Har Ghar Tiranga : जिल्ह्यात लावणार 12 लाख ध्वज, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केला प्रारंभ
शहरात 7 लाख घरांमध्ये 'हर घर तिरंगा ' अभियान राबविण्यात येणार आहे. तसेच संपूर्ण जिल्ह्यात 12 लाख तिरंगा लावण्यात येणार आहे. प्रशासनाच्या तयारीबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी गडकरींना माहिती दिली.
नागपूर : संपूर्ण देशात 13 ते 15 ऑगस्टपर्यंत होणाऱ्या 'हर घर तिरंगा ' मोहिमेचा शुभारंभ केंद्रीय दळणवळण व महामार्ग मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी केला. यावेळी केंद्रीय खादी आणि ग्रामोद्योग आयोगाचे सदस्य जयप्रकाश गुप्ता व जिल्हाधिकारी आर. विमला उपस्थित होते.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या निवासस्थानी घरावर लावण्यात येणारा झेंडा त्यांच्याहस्ते फडकावून हा प्रारंभ करण्यात आला. नागपूर शहरात सात लाख घरांमध्ये 'हर घर तिरंगा ' अभियान राबविण्यात येणार आहे. तसेच संपूर्ण जिल्ह्यात बारा लाख तिरंगा (Tricolour) लावण्यात येणार आहे. या अभियानाची पूर्तता करण्याबाबत यावेळी नितीन गडकरी यांनी जिल्हाधिकारी आर. विमला यांना शुभेच्छा दिल्या.
जिल्हाधिकारी आर. विमला यांनी यावेळी स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवा अंतर्गत हर घर तिरंगा (India Flag) अभियानासाठी जिल्हा प्रशासनाने केलेल्या तयारीची माहिती दिली. मोठ्या प्रमाणात ध्वज उपलब्ध व्हावेत यासाठी बचत गटांमार्फत निर्मिती केली जात असल्याचे त्यांनी सांगितले. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर यांच्या मार्गदर्शनात झेंडा निर्मितीसाठी ग्रामीण भागातील बचत गट कार्यरत झाल्याचे त्यांनी सांगितले. नागरिकांनी ध्वजसंहिता पाळावी यासाठी विविध माध्यमातून 'हरघर तिरंगा ' लावताना काय काळजी घ्यावी, झेंडा कसा लावावा, याबाबतही सार्वत्रिक प्रबोधन सुरू असून जिल्हा प्रशासनाने यासंदर्भात चित्रफीत, ध्वनिफीत,पत्रके तयार केली असून त्याचे वितरण सर्वत्र सुरू असल्याचे स्पष्ट केले. जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात उद्दिष्ट पूर्ण होईल, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.
अशी आहे ध्वज संहिता
चित्रफितीमध्ये ध्वज संहिता अधोरेखित करण्यात आली आहे. ध्वजसंहितेनुसारआपला राष्ट्रध्वज हा हाताने कातलेला किंवा विणलेला अथवा मशीनद्वारे तयार केलेला असावा, सूत, पॉलिस्टर, सिल्क, खादी किंवा लोकरी पासून तयार केलेला तिरंगा चालेल. प्लास्टिक किंवा कागदी झेंडा फडकवू नये. राष्ट्रध्वजाचा अर्थात तिरंगाचा आकार हा आयताकृती असेल. तसेच त्याची ठेवन 3:2 या प्रमाणात ठेवावी. ध्वज फडकवितांना हवामान कसेही असले तरी तो सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत फडकावा. म्हणजेच दिनांक 13 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट या तीनही दिवशी रोज सकाळी फडकवावा आणि सूर्यास्ता वेळी रोज उतरावा. घरी लावलेल्या झेंड्याबाबतही हे आवश्यक आहे.