Ajit Pawar : पुण्यात कोसळलेल्या हेलिकॉप्टरचा अजित पवारांना धसका? ढगाळ वातावरणामुळे पायलटला म्हणाले, आपण कारनं.., कार्यक्रमात सांगितला किस्सा
Ajit Pawar : पुण्यातील बावधन बुद्रुक गावाच्या परिसरात बुधवारी सकाळी एक हेलिकॉप्टर कोसळल्याची दुर्घटना घडली होती. सुनील तटकरे यांना घेण्यासाठी हे हेलिकॉप्टर मुंबईत येणार होते.
अकोले : पुण्यातील बावधन बुद्रुक गावाच्या परिसरात बुधवारी सकाळी एक हेलिकॉप्टर कोसळल्याची दुर्घटना घडली. या दुर्घटनेत हेलिकॉप्टरमध्ये असणारे दोन वैमानिक आणि एका अभियंत्याचा जागीच मृत्यू झाला. अजित पवार गटाचे नेते सुनील तटकरे (Sunil Tatkare) यांना घेण्यासाठी हे हेलिकॉप्टर मुंबईत येणार होते. मात्र, त्यापूर्वीच अपघात घडला होता. यावरून उपमुख्यमंत्री अजित पवारांनी (Ajit Pawar) पायलट सोबतचा किस्सा कार्यक्रमात सांगितला आहे.
आज अहमदनगर जिल्ह्यातील अकोले (Akole) येथे अजित पवारांच्या राष्ट्रवादीची जनसन्मान यात्रा दाखल झाली. यावेळी अकोलेत अजित पवारांचे जोरदार स्वागत करण्यात आले. यानंतर जाहीर सभेत बोलताना अजित पवारांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केले.
अजित पवारांनी सांगितला किस्सा
अजित पवार म्हणाले की, सकाळी ढगाळ वातावरणामुळे हेलिकॉप्टर येऊ शकलं नाही. त्यामुळे मी बाय कार आलो. मी पायलटला म्हणालो आपण जाऊ. पण, गेल्याच आठवड्यात एक हेलिकॉप्टर पडलं. तिघं गेले, असं पायलटने सांगितले. त्यामुळे मी कारने आलो, असा किस्सा त्यांनी यावेळी सांगितला.
आदिवासी समाज खऱ्या अर्थानं निसर्गपुत्र
रानावनात राहणाऱ्या आदिवासींनी निसर्गाचं संरक्षण केलं. आदिवासींनी आपली लोककला देखील जिवंत ठेवली हे मी आज पाहिलं. आदिवासी समाजाने कधीच निसर्गाच्या विरुद्ध पाऊल टाकले नाही. निसर्गाचा समतोल राखण्याचं काम त्यांनी केलं. तेच खऱ्या अर्थानं निसर्गपुत्र आहेत. आदिवासी विभागातून त्यांना खूप मदत आजपर्यंत केली. दोन दिवसांपूर्वी एक घटना घडली. सर्वसाधारण सत्ताधारी आमदारांच्या काही विरोधकांनी मंत्रालयात आंदोलन केलं. मनाला वेदना झाल्या. त्यामुळे त्यानंतर बसेल त्यात तोडगा काढला. न्यायालयाच्या निर्णयावर अवलंबून यासंदर्भात निर्णय घेतले, असे त्यांनी यावेळी म्हटले.
अकोले तालुक्यासाठी भरघोस निधी
ते पुढे म्हणाले की, गेल्या पाच वर्षात तीनच वर्ष मला काम करायला मिळाले. या तीन वर्षात तुमच्या बहाद्दर आमदाराने माझ्या मागे लागून अकोले तालुक्यासाठी भरघोस निधी घेतला. आधीचे दोन वर्षे मिळाली असती तर अधिक काम करता आलं असतं. तिजोरीचा भार पाहून मला कामे करावे लागतात. केंद्रात नरेंद्र मोदींचे सरकार आले आहे. त्यांनी पहिल्या शंभर दिवसात महाराष्ट्रासाठी खूप दिले. वाढवण बंदर विकासासाठी भरघोस निधी दिला गेला. समृद्धी महामार्ग करताना पाचपट मोबदला दिला. त्यामुळे वेळेची बचत झाली आणि इंधनाची बचत झाली. हे कराव लागत त्याशिवाय गत्यंतर नाही.
लाडकी बहीणचा हप्ता आठ दिवसात देणार
आम्ही कांदा निर्यात बंदी उठवा सांगितलं, त्यांनी उठवली त्यामुळे आता कांद्याला चांगले भाव मिळत आहे. ऊस दरासाठी साखर कारखान्यासाठी एफआरपी नव्हे तर एमएसपी वाढवा ही सुद्धा मागणी केली आहे. केंद्रातील लोक आपलं ऐकतात. उद्या विरोधक म्हणतील आमच ऐकत नाही. त्यामुळे त्यांचा विचार करू नका. उद्या विरोधकांचे सरकार आले तर म्हणतील वर आमचं सरकार नाही. त्यात साडेचार वर्षे वाया जातील. ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचा लाडकी बहिणचा हप्ता आठ दिवसात देणार आहोत, असेही अजित पवार यांनी यावेळी म्हटले.
आणखी वाचा