Jailer Review : रजनीकांतसाठी पहावा असा 'जेलर'
Jailer Review : रजनीकांत आपल्या मित्रांच्या मदतीने मुलाला कसा सोडवतो आणि मूर्ती तस्कराचा खात्मा कसा करतो त्याची कथा म्हणजे 'जेलर'.
Nelson Dilipkumar
रजनीकांत, मोहनलाल, शिवराज कुमार
Jailer Review : रजनीकांतचा (Rajinikanth) औरा काही औरच आहे. तो पडद्यावर आला की संपूर्ण पडदा व्यापून टाकतो. खरे तर या वयातही नायकाच्या भूमिका साकारणे आणि विशेष म्हणजे ती भूमिका प्रेक्षकांना पटणे, आवडणे आणि त्यांनी ती डोक्यावर घेणे म्हणजे सोपे नाही. त्याच्या प्रत्येक चित्रपटाची खूप आधीपासून चर्चा सुरू होते आणि त्याचे चित्रपटही बऱ्यापैकी प्रेक्षकांचे मनोरंजन करणारे असतात. रजनीकांतचा नवा चित्रपट 'जेलर'ही (Jailer) त्याला अपवाद नाही.
टायगर मुथुवेल (रजनीकांत) एक निवृत्त जेलर आहे. तो घरी पत्नी (रम्या कृष्णन), एसीपी असलेला मुलगा अर्जुन (वसंत रवी), सून आणि नातवासोबत निवृत्तीचं जीवन जगत असतो. मुलाला त्याने प्रामाणिकपणाचे धडे दिलेले असतात. एकेकाळी टेरर असलेला मुथुवेल अत्यंत शांतपणे जीवन जगत असतो. त्यातच एक दिवस त्याचा मुलगा गायब होतो. जुन्या दुर्मिळ मुर्तींच्या तस्करी करणाऱ्याने अर्जुनची हत्या केल्याचा संशय असतो. शांतपणे जगणाऱ्या मुथुवेलच्या जीवनात वादळ येते. तो अर्जुनला मारणाऱ्यांना ठार करतो. पण नंतर वेगळेच रहस्य समोर येते आणि चित्रपटाला कलाटणी मिळते. त्याच्या मुलाची हत्या झालेली नसते तर त्याचे अपहरहण करण्यात आलेले असते. रजनीकांत आपल्या मित्रांच्या मदतीने मुलाला कसा सोडवतो आणि मूर्ती तस्कराचा खात्मा कसा करतो त्याची कथा म्हणजे जेलर.
चित्रपटाचा पूर्वार्ध चांगला बांधला आहे. रजीकांतनेही निवृत्त -जेलरची भूमिका खूपच संयतपणे साकारली आहे. 'हम' चित्रपटातील अमिताभ बच्चनच्या भूमिकेची काहीशी आठवण करून देणारी ही भूमिका आहे. मात्र नंतर सूडाने पेटलेला रजनीकांतही मनाला खूप भावतो. उत्तरार्धात मुकुट चोरीची घटना बांधून कथेला फरफटवण्यात आलेय. त्यामुळे चित्रपट लांबतो आणि काहीसा कंटाळवाणाही होतो. मात्र केवळ रजनीकांतच्या वावरण्यामुळे चित्रपट पाहात राहावेसे वाटते. त्याचे हास्य आपल्या मनावरही परिणाम करणारे ठरते. चित्रपटाचा क्लायमॅक्स खूप चांगला आहे. हा आधुनिक फादर इंडिया आहे असे म्हटले तर चुकीचे ठरणार नाही.
रजनीकांतने नेहमीच्याच पद्धतीने अॅक्शन आणि कॉमेडी साकारली आहे. योगीबाबू सोबकची रजनीकांतची दृश्य बहारदार झाली आहेत. रजनीकांतने यावेळी स्वतः फार कमी अॅक्शन केली असून मित्रांच्या मदतीनेच त्याने खलनायकाचा खात्मा केला आहे. यावेळी जेलरमध्ये रजनीकांतने मोहनलाल आणि शिव राजकुमार यांचीही मदत घेतली आहे. साऊथचे हे दोघेही सुपरस्टार कॅमियो रोलमध्ये या चित्रपटात दिसतात. जॅकी श्रॉफ, मकरंद देशपांडे यांच्याही पाहुण्या कलाकाराच्या भूमिका आहेत. तमन्ना भाटिया फक्त एका गाण्यापुरती असून तिला चित्रपटात वाया घालवले आहे.
चित्रपटाचा लेखक-दिग्दर्शक आहे नेल्सन दिलीपकुमार. नेल्सनने साऊथ सुपरस्टार विजयला घेऊन बीस्ट चित्रपट आणला होता. परंतु हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपरफ्लॉर ठरला होता. त्यामुळे नेल्सन रजनीकांतला पडद्यावर कसा आणतो याकडे सगळ्यांचे लक्ष होते.नेल्सन दिलीपकुमारने रजनीकांतला पडद्यावर चांगल्या प्रकारे उतरवले आहे पण चित्रपटाच्या कथेवर म्हणावे तसे लक्ष न दिल्याने नंतर चित्रपट काही काळासाठी रेंगाळतो.
चित्रपटाला अनिरुद्ध रविचंद्रनचे संगीत आहे. पण संगीतात काही खास दम नाही. त्यापेक्षा बॅकग्राउंड म्यूझिक खूप चांगले आणि परिणामकारक आहे.