Onion Price : कर्जतच्या शेतकऱ्यानं एक एकर कांद्यावर फिरवला रोटाव्हेटर, उत्पादन खर्चही निघत नसल्यानं शेतकरी अडचणीत
Onion Price : कांद्याच्या दरात घसरण झाल्यामुळं अहमदनगर (Ahmednagar) जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील नागापूर येथील शेतकऱ्यानं एक एकर कांद्यावर रोटाव्हेटर फिरवला आहे.
Onion Price : सध्या राज्यातील कांदा उत्पादक शेतकरी (Onion Farmers) अडचणीत सापडला आहे. दिवसेंदिवस कांद्याच्या दरात (Onion Price) मोठी घसरण येत असल्याचं चित्र दिसत आहे. याचा मोठा फटका कांदा उत्पादक शेतकऱ्यांना बसत आहे. कांद्याच्या दरात घसरण झाल्यामुळं अहमदनगर (Ahmednagar) जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील नागापुर येथील शेतकऱ्यानं एक एकर कांद्यावर रोटाव्हेटर फिरवला आहे. सुभाष निंबोरे असं या शेतकऱ्याचे नाव आहे.
उत्पादन खर्च निघत नसल्यानं कांदा काढण्याचा निर्णय
कांद्याचे दर कोसळल्यानं शेतकरी चिंतेत आहेत. काही आपल्या शेतातील कांद्याचे पीकच काढून टाकत आहेत. कारण कांद्याला मिळणाऱ्या दरात शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च देखील निघणं शक्य होत नाही. त्यामुळं शेतकऱ्यांना फटका बसत आहे. कर्जत तालुक्यातील नागापुर येथील शेतकरी सुभाष निंबोरे यांनी एक एकर कांद्यावर रोटाव्हेटर फिरवला आहे.
संगमनेर तालुक्यातील शेतकऱ्यानेही कांद्यावर फिरवला ट्रॅक्टर
अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील पिंपरने येथील शेतकरी धनंजय थोरात यांनी आपल्या चार एकर क्षेत्रात लागवड केलेल्या कांदा पिकावर ट्रॅक्टर फिरवलाय. धनंजय थोरात यांनी या कांदा पिकासाठी आतापर्यंत जवळपास दोन लाख रुपये खर्च केला होता. मात्र, कांदा काढणीला आला असतानाच अचानक कांद्याचे भाव कोसळले. खर्चही निघणार नसल्यानं हवालदिल झालेल्या थोरात यांनी आपल्या चार एकर क्षेत्रात काढणीला आलेल्या कांदा पिकावर ट्रॅक्टर फिरवला आहे. तसेच कोणीही या, मोफत कांदा उपटून घेऊन जा आणि रान मोकळे करून द्या अशी म्हणण्याची नामुष्की या शेतकऱ्यावर ओढवली आहे.
Kisan Sabha : भाजप-शिंदे सरकारनं तातडीने हस्तक्षेप करावा अन्यथा... किसान सभेचा इशारा
कांद्याच्या प्रमुख बाजार समित्यांमधील विक्रीदर 450 ते 600 रुपयांपर्यंत खाली कोसळल्याने महाराष्ट्रभरातील कांदा उत्पादक शेतकरी हवालदिल झाले आहेत. त्यामुळं याबाबत राज्यातील भाजप-शिंदे सरकारनं (BJP-Shinde Govt) तातडीने हस्तक्षेप करण्याची मागणी किसान सभेच्या (Kisan Sabha) वतीनं करण्यात आली आहे. सरकारने कांदा उत्पादकांना मदत करण्यासाठी हस्तक्षेप न केल्यास मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, पणनमंत्री आणि कृषिमंत्री यांच्या दारात कांदे ओतण्याचे आंदोलन किसान सभा हातात घेईल, असा इशारा किसान सभेचे नेते डॉ. अजित नवलेंनी (Dr. Ajit Nawale) दिलाय. सत्ताधाऱ्यांनी सत्ताखेळ थांबवावा आणि कांदा उत्पादकांना दिलासा द्यावा अशी मागणी किसान सभेनं केली आहे.
महत्त्वाच्या बातम्या: