(Source: ECI/ABP News/ABP Majha)
खासगी बँकेच्या जाचाला कंटाळला, स्वत:ला संपवलं, वसंत मोरेंच्या नावाने लिहिली चिठ्ठी
अहमदनगर : खासगी बँकेच्या जाचाला कंटाळून अहमदनगरमधील एका व्यक्तीने आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे.
अहमदनगर : खासगी बँकेच्या जाचाला कंटाळून अहमदनगरमधील एका व्यक्तीने आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. स्वत:ला संपवण्याआधी त्या व्यक्तीने चिठ्ठीही लिहिली आहे. त्याशिवाय बँकेच्या कर्मचाऱ्यांकडून जातीवाचक शिवीगाळ केल्याचाही पत्रात उल्लेख आहे. मनसेचे नगरसेवक वसंत मोरे यांच्या नावाने चिठ्ठी लिहिली. याप्रकरणी पोलिसी तपास करत आहेत. मोहन आत्माराम रक्ताटे असं आत्महत्या करणाऱ्या व्यक्तीचे नाव आहे.
अहमदनगर तालुक्यातील गुगळे कॉलनी बुऱ्हाणनगर येथील मोहन आत्माराम रक्ताटे यांनी एका खासगी बँकेकडून कर्ज काढून मालवाहू टेम्पो घेतला होता. पण कर्जाचे दोन हप्ते थकल्याने संबंधित बँकेने रक्ताटे यांचा टेम्पो जमा केला. त्यानंतर तो परस्पर विकला असल्याची माहिती रक्ताटे यांना देण्यात आली. कोणतीही नोटीस न बजावता परस्पर टेम्पो विकल्याने तसेच जातीवाचक शिवीगाळ झाल्यामुळे 10 डिसेंबर रोजी मोहन रक्ताटे यांनी विषारी औषध पिवून आत्महत्या केली होती. आत्महत्या केल्यानंतर त्यांच्या दुचाकीमध्ये चिठ्ठी आढळून आली. ही चिठ्ठी महाराष्ट्र नव निर्माण सेनेचे नगरसेवक वसंत मोरे यांच्या नावाने होती. वसंत मोरेच मला न्याय देतील असं सांगत संबंधित बँकेने माझी गाडी जमा करून फक्त दोन हप्ते थकल्यामुळे कोणतीही नोटीस न बजावता परस्पर गाडी विकली. तसेच मला जातीवाचक शिवीगाळ करून दम दिल्यामुळे मी आत्महत्या करत आहे, असे पत्रात त्याने नमूद केलेय.
परस्पर टेम्पो विकला -
मोहन रक्ताटे यांनी 2022 मध्ये एका खाजगी बँकेकडून कर्ज काढत लेलँड कंपनीचा मालवाहू टेम्पो घेतला होता. त्यानंतर त्यांचे वडील आत्माराम बाळाजी रक्ताटे यांचे निधन झाल्यानंतर एक महिना पूर्ण होत नाही तोच गाडीचा अपघात झाला. त्यामुळे गाडी दोन महिने बंद होती, दुरुस्तीचे काम सुरू होते. मोहन रक्तटे यांनी खासगी बँकेचे 11 हप्ते नियमित प्रमाणे भरले होते, मात्र ऑगस्ट, सप्टेंबर आणि ऑक्टोबर 2023 या तीन महिन्यांच्या हप्ते बाकी होते. त्यातच त्यांची तब्येत खराब झाल्याने गाडी बरेच दिवस घरीच उभी होती. त्यामुळे व्यवसाय होत नसल्याने त्या आर्थिक अडचणीत आले होते. हप्ते थकल्याने बँकेने गाडी जमा केली, तर मोहन रक्ताटे यांनी फोर क्लोज साठी बँकेकडे विनंती केली. गाडी विकून राहिलेले हप्ते देण्याचा त्यांचा विचार होता, मात्र हा व्यवहार जुळला नाही. त्यामुळे त्यांनी आपल्या मित्रांकडून उसने पैसे घेऊन बँकेचे कर्ज फेडण्याचा विचार केला. याबाबत त्यांनी वारंवार बँकेची संपर्क साधला आणि फोर क्लोज साठी विनंती केली. बँकेने त्यांना टाळाटाळ केल्याचा आरोप त्यांनी आपल्या सुसाईड नोटमध्ये केला आहे.
वसंत मोरे यांनी घेतली पिडीत कुटुंबियांची भेट -
दरम्यान त्यांनी आठ डिसेंबर रोजी बँकेकडे पुन्हा संपर्क साधला. त्यावेळी त्यांना बँकेकडून आपली गाडी विकली असल्याचं सांगण्यात आलं. कोणत्याही प्रकारची नोटीस न देता आपण माझी गाडी का विकली? असा जाब मोहन रक्ताटे यांनी बँकेच्या कर्मचाऱ्यांना विचारला. त्यावरून बँकेचे कर्मचारी आणि त्यांच्यात वादावादी झाली. धरण बँकेच्या अधिकाऱ्यांनी रक्तटे यांना जातीवाचक शिवीगाळ देखील केली असल्याचं आत्महत्या पूर्वी लिहिलेला चिठीत रक्तटी यांनी म्हटलं आहे. मनसेचे पुण्याचे नगरसेवक वसंत मोरे हेच आपल्याला न्याय देऊ शकतात, म्हणून त्यांच्याच नावाने आपण ही चिठ्ठी लिहून ठेवत असल्याचा उल्लेख या चिठ्ठीत केलाय. या गोष्टीची माहिती होताच वसंत मोरे हे नगरमध्ये दाखल झाले, त्यांनी पीडित कुटुंब यांचे भेट घेतली. तसेच पोलिसांचे देखील भेट घेतली आणि संबंधित खासगी बँकेच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केल्यामुळे संबंधितांवर गुन्हे दाखल करण्यात यावे अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नगरसेवक वसंत मोरे यांनी केली. जर संबंधितांवर गुन्हे दाखल झाले नाही तर मनसे स्टाईल हिसका दाखविण्यात येईल, त्याची सर्वस्वी जबाबदारी प्रशासनाची राहील असा इशाराच वसंत मोरे यांनी दिला आहे. मोरे यांनी आज पीडित कुटूंबियांची भेट घेतली तसेच पोलीस अधीक्षक कार्यालयात जाऊन अप्पर पोलीस अधीक्षक यांची देखील भेट घेतली.