Movie Review : सानी कायीधाम; विद्रोही सिनेमांच्या मालिकेतील पुढचं पाऊल...
Saani Kaayidham Review : 'सानी कायीधाम' ही एक सर्वोत्तम कलाकृती आहे.
अरुण माथेश्वरन
कीर्ती सुरेश, सेल्वराघवन
Saani Kaayidham Review : विद्रोही सिनेमाची एक मालिकाच गेल्या काही वर्षांपासून तमिळ भाषेत सुरू आहे. अभिनेत्री कीर्ती सुरेशचा 'सानी कायीधाम' (Saani Kaayidham) हा सिनेमा हे त्यातलंच एक पुढचं पाऊल आहे. 'असुरन', 'सारपट्टा', 'विसरनाई', 'कर्णान', 'जय भीम' हे सिनेमे तुम्हाला आवडले असतील तर 'सानी कायीधाम' तुम्ही चुकवता कामा नये. याचं वेगळेपण असं आहे की ज्या सिनेमांचा मी उल्लेख केला ते नायकप्रधानतेकडे झुकणारे होते, 'सानी कायीधाम' हा नायिकाप्रधान सिनेमा आहे. कीर्ती सुरेशनं साकारलेल्या पोन्नी या पीडितेचा संघर्ष आपल्याला सुन्न करतो. सिनेमाचा प्लॉट तमिळनाडूतल्या एका छोट्याशा गावातला आहे. कथा ही 1980 सालानंतरची आहे. त्यामुळे तत्कालिन सामाजिक स्थितीचा उत्तम अभ्यास करून तो काळ डोळ्यांसमोर उभा केला आहे. न्यायव्यवस्थेतला फोलपणा, पोलीस प्रशासनाची दडपशाही, जातवर्चस्व, कारखाना मालकांची मक्तेदारी, कामगारांचं शोषण हा समान धागा आधीच्या सिनेमांमध्येही होता आणि या सिनेमातही आहे. फरक इतकाच आहे की यावेळी सूड घेणारी नायिका आहे. 'महानटी' सिनेमापासून कीर्ती सुरेश माझी आवडती अभिनेत्री. पण आतापर्यंत बघितलेल्या तिच्या सर्व भूमिका एका बाजूला आणि ही पोन्नी एका बाजूला. हा अख्खा सिनेमा फक्त कीर्ती सुरेशचा आहे.
कीर्ती सुरेशच्या सोबत सेल्वराघवन सर आहे. अभिनेता म्हणून हा त्यांचा तसा पहिलाच सिनेमा आहे. पण तुम्ही त्यांचा अभिनय बघितला तर वाटतं की गेल्या अनेक दशकांचा अनुभव गाठिशी असलेला हा कोणीतरी कसलेला अभिनेता आहे. तमिळमधल्या अनेक सुपरहिट सिनेमांचं लेखन आणि दिग्दर्शन सेल्वराघवन यांना केलं आहे. पण अभिनयापासून ते इतकी वर्ष दूर का होते? असा प्रश्न पडतो. त्यांची दुसरी ओळख सांगायची तर ते सुपरस्टार धनुषचे मोठे भाऊ आहेत.
कीर्ती सुरेश आणि सेल्वराघवन सर या दोघांनीही डोळे आणि अंग अभिनयातून या सिनेमाच्या कथेला न्याय दिला आहे. एक महत्वाचं.. सिनेमा खूप डार्क आहे, नायिकेवर होणारा अत्याचार हा अंगावर येतो. रक्तपातही खूप मोठ्या प्रमाणावर आहे. ती तयारी ठेऊनच हा सिनेमा बघावा. कीर्ती सुरेश आणि सेल्वराघवन सरांच्या अभिनयाचा सजलेला हा सिनेमा तमिळमधला क्लासिक मास्टरपीस आहे. सिनेमा बघितल्यावर धक्क्यातून सावरण्याची तयारी ठेवा. ही एक सूडकथा (Revenge Story) आहे. एवढाच काय तो स्पॉयलर मी इथे देऊ इच्छितो. मला खात्री आहे की एकदा हा सिनेमा तुम्ही बघायला सुरूवात केली की शेवटपर्यंत थांबणार नाही.
अरुण माथेश्वरन तसा नवखा दिग्दर्शक, मात्र प्रतिभेला अनुभवाची गरज नसते. अरुण हे तमिळ सिनेमाचं भविष्य आहे. मी नेहमी म्हणतो, सिनेमा हा दिग्दर्शकाचा असतो. विषयाची मांडणी करण्याचं कसब दिग्दर्शकाकडे असते. अरुण माथेश्वरन यांनी ज्या पद्धतीनं हा सिनेमा मांडलाय त्याला तोड नाही.
'ओडियन', 'नोटा', 'विक्रम वेधा', 'कैथी' अशा सिनेमांना पार्श्वसंगीत देणाऱ्या सैम यांना कथेनुसार या सिनेमाचं गांभीर्य अधिकच वाढवलंय. यामिनी यद्न्यमूर्तीनं कैमरावर्क अप्रतिम केलं आहे. उत्तम सिनेमा बनवण्यासाठी ना मोठे सेट्स लागतात ना कुठल्याही प्रकारचे व्हिएफएक्स. तमिळ सिनेमा सातत्यानं हे आपल्या कामातून दाखवून देतो. सिनेमामध्ये कुठेही अतिशयोक्ती वाटतील अशी दृश्य नाहीत. कथा दमदार असेल आणि ती मांडण्याची कला अवगत असेल तर सिनेमा यशस्वी होतो, प्रेक्षकांच्या लक्षात राहतो. सिनेमाची भाषा जेवढी तमिळ, मल्याळम सिनेमांना अवगत झाली तेवढी अजून बॉलिवुडलाही जमलेलं नाही. हेच गमक आहे तमिळ सिनेमाच्या यशाचं. 'सानी कायीधाम' ही त्यातलीच एक सर्वोत्तम कलाकृती.