विरोधकांचे पहिल्याच दिवशी बहिष्काराचं हत्यार, भविष्यात अधिक आक्रमक होण्याचे संकेत
Maharashtra Assembly Session : ईव्हीएमवर शंका घेत, निवडणूक आयोगाच्या कारभारावर टीका करत विरोधक महाविकास आघाडीच्या आमदारांनी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सभात्याग केल्याचं दिसून आलं.
मुंबई : नवनिर्वाचित आमदारांचा शपथविधी आणि विधानसभा अध्यक्षांची निवड करण्यासाठी विशेष अधिवेशन सुरू झालं. पण पहिल्याच दिवसाची सुरुवात झाली विरोधकांच्या सभात्यागानं. आमदारकीची शपथ घेण्याआधीच विरोधकांनी बहिष्काराचं हत्यार उपसलं आणि शपथ घ्यायला नकार दिला. ईव्हीएम आणि निवडणूक आयोगावरचा संशय यावरून आंदोलनानं विरोधकांनी पहिला दिवस गाजवला. त्यावरून आता इथून पुढे काय होणार आहे याचे संकेत दिले.
सत्ताधाऱ्यांचे शक्तिप्रदर्शन
शनिवारी सकाळी साडेदहाच्या सुमाराला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार आपापल्या आमदारांसह विधान भवनात दाखल झाले. अजित पवारांच्या आमदारांनी गुलाबी फेटे घालून, तर भाजप, शिवसेनेच्या आमदारांनी भगवे फेटे घातले होते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करून पायऱ्यांवर घोषणा देत, शक्तिप्रदर्शन करत महायुतीचे नेते विधान भवनात दाखल झाले.
विरोधकांचा सभात्याग
एकीकडे सत्ताधारीच शक्तिप्रदर्शन करत असताना मविआचे आमदार मात्र शांतपणे विधानभवनात पोहोचले. हंगामी अध्यक्षांनी राज्यपालांच्या आदेशाचं वाचन करत शपथविधी सुरू होत असल्याचं सांगितलं. त्यावेळी आदित्य ठाकरेंसह विरोधकांनी सभात्याग केला. नाना पटोलेंसह विरोधी पक्षांच्या अनेक नेत्यांच्या नावांची शपथविधीसाठी घोषणा झाली, पण ते सभागृहात नव्हते.
सभागृहात या घडामोडी घडत असताना दुसरीकडे सभागृहाबाहेर जितेंद्र आव्हाडांनी थेट आय लव्ह मारकडवाडीचे पोस्टर्स झळकावले. आदित्य ठाकरे, जितेंद्र आव्हाडांसह मविआच्या आमदारांनी शिवरायांच्या पुतळ्याला अभिवादन करत आज शपथ न घेण्याची घोषणा केली.
त्यावेळी मँडेट जनतेनं दिलं की ईव्हीएमद्वारे आयोगाने दिलं असा सवाल आदित्य ठाकरे यांनी विचारला. तर सरकार मारकडवाडी आंदोलनावर वरवंटा फिरवतंय असा आरोप जितेंद्र आव्हाड यांनी केला. त्याचवेळी 'पुरी दाल ही काली' असं म्हणत नाना पटोले यांनी टोला लगावला.
विरोधकांनी सभात्याग केल्यानंतर नाना पटोले आणि जितेंद्र आव्हाड, आदित्य ठाकरेंसह मातोश्रीवर दाखल झाले. त्यावेळी उद्धव ठाकरेंनी शरद पवारांशी फोनवरून चर्चा केली. त्यानंतर सरकारचा निषेध करत अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी शपथ घेण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला.
शपथविधीवरून अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी मविआच्या या महानाट्यामुळे आगामी हिवाळी अधिवेशनात काय होणार याची चुणूक पाहायला मिळाली.
ही बातमी वाचा: