Ahmednagar Crime : शेवगावातील जबरी चोरी आणि हत्या प्रकरणातील आरोपी जेरबंद, छत्रपती संभाजीनगरमधून मारेकऱ्याच्या मुसक्या आवळल्या
Ahmednagar Crime : अहमदनगरच्या शेवगाव येथील जबरी चोरी आणि खुनाच्या घटनेतील आरोपीला पकडण्यात पोलिसांना यश आले आहे. पोलिसांनी खेडकर टाबर चव्हाण या आरोपीला ताब्यात घेतलं आहे.
Ahmednagar Crime : अहमदनगरच्या (Ahmednagar) शेवगाव येथील जबरी चोरी आणि खुनाच्या (Murder) घटनेतील आरोपीला पकडण्यात पोलिसांना यश आले आहे. 23 जूनच्या पहाटे शेवगाव (Shevgaon) येथील जैन गल्ली येथे गोपीकिशन बलदवा यांच्या घरात चोरट्याने चोरी करुन गोपीकिशन बलदवा आणि पुष्पा बलदवा यांची हत्या केली होती. पोलिसांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन तपासासाठी वेगवेगळे पथके रवाना केली होती. यातील स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला यश आलं असून पोलिसांनी खेडकर टाबर चव्हाण या आरोपीला ताब्यात घेतलं आहे.
चोरी आणि खुनाच्या घटनेनंतर पोलिसांना जैन गल्ली येथील सीसीटीव्ही फूटेज हाती लागलं होतं. त्या सीसीटीव्ही फूटेजच्या आधारे शोध घेत असताना आरोपीची ओळख स्पष्ट झाली. खेडकर चव्हाण हा आरोपी असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर तो छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhaji Nagar) जिल्ह्यातील बिडकीन इथे असल्याची माहिती मिळाली. याच माहितीच्या आधारे खेडकर चव्हाण याला बिडकीन इथून ताब्यात घेण्यात आलं आहे.
व्यापाऱ्यांकडून बाजारपेठ बंद ठेवून निषेध
शेवगाव शहरातील मुख्य वस्तीमध्ये ही घटना घडल्यामुळे शेवगाव शहरासह जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली होती. शेवगाव येथील व्यापाऱ्यांनी त्याच दिवशी बाजारपेठ बंद ठेवून घटनेचा निषेध नोंदवत आरोपीच्या अटकेची मागणी केली. यासोबतच 24 तारखेला माहेश्वरी संघटनेने मूक मोर्चा काढून या घटनेचा निषेध नोंदवला होता. अखेर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला आरोपीला जेरबंद करण्यात यश आलं असून अटक करण्यात आलेल्या खेडकर चव्हाण याने गुन्ह्याची कबुली दिली आहे.
दरोडेखोरांच्या हल्ल्यात दोघांचा मृत्यू, एक जखमी
शेवगावच्या जैन गल्लीत वास्तव्यास असलेल्या बलदवा कुटुंबियांच्या घरावर 23 जून रोजी पहाटे दरोडा पडला. या घटनेत दोन दरोडेखोरांनी केलेल्या मारहाणीत गोपीकिसन बलदवा (वय 55 वर्षे) आणि त्यांची भावजय पुष्पा बलदवा (वय 65 वर्षे) या दोघांचा मृत्यू झाला. तर गोपीकिसन बलदवा यांच्या पत्नी सुनिता बलदवा या दरोडेखोरांच्या मारहाणीत जखमी झाल्या. त्यांना उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. दरोडेखोरांनी डोक्यामध्ये लोखंडी सळईच्या सहाय्याने वार केल्याचे कुटुंबियांचे म्हणणे आहे. यात गंभीर जखमी झाल्याने दोघांचा मृत्यू झाला, घरातील काही ऐवज दरोडेखोरांनी लंपास केला आहे. बलदवा यांच्या एका मित्राने गावाला जायचे म्हणून काही रक्कम त्यांच्याकडे ठेवण्यासाठी दिली होती, ती देखील चोरांनी नेली. पाळत ठेवून हा प्रकार झाल्याचा संशय व्यक्त होत आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. भर पेठेत अशी घटना घडल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली होती.
संबंधित बातमी