले आहेत. त्यामुळे आता तरी त्यांनी थांबण्याची गरज आहे, नाहीतर याच्यापुढेही यात काही भर पडेल की काय अशी शंका वाटते असं म्हणत भाजप आमदार राम शिंदे यांनी संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला.
तसेच राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक (Navab Malik) यांना जामीन मंजूर झाल्यावर मविआच्या नेत्यांनी 'उशिरा का होईना मलिक यांना न्याय मिळाला' असं म्हंटलं. राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी देखील ट्विट करत "उशिरा का होईना साहेब आपल्याला न्याय मिळाला, तब्येतीची काळजी घ्या, आणि एकाधिकारशाहीच्या विरोधात एकत्र लढूया! तब्येतीची काळजी घ्या!" अशी प्रतिक्रिया दिली. याबाबत बोलताना भाजप (BJP) आमदार राम शिंदे न्यायालयाच्या एखाद्या निकालावरती प्रतिक्रिया देणे योग्य नसल्याचे म्हटले आहे. एखाद्यावर झालेला आरोप, त्यानंतर झालेला जामीन ही एक प्रक्रिया आहे. लोकशाहीमध्ये सत्ताधारी पक्षाला विरोधक म्हणून काही लोक चुकीची काम करतात, त्यावर पांघरून कदापिही टाकता येणार नाही असं राम शिंदे म्हणाले. एखाद्यावर आरोप होतो आणि अनेक दिवस त्यांना जामीन होत नाही याचा अर्थ आरोपांमध्ये काही ना काही नक्की आहे असं वक्तव्य राम शिंदे यांनी केलं.
इतर संबंधित बातमी :