Gulmohar Review : नात्यांची गुंतागुंत असणारा 'गुलमोहर'
Gulmohar Review : शर्मिला टागोर आणि मनोज वायपेयीचा 'गुलमोहर' हा सिनेमा नात्यांची गुंतागुंत असणारा आहे.
राहुल चित्तेला
मनोज वाजपेयी, शर्मिला टागोर, अमोल पालेकर, सूरज शर्मा, सिमरन
Gulmohar Review : काही सिनेमे हे फक्त सिनेमा नसून एक वेगळाच अनुभव देऊन जातात. काही सिनेमे जुन्या गोष्टींना उजाळा देण्याचा प्रयत्न करतात, स्वत:ला भेटवतात, कुटुंबियांसोबत नव्याने ओळख करुन देतात, विसरलेल्या गोष्टींची ओळख करुन देतात. 'गुलमोहर' (Gulmohar) हा याच पद्धतीचा सिनेमा आहे. हा सिनेमा प्रेक्षकांना त्यांच्या कुटुंबियांना भेटवतो.
'गुलमोहर' या सिनेमाचं कथानक काय आहे? (Gulmohar Movie Story)
दिल्लीतील बत्रा या श्रीमंत घराण्याची गोष्ट 'गुलमोहर' या सिनेमात दाखवण्यात आली आहे. बत्रा कुटुंबियांच्या बंगल्याचं नाव 'गुलमोहर' असं आहे. बत्रा परिवातील तीन पिढ्यांचा आयुष्याकडे बघण्याचा दृष्टीकोन वेगवेगळा आहे. शर्मिला टागोरने या सिनेमात कुसुम बत्रा हे पात्र साकारले आहे. कुसुम अचानक एकदिवस 'गुलमोहर' विकण्याचा निर्णय घेते. होळी साजरी केल्यानंतर चार दिवसांत घरातील सदस्यांनी वेगळं व्हावं, अशी इच्छा व्यक्त करते.
कुसुमचा मोठा मुलगा अरुणला म्हणजेच मनोज वाजपेयीला वेगळं होण्याचा निर्णय पटत नाही. मात्र त्याचा मुलगा आदित्यला म्हणजेच सूरज शर्माला मात्र वेगळं राहायचं आहे. घरात काम करणाऱ्या मंडळींनादेखील अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे आता कुटुंब वेगळं होणार की एकत्र येणार हे जाणून घेण्यासाठी प्रेक्षकांना सिनेमाच पाहावा लागेल.
View this post on Instagram
शर्मिला टागोर अनेक वर्षांनंतर रुपेरी पडद्यावर झळकली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा आपल्या दर्जेदार अभिनयाने तिने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. मनोज वायपेयी एक उत्कृष्ट अभिनेता आहे. 'गुलमोहर' या सिनेमातील अरुण बत्राची भूमिका त्यांनी चांगलीच वठवली आहे. 'फॅमिली मॅन' सारख्या सीरिजमधली भूमिका असो वा 'गुलमोहर' सिनेमातली. दोन्ही वेगळ्या भूमिका असल्या तरी मनोजने त्या चोख निभावल्या आहेत. अमोल पालेकरच्या अभिनयाचंदेखील कौतुक.
राहुल चित्तेला (Rahul Chittella) हा आजच्या पिढीचा दिग्दर्शक आहे. पण तिन्ही पिढ्यांच्या विचारसरणीला त्याने योग्य न्याय दिला आहे. या सिनेमातील प्रत्येक सीन प्रेक्षकांना कुटुंबियांसोबत जोडण्यासाठी मदत करतो. आयुष्यात कुटुंबाचं किती महत्त्वाचं स्थान आहे हे सांगणारा 'गुलमोहर' हा सिनेमा आहे. एक चांगला विचार प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचं काम या सिनेमाने केलं आहे. कौटुंबिक नाट्य असणारा 'गुलमोहर' हा सिनेमा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे. या सिनेमातील गाणी सिनेमाचं कथानक पुढे नेण्यासाठी मदत करत आहेत.