एक्स्प्लोर
नोकरी सोडून महिन्याला 2 लाख कमावणारा इंजिनिअर शेतकरी !
बुलडाणा: पुण्यातील गलेलठ्ठ पगाराची नोकरी सोडून विदर्भातील एक तरुण पुन्हा गावाकडं परतला. शेळीपालन आणि दुग्धव्यवसायांचा अभ्यास केला. प्रशिक्षण घेतलं आणि व्यवसायास सुरुवात केली. आज या तरुणाला शेतीपूरक व्यवसायातून महिन्याकाठी २ लाखांचा पगार मिळतोय.
30 गायींचा प्रशस्त गोठा, २०० ते २५० गावठी कोंबड्या, १०० बकऱ्याचा मुक्त संचार गोठा,आणि यांच्या चाऱ्यासाठी २ एकरात यशवंत गवत, बुलडाण्याच्या उच्चशिक्षित विजयसिंग राजपूत या तरुण शेतकऱ्याचे हे शेतीपूरक व्यवसाय.
इलेक्ट्रॉनिक इंजिनिअर असलेल्या विजयने शिक्षणानंतर पुण्यात नोकरीस सुरुवात केली. मात्र समाधान काही मिळत नव्हतं. यातच पश्चिम महाराष्ट्रातील मित्रांच्या फार्म हाऊसवर जाणं झालं. दुग्धव्यवसाय, बकरी पालन, कुकुटपालन याविषयी माहिती मिळाली. नव्या व्यवसायाचा मार्ग सापडला. नोकरीला अलविदा केला. आणि गाव गाठलं. खामगावजवळील पोरज गावातील वडिलोपार्जित जमिनीत हळूहळू व्यवसाय सुरु केला.
विजयनं सुरुवातीला बकरीपालन आणि दुग्ध व्यवसायाचं प्रशिक्षण घेतलं. जून २०१५ मध्ये आयडीबीआय बँकेकडून १५ लाखांचं कर्ज घेतलं. १५ जर्शी गायी विकत घेऊन दुग्ध व्यवसायास सुरुवात केली. हळूहळू व्यवसायाचा पसारा वाढवला. वर्षभरातच ५० शेळ्या विकत घेऊन शेळीपालन सुरु केलं..तर जोडीला गावठी कोंबड्याही आणल्या.. आता विजयकडं ३० गायी आहेत. या दिवसभरात अडीचशे लिटर दुध देतात ज्याची तो आसपासच्या परिसरात विक्री करतो.
विजय गायी आणि बकऱ्यांच्या आहाराकडं विशेष लक्ष देतो. दिवसातून तीन वेळा यशवंत गवत, सुग्रास, मका आणि कडबा गायींना दिला जातो. तर बकऱ्यांनाही मुबलक चारा मिळतो. जवळच पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. यामुळं ही जनावरं धष्टपुष्ट आहेत.
*विजय दुधाची २५ रुपये लिटरनं विक्री करतो. यातून दिवसाकाठी त्याला ६ हजार रुपये मिळतात.
*यातून ३ हजारांचा मजुरी, पशूखाद्य आणि वाहतुकीचा खर्च वजा जाता त्याला ३ हजार रुपये शिल्लक राहतात. शिवाय शेणखताच्या विक्रीतून वर्षाकाठी ३ लाख रुपये मिळतात.
*आतापर्यंत विजयनं ७० शेळ्यांची विक्री केली असून यातून त्याला २ ते अडीच लाखांचा नफा झाला आहे.
*तर कोंबड्याची अंडी आणि कोंबड्यांच्या विक्रीतूनही अतिरिक्त नफा होतो.
*सर्व खर्च वजा जाता विजयला महिन्याला २ लाखांचं निव्वळ उत्पन्न शिल्लक राहतं.
आजच्या तरुणपिढीनं गावाकडून शहराकडं धाव घेण्यापेक्षा, गावात संधी शोधावी. शेतीत लक्ष घालावं. स्वत:च्या विकासासोबत गावंही स्मार्ट करावी. देशाच्या विकासाचं हेच गमक असेल असं विजय ठामपणे सांगतो. विजयचा हा शेतीपूरक व्यवसाय अनेक तरुणांना प्रेरणादायी असाच आहे.
संदीप शुक्ला, एबीपी माझा, बुलडाणा
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
मुंबई
निवडणूक
पुणे
Advertisement