Srikanth Movie review : दृष्टीहिनांचा संघर्ष मोठ्या पडद्यावर, राजकुमार रावच्या 'श्रीकांत 'चित्रपटाचा रिव्ह्यु
जन्मतः अंधत्व वाट्याला आलेलं असताना आलेल्या संकटाचं संधीमध्ये रुपांतर करत वाटचाल करणाऱ्या 'श्रीकांत बोला' या दृष्टिबाधित व्यक्तीचा सकारात्मक दृष्टिकोन या चित्रपटात मांडण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.
तुषार हिरानंदानी
Rajkimar Rao, Jyotika
Srikanth Movie review : रडून मिळवलेल्या सहानुभूतीपेक्षा, लढून मिळालेल्या जखमा जेव्हा प्रिय वाटायला लागतात ना तेव्हा माणूस आतुर होतो प्रत्येक संकटाला मातीत मिळवण्यासाठी आणि त्यातून साकारतं ते असतं खरं यश. ही यशाची परिभाषा मोठ्या पडद्यावर साकारण्याकरिता ' श्रीकांत' चित्रपट सज्ज आहे. माझ्याकडे हे नाही, माझ्याकडे ते नाही, असं म्हणत अगदी छोट्या-छोट्या संकटात खचून जाणाऱ्या अनेक व्यक्तींना आपण आपल्या सभोवताली पाहिलं असेल. मात्र, जन्मतः अंधत्व वाट्याला आलेलं असताना देखील आलेल्या संकटाचं संधीमध्ये रुपांतर करत वाटचाल करणाऱ्या 'श्रीकांत बोला' या दृष्टिबाधित व्यक्तीचा सकारात्मक दृष्टिकोन या चित्रपटात मांडण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.
राजकुमार रावने या सिनेमात श्रीकांतची एका कुटुंबात या मुलाचा जन्म होतो. मुलगा जन्माला आल्याचा स्वाभाविकपणे वडिलांना आनंद असतो. मात्र, तो फार काळ टिकत नाही. तो इतरांपेक्षा वेगळा असल्याची जाणीव होताच, वडील त्याला मारण्याचा प्रयत्न करतात. पण श्रीकांतच्या नशिबात काहीतरी वेगळंच असतं.
शालेय जीवनापासून श्रीकांत इतर मुलांबरोबरच शिक्षण घेतो. संगणक तंत्रज्ञानाच्या मदतीने तो अभ्यास करतो. इतर मुलांच्या तुलनेत तो स्पर्धेत अव्वल असतो.असं असलं, तरी सभोवतालचा समाज हे स्वीकारायला सहजासहजी तयार होत नाही. अंध मुलगा काय दिवे लावणार आहे ? मोठा झाल्यानंतर भिकच तर मागावी लागणार. हे इतरांकडून वाट्याला आलेलं हिनवणं श्रीकांतची प्रेरणा बनतं. त्यानंतर तो वाटचाल करत बुद्धी चातुर्याच्या जोरावर थेट अमेरिकेतील नामांकित विद्यापीठातून बिझनेस मॅनेजमेंट ची पदवी घेतो.इथपर्यंतचा प्रवास प्रेक्षकांसाठी लक्षवेधी ठरणारा आहे.
एखादा जीवनपट मोठ्या पडद्यावर साकारणं हे कसंबच असतं . दिग्दर्शक तुषार हिरानंदानी यांनी हे लीलया साकारलं आहे. श्रीकांतच्या आयुष्यातील संघर्ष , त्यावर त्याने केलेली मात, मिळालेल्या यशानंतर आलेला गर्व या सर्वच बाबी राजकुमार राव याने अप्रतिम साकारल्या आहेत.त्याच्यासोबत अभिनेत्री ज्योतिका हिने साकारलेली शिक्षिकेची भूमिका देखील विशेष आहे.चित्रपटाचा उत्तरार्ध थोडा विशेष वाटत नाही. मात्र त्याकडे दुर्लक्ष करून श्रीकांत च्या जीवनपटातून प्रेरणा मिळते हे नक्की.
Movie Review by Gaurav Malak