Ananya Movie Review : सकारात्मकता पेरणारी 'अनन्या'
Ananya Movie Review : एकांकिका म्हणून ती लोकांना जेवढी आवडली, दोन अंकी नाटक म्हणून जेवढी भावली तितक्याच समर्थपणे ती रुपेरी पडद्यावर साकारली गेली आहे.
प्रताप फड
ऋता दुर्गुळे,अमेय वाघ,चेतन चिटणीस,ऋचा आपटे,योगेश सोमण,सुव्रत जोशी
Ananya Movie Review : काही कथा या विशिष्ट माध्यमातच जास्त प्रभावीपणे मांडल्या जाऊ शकतात, किंबहुना त्यांचा जन्मच ठराविक माध्यमासाठी झालेला असतो. त्यांचं माध्यमांतर झालं तर मूळ कलाकृतीला धक्का लागू शकतो किंवा त्यातली गंमत कमी होऊ शकते.
'अनन्या' मात्र याला अपवाद ठरलीय. एकांकिका म्हणून ती लोकांना जेवढी आवडली, दोन अंकी नाटक म्हणून जेवढी भावली तितक्याच समर्थपणे ती रुपेरी पडद्यावर साकारली गेली आहे.
खरं तर माध्यमांतर करताना सगळ्यात महत्वाचं असतं ते लेखकाचं आणि दिग्दर्शकाचं गोष्टीवरचं नियंत्रण. रंगभूमीच्या मर्यादित अवकाशाला जेव्हा रुपेरी पडद्याचा कॅनव्हास मिळतो तेव्हा ती गोष्ट भरकटण्याची जास्त शक्यता असते. जे रंगभूमीवर करता आलं नाही ते सगळं कॅमेऱ्यासमोर साकारण्याचा मोह कोणालाही पडू शकतो आणि याच मोहात अडकून अनेक कलाकृतींची माती झालेली उदाहरणं आपल्या समोर आहेत.
'अनन्या' सिनेमा मात्र खूपच नियंत्रित आणि कथेच्या गरजेइतक्याच चौकटीत बांधला गेलाय. त्यासाठीच लेखक आणि दिग्दर्शक अशी दुहेरी जबाबदारी पार पाडणाऱ्या प्रताप फडचं कौतुक करायलाच हवं.
अपघातात हात गमावलेली अनन्या आणि त्यानंतर स्वत:च्या पायावर उभं राहाण्यासाठीचा तिचा संघर्ष ही या सिनेमाची वन लाईन असली तरी गोष्ट केवळ अनन्यापुरती मर्यादित नाही. तिच्याभोवतालच्या, तिच्या जवळच्या, तिच्या रक्ताच्या नात्यातल्या अशा सर्वच माणसांचा हा प्रवास आहे. आणि तो प्रवासही तितकाच महत्त्वाचा आहे.
एखादा अपघात जेव्हा स्वत:चे हात हिरावून घेतो तेव्हा होणाऱ्या दु:खापेक्षा अशा प्रसंगात आपल्या मायेचे, हक्काचे हात आपल्यापासून दुरावतात ती भावना जास्त वेदनादायी असते. त्या हातांना पुन्हा जवळ आणणं, त्या हातांमध्ये आपल्याबद्दलचा आत्मविश्वास पुन्हा जागा करणं आणि त्यातून त्या हातामागच्या देहात पुन्हा माणूसपणाची बीजं पेरणं या साऱ्याची गोष्ट म्हणजे 'अनन्या'.
हे सारं ऐकायला कदाचित थोडसं जड वाटत असलं तरी हे पडद्यावर खूप सहजपणे आणि छान पद्धतीनं मांडलं आहे आणि ही सहजता या सिनेमाची सगळ्यात मोठी जमेची बाजू आहे.
उत्तम कॅमेरावर्क, साजेसं आणि नेमकं संगीत, तेवढंच उत्तम एडिटिंग या साऱ्याच तांत्रिक बाबींनी हा सिनेमा उत्तम सजलाय, मात्र त्यात जीव ओतलाय तो कलाकारांच्या अभिनयानं. मुख्य भूमिकेतील हृता दुर्गुळे, योगेश सोमण, चेतन चिटणीस, रुचा आपटे, सुव्रत जोशी, शिवराज वाळवेकर, रेणुका दफ्तरदार, सुनील अभ्यंकर आणि अमेय वाघ या साऱ्यांमुळे एक उत्तम, कलरफुल आणि तितकाच सकारात्मक सिनेमा आपल्या भेटीला आला आहे.
मला आवर्जून एका गोष्टीचा उल्लेख करायाचा आहे तो म्हणजे या सिनेमात वापरलेले गेलेले व्हीएफएक्स. ‘अनन्या’च्या हातांना गायब करण्याची किमया या व्हिएफएक्सने केली आहे आणि ते काम एवढं कमाल जमून आलं आहे की कोणाला सांगूनही पटणार नाही की ही तांत्रिक करामत आहे. त्यामुळे त्या साऱ्याच मंडळींचं कौतुक करायला हवं.
समीर सप्तीसकरने केलेली गाणी आणि पहिल्यांदाच दिलेलं बॅकग्राउंड म्युझिक कथेला पुढे नेणारं आणि पूरक आहे. जागा दिसत असतानाही अनावश्यक गाण्यांचा भडिमार आणि संगीतातून निर्माण केला जाणारा मेलोड्रामा टाळला आहे.
थोडक्यात जसं मी सुरुवातीला सांगितलं प्रताप फडने सगळ्याच आघाड्यांवर सिनेमाची उत्तम बांधणी केलीय. अनन्याची ‘फिंगर क्रॉस’ मोमेंट, नव्या घरावर हातांच्या ठशांऐवजी उमटवलेले पायांचे ठसे असे अनेक सीक्वेन्स आहेत जे पाहताना खूप भारी वाटतं.
या साऱ्यात खटकणाऱ्या फारशा गोष्टी नाहीत. हो, पण क्लायमॅक्सबद्दल मी नक्की सांगेन की शेवटच्या 15-20 मिनिटात किमान तीन-चार जागा अशा होत्या जिथं सिनेमाचा शेवट होऊ शकला असता मात्र तो खेचला गेलाय. कदाचित अमेय वाघच्या प्रेमापोटी ते सीन वाढवले असावेत.
मात्र तरीही सिनेमा म्हणून 'अनन्या' तुम्हाला काहीतरी छान, सकारात्मक आणि मस्त पाहिल्याचा नक्कीच अनुभव देईल यात शंका नाही. या सिनेमाला मी देतोय साडेतीन स्टार्स.