Kalki 2898 AD Movie Review : कल्की 2898 एडी : कथानकाअभावी फसलेला VFX चा खेळ
Kalki 2898 AD Movie Review in Marathi : आपला देश म्हणजे अशा कथांचा खजिना आहे. यातून तुम्ही जितके मोती वेचाल तेवढे कमीच आहे. मात्र त्या मोत्यांची माळ तुम्हाला व्यवस्थित तयार करता आली पाहिजे.
Nag Ashwin
अमिताभ बच्चन, कमल हसन, प्रभास, दीपिका पदुकोण, दिशा पाटनी, दुलकर सलमान, विजय देवरकोंडा
Kalki 2898 AD Movie Review in Marathi : भारतीय दिग्दर्शकांकडे कल्पनांची वानवा नसते. एक कल्पना घेऊन ती उत्कृष्टरित्या फुलवण्याचे कसब बहुतेक दिग्दर्शकांकडे आहे, मात्र कधी कधी ती कल्पना फुलवण्यात आणि पडद्यावर सादर करण्यात दिग्दर्शक अशस्वी होतात आणि त्यातून मग 'कल्की 2898 एडी'सारखा (Kalki 2898 AD) चित्रपट तयार होतो. आपल्या पौराणिक कथांमध्ये हॉलिवूडच्या यूनिव्हर्सल कथानकांना मात देता येईल अशा गोष्टी आहेत. हॉलिवूडवालेही आपल्या पौराणिक कथांवरूनच त्यांच्या चित्रपटाची रचना करतात आणि यशस्वी होतात. एव्हेंजर्स चित्रपट आपल्याला रामायण, महाभारत आणि प्रचलित रुपककथांची आठवण करून देतो. राक्षसाचा अंगठीत असणारा प्राण, वेगवेगळ्या कलेत प्राविण्य असलेले पांडव, वानरांची सेना घेऊन रावणाची लंका दहन करणारे प्रभू श्रीराम हे हॉलिवूडच्या चित्रपटात वेगळ्या रुपात दिसतात. आपला देश म्हणजे अशा कथांचा खजिना आहे. यातून तुम्ही जितके मोती वेचाल तेवढे कमीच आहे. मात्र त्या मोत्यांची माळ तुम्हाला व्यवस्थित तयार करता आली पाहिजे.
'कल्की 2898 एडी'ची एक ओळीतील कथा खूपच जबरदस्त आहे. महाभारत युद्धात भगवान श्रीकृष्ण अश्वत्थाम्याला अमरत्वाचा शाप देतात आणि कलियुगात कल्की अवताराच्या वेळी भगवंताचे रक्षण करण्याची जबाबदारी पार पाडावी लागेल असे सांगतात. त्यानंतर चित्रपट थेट येतो 2898 एडीमध्ये आणि लोकेशन असते काशी. काशीमध्ये सुप्रीम (कमल हसन) स्वतःची शक्ती वाढवण्यासाठी, अमरत्वासाठी गर्भवती महिलांवर प्रयोग करीत असतो आणि सुप्रीमसाठी हे काम कमांडर (शाश्वत चटर्जी) करीत असतो. सुमती (दीपिका पदुकोण)च्या पोटी देव कल्की अवतार घेणार असतो त्यामुळे त्याचे संरक्षण करण्याचे काम अश्वत्थामा (अमिताभ बच्चन)कडे असते. दुसरीकडे भैरव (प्रभास) सुप्रीमच्या जगात जाण्यासाठी प्रयत्न करीत असतो. भैरव हा कर्णाचा या युगातील अवतार. त्यानंतर चित्रपट शेवटाकडे जातो आणि दिग्दर्शक प्रेक्षकांना चित्रपटाचा पुढील भाग येईवपर्यंत वाट पाहाण्यास सांगतो.
प्रभासच्या अभिनयात काहीही दम वाटला नाही. अमिताभ बच्चन यांनी अश्वत्थाम्याची भूमिका जबरदस्त केली आहे. प्रभासबरोबरची त्यांची हाणामारीची दृश्येही चांगली झाली आहेत. ती पडद्यावर बघणेही जमून आले आहे. कमल हसन आणि दीपिका पदुकोण फार कमी वेळ पडद्यावर दिसतात. कदाचित पुढच्या भागात त्या दोघांवर भर असेल. याशिवाय दुलकर सलमान, विजय देवरकोंडा यांच्याही चित्रपटात भूमिका आहेत ज्या फार थोड्या वेळासाठी आहेत. एक-दोन दृश्यात रामगोपाल वर्मा आणि एसएस राजामौलीही दिसतात. दिशा पाटनीने रॉक्सीची भूमिका साकारली आहे, तीसुद्धा थोडा वेळा पडद्यावर दिसते आणि नंतर गायब होते. कॉमेडीसाठी ब्रह्मानंदन आहेच.
चित्रपटाचे vfx चांगले झाले असले तरी ते तेवढे आकर्षक वाटत नाहीत. चित्रपट बघताना असे वाटत नाही की, अरे काय ज़बरदस्त vfx आहे. मात्र सिनेमॅटोग्राफर जोर्डजे स्टोजिलिकोविचने नाग अश्विनच्या मनातील कल्पना पडद्यावर चांगल्या प्रकारे उतरवली आहें.
दिग्दर्शक नाग अश्विनच्या डोक्यात कल्पना जबरदस्त होती पण तिचा पटकथा लेखकांच्या मदतीने चांगला विस्तार करण्यात तो अयशस्वी ठरला आहे. चित्रपटाचा पहिला अर्धा भाग कंटाळवाणा वाटतो, नंतर मात्र थोडी गती येते मात्र काय होणार आहे याची कल्पना आपल्याला अगोदरच येत असल्याने त्यात नाविन्य वाटत नाही.
चित्रपटाच्या संगीतातही काही विशेष उल्लेख करण्यासारखे नाही. या चित्रपटाचे सुरुवातीला प्रोजेक्ट के असे नाव ठेवले होते त्यामुळे चित्रपटात या प्रोजेक्ट के चा अनेक वेळा उल्लेख होतो.
चित्रपट पाहायचा की नाही हे तुम्ही तुमचे पैसे आणि वेळ पाहून ठरवा. फक्त एवढेच सांगता येईल की तुमचे पैसे वसूल झाले असे तुम्हाला वाटणार नाही. चित्रपटाचे तिकीट दर स्वस्त झाले तर मात्र नक्की पाहा.