Ahmednagar : वृक्ष लागवडीनंतर गावची ओळखच बदलली, दुष्काळी म्हणून ओळखलं जाणारं गाव आता झालेय 'झाडांचे गाव'
Ahmednagar Latest News : अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव तालुक्यातील अंजनापूर हे गाव कधीकाळी दुष्काळी गाव म्हणून ओळखले जायचे.
Ahmednagar Latest News : अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव तालुक्यातील अंजनापूर हे गाव कधीकाळी दुष्काळी गाव म्हणून ओळखले जायचे. मात्र गेल्या आठ वर्षात येथील ग्रामस्थांनी वृक्षारोपणाची मोहीम प्रभापणे राबवली आणि आज हे गाव 'झाडांचे गाव' म्हणून ओळखले जातेय..
अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव तालुक्यात अडीच हजार लोकसंख्या असलेले अंजनापूर गाव... आठ वर्षांपूर्वी हे गाव दुष्काळी गाव म्हणून ओळखले जायचे. शेती हा इथला प्रमुख व्यवसाय. मात्र घटत्या पर्जन्यमानामुळे गावची परिस्थिती अशी की शेतीसह पिण्याचे पाणी देखील शेजारील गावांकडून विकत घ्यावे लागत असे. गाव छोटेसे असले तरी सध्या इथे ३०० इंजिनिअर, २५० सरकारी सेवतील अधिकारी आणि कर्मचारी तसेच ५० उद्योजक आणि व्यावसायिक असे उच्च शिक्षित ग्रामस्थ आहेत. या सर्वांनी एकत्र येत गावासाठी काहीतरी करण्याचा निर्धार केला आणि त्यातूनच उभे राहिले 'वृक्ष वेध फाऊंडेशन'. एक वृक्ष जीवनाचा अशी संकल्पना घेऊन फाऊंडेशनने ग्रामस्थांचे प्रबोधन केले आणि २०१५ साली वृक्षारोपणाची व्यापक मोहीम सुरू झाली. मागील आठ वर्षात फाऊंडेशनच्या माध्यमातून गावात कडूनिंब, चिंच, आंबा, वड अशी ऑक्सिजन देणारी नऊ हजार झाडे लावून त्यांचे संगोपन करण्यात आले आहे. झाड म्हणजे कुटुंबातील सदस्य या भावनेतून सर्व ग्रामस्थ या वृक्ष चळवळीत योगदान देत आहेत.
काही वर्षातच अंजनापूर गाव हिरवळीने नटले असून पर्जन्यमान वाढल्याने एकेकाळी ज्या गावांकडून पाणी विकत घ्यायचे आता त्याच गावांना अंजनापूर पाणी पुरवते. त्यामुळे गावातील शेतकऱ्यांसह सर्वच ग्रामस्थांचे जीवनमान बदलले आहे. वृक्षरोपणाच्या चळवळीने गावाची ओळख बदलली असून 'झाडांचे गाव' अशी नवी ओळख अंजनापूरची झाली आहे. गावातील उच्च शिक्षित लोक कामानिमित्त वेगवेगळ्या ठिकाणी वास्तव्यास असले तरी सोशल मिडीयाच्या माध्यमातून ते एकमेकांशी संपर्कात असतात. दरवर्षी गावात ६ ते ८ जुलै दरम्यान राबवण्यात येणाऱ्या वृक्षारोपण सप्ताहासाठी सर्व एकत्र येतात आणि तन-मन-धनाने आपले योगदान देतात. अंजनापूर ग्रामस्थांसह कोपरगाव तालुका प्रशासन देखील वृक्ष वेध फाऊंडेशनच्या या कामाला सहकार्य करते.
यावर्षी फाऊंडेशनच्या माध्यमातून गावात ५५१ वृक्षाची लागवड करण्यात आली आहे. यावेळी आयोजित केलेल्या वृक्ष संवर्धन शपथ कार्यक्रमासाठी आदर्श सरपंच म्हणून ओळख असणारे भास्करराव पेरे पाटील यांनी उपस्थिती लावली. वृक्षरोपणाच्या माध्यमातून एका दुष्काळी गावाने केलेले परिवर्तन बघून त्यांनीही या कार्याचे कौतुक केले आहे. दिवसेंदिवस जागतीक तापमानात होणारी वाढ कमी करण्यासाठी वृक्षारोपण ही काळाची गरज आहे. अंजनापूर ग्रामस्थांनी हजारो झाडे लावून गावाचा केलेला कायापालट इतरांसाठी देखील प्रेरणादायी आहे एव्हढं मात्र नक्की..