Ganapath Review : कथेच्या नावाने बोंब असलेला आणि फसलेला 'गणपत'
Ganapath Review : 'गणपत'ची कथा भविष्यकाळातील म्हणजेच काल्पनिक जगावर आधारित आहे.
विकास बहल
टाइगर श्रॉफ, कृती सेनन, अमिताभ बच्चन
Ganapath Review : हॉलीवुडप्रमाणे सायफाय चित्रपट बनवण्याचे स्वप्न बॉलिवुडमधील दिग्दर्शक पाहात असतात. यासाठी ते प्रयत्नही करतात. विशेष म्हणजे त्यांना निर्मातेही मिळतात. मात्र केवळ हॉलिवुडसारखा चित्रपट करण्याचे स्वप्न पाहून काहीही होत नाही. त्यासाठी तशी भक्कम कथा आणि तशी पटकथाही रचणे आवश्यक असते. आणि ते जर नसेल तर मात्र चित्रपट फसल्याशिवाय राहात नाही. आणि टायगर श्रॉफ (Tiger Shroff) अभिनीत 'गणपत' (Ganapath) पाहाताना हे स्पष्टपणे जाणवते.
'गणपत'ची कथा भविष्यकाळातील म्हणजेच काल्पनिक जगावर आधारित आहे. अशा चित्रपटांना डायस्टोपियन अॅक्शन चित्रपट म्हणतात. श्रीमंत आणि गरीब यांच्यातील लढाई हा या चित्रपटाचा मुख्य गाभा पण तो कुठेही मनाला भिडत नाही. काही तरी दाखवायचे म्हणून आणि हॉलिवुडमध्ये दाखवतात म्हणून आपणही दाखवायचे असा प्रयत्न या चित्रपटासाठी केलेला दिसतो. मात्र तो पूर्णपणे फसलेला आहे.
चित्रपटाची सुरुवात होते दलपतीच्या (अमिताभ बच्चन) निवेदनाने. गरीबांना या नरकातून बाहेर काढण्यासाठी गणपत येईल आणि तो तुमची सुटका करेल असे तो गरीबांना सांगताना दिसतो. गरीब आणि श्रीमंतामध्ये एक भिंत असते आणि ती भिंत ओलांडणे गरीबांना शक्य नसते. श्रीमंत त्यांच्यावर अन्याय करीत असतात. याच श्रीमंतांच्या जगात गुड्डू (टायगर श्रॉफ) राहात असतो. गुड्डू श्रीमंताच्या जगात जॉनला चांगले फाईटर शोधण्यासाठी मदत करीत असतो आणि ऐशोआरामात जीवन जगत असतो. जॉन हा दलिनीसाठी काम करीत असतो. मात्र एके दिवशी गुड्डू जॉनची गर्लफ्रेंड असलेल्या रोजीसोबत (एली अवराम) क्लबमध्ये नाचत असल्याचे जॉनला कळते आणि तो गुड्डूला मारण्याचे आदेश देतो. गुड्डूला मारले जाते, पण तो वाचतो आणि जीव वाचवण्यासाठी गरीबांच्या वस्तीत जातो. तेथे त्याची भेट जस्सीबरोबर (कृती सेनन) होते. जस्सीला गुड्डू एक वाक्य सांगतो त्यावरून जस्सी समजते की, दलपती ने सांगितलेला गरीबांचा तारणहार हाच आहे. मग दोघांमध्ये प्रेम होते आणि नंतर गणपत काय आणि कसे करतो ते सांगत चित्रपटाचा पहिला भाग संपतो.
टायगर श्रॉफची अॅक्शन आणि डांस दाखवण्यासाठीच अनेक प्रसंगाची विशेषत्वाने रचना केल्याचे स्पष्टपणे जाणवते. टायगरने कामही चांगले केलेले आहे पण चित्रपटाच्या कथानकातच दम नसल्याने त्याची मेहनत वाया गेली आहे. अमिताभ बच्चन, कृती सेनन, गिरीश कुलकर्णी यांनी त्यांच्या वाटेला आलेल्या भूमिका ठीक केल्या आहेत. त्याबाबत जास्त काही बोलण्यासारखेही नाही. शिवाच्या भूमिकेत राशिम रहमानने चांगले काम केले आहे.
दिग्दर्शक विकास बहलची कल्पना चांगली होती पण चांगली कथा त्याला रचता आली नाही. अॅक्शन दृश्ये मात्र त्याने चांगली रचली आहे. दिग्दर्शनापेक्षा टायगर श्रॉफला ‘दाखवण्या’कडेच त्याचा जास्त कल दिसतो. गरीबांची वस्ती हॉलिवुडच्या चित्रपटाप्रमाणेच त्याने तयार केली आहे. त्याला व्हीएफएक्सची जोडही दिली आहे. मात्र हे व्हीएफएक्स बालिश वाटतात. केवळ एका बॉक्सिंग मॅचमुळे गरीबांचे आयुष्य बदलते हे कुठेही पचनी पड़त नाही. एकूणच चित्रपट चकचकीत असला तरी जराही प्रभाव पाडत नाही. दुसऱ्या भागात विकास बहल आपल्या चुका सुधारेल आणि चांगला चित्रपट प्रेक्षकांसमोर आणेल अशी अपेक्षा ठेवावी का?