(Source: ECI/ABP News/ABP Majha)
गाडीला कट मारल्याच्या वादातून संगमनेरमध्ये राडा, दोन गट भिडले; घटनास्थळी पोलिसांचा मोठा बंदोबस्त
Sangamner News : पोलिसांनी तात्काळ हस्तक्षेप करून परिस्थिती नियंत्रणात आणली असून, परिसरात शांतता आहे. या प्रकरणी पोलिसांकडून आठ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Sangamner News : अहमदनगर जिल्ह्यातील (Ahmednagar District) संगमनेर शहरात मंगळवारी दोन गटात हाणामारीची घटना समोर आली आहे. गाडीला कट लागल्याच्या कारणावरून वाद झाला होता. त्यानंतर काही तरुणांचा जमाव जमा झाला आणि त्यांनी दुचाकीस्वार तरुणाला बेदम मारहाण केली. मारहाण झालेल्या तरुणाच्या मदतीला धावून आलेल्या दोघांना देखील मारहाण झाली. त्यामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, पोलिसांनी तात्काळ हस्तक्षेप करून परिस्थिती नियंत्रणात आणली असून, परिसरात शांतता आहे. या प्रकरणी पोलिसांकडून आठ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
संगमनेर शहरातील दिल्ली नाका परिसरात दुचाकीला कट मारल्याच्या कारणावरून जमावाने तिघांना मारहाण केल्याची घटना काल सायंकाळी घडली होती. या मारहाणीची चर्चा शहरात पसरताच संगमनेर शहर पोलीस ठाण्यात मोठ्या संख्येने तरुण जमा झाले. संगमनेर शहर पोलीस ठाण्यात हा जमाव वाढत असतानाच पोलिसांनी हस्तक्षेप करत या जमावाला पांगवलं. तर, दुसरीकडे मारहाण झालेल्या घटनास्थळी सुद्धा दुसऱ्या गटातील जमाव एकत्र आला होता. यामुळे रात्री संगमनेर शहरातील वातावरण तणावपूर्ण झालं होतं. या प्रकरणी रात्री उशिरा पोलिसांनी राहुल गुंजाळ यांच्या फिर्यादीवरून आठ जणांविरोधात विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. यातील तीन जणांना ताब्यात घेतल्याची प्राथमिक माहिती असून, इतर आरोपींचा शोध पोलीस घेत आहेत.
नेमकं काय घडलं?
क्रमांक नसलेल्या पीक-अप जीपने कट मारल्याचा जाब विचारल्याच्या कारणावरुन संगमनेर तालुक्यातील कोल्हेवाडीतील एकाला जमावाने लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार मंगळवारी संध्याकाळी घडला. या तरुणाच्या मदतीला धावलेल्या तिघा-चौघांनाही जमावाने मारहाण केली. या घटनेत तिघे जखमी झाले असून, त्यांना उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. या घटनेनंतर कोल्हेवाडीसह संगमनेर शहरात तणाव निर्माण झाला आहे. संगमनेर शहर पोलीस ठाण्यात मोठ्या संख्येने गर्दी झाली होती. मात्र पोलिसांनी जमावाला पांगवल असून परिस्थिती नियंत्रणात आहे. तसेच कुणीही अफवा पसरवू नयेत अन्यथा कारवाई केली जाईल असे देखील पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.
यापूर्वी देखील अशाच घटना...
काही महिन्यांपूर्वी याच परिसरात अशाच पद्धतीने जमावणं मारहाण केल्याची घटना घडली होती. तर, कोरोना काळात सुद्धा पोलिसांवर देखील याच परिसरात हल्ला झाला होता. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने तणाव निवळला असून अधिक तपास पोलीस करत आहे.
इतर महत्वाच्या बातम्या :