Gadar 2 Movie Review : सनी देओलचा 'गदर 2' कसा आहे? वाचा रिव्ह्यू...
Gadar 2 Review : सनी देओलचा (Sunny Deol) बहुचर्चित 'गदर 2' हा सिनेमा आज प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.
अनिल शर्मा
सनी देओल, अमीषा पटेल, उत्कर्ष शर्मा, मनीष वाधवा
Sunny Deol Ameesha Patel Gadar 2 Movie Review : बॉलिवूड अभिनेता सनी देओल Sunny Deol) आणि अभिनेत्री अमीषा पटेल (Ameesha Patel) यांचा 'गदर 2' (Gadar 2) हा बहुचर्चित सिनेमा आता प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. 'गदर 2' हा सिनेमा प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यात यशस्वी ठरला आहे. तारा सिंह आणि सकिनाने पुन्हा एकदा प्रेक्षकांची मने जिंकली आहेत.
'गदर 2'चं कथानक काय आहे? (Gadar 2 Story)
'गदर : एक प्रेम कथा' या सिनेमाचा सीक्वेल म्हणजे 'गदर 2' हा सिनेमा होय. तारा सिंह आणि सकिनाचा मुलगा आता मोठा झाला असून त्याला हिरो व्हायचं आहे. 'गदर 2'चं कथानक तारा सिंह आणि त्याचा मुलगा चरणजीत सिंह यांच्याभोवती फिरणारा आहे. 'गदर'मध्ये तारा सिंह आणि सकिनाची लव्हस्टोरी दाखवण्यात आली होती. पण आता प्रदर्शित झालेल्या सिनेमाच्या दुसऱ्या भागात त्यांच्या मुलावर भाष्य करण्यात आले आहे.
ताराचा मुलगा चरणजीतही त्याच्याप्रमाणे देशभक्त आहे. देशसेवेदरम्यान तो पाकिस्तानच्या तावडीत सापडतो. दरम्यान त्याच्यावर बरेच अत्याचार केले जातात. पाकिस्तानामध्ये चरणजीतवर अन्याय होत असताना तारा आणि सकिना मात्र त्याच्या परत येण्याची वाट पाहत असतात. अखेर तारासिंह स्वत:मुलाला सोडवण्यासाठी लढतो. आता तारासिंह चरणजीतला घेऊन सुखरुप भारतात येणार का? हे जाणून घेण्यासाठी प्रेक्षकांना सिनेमा पाहावा लागेल.
कलाकारांचा दमदार अभिनय...
'गदर 2'मधील सनी देओलच्या कामाचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. प्रत्येक फ्रेममधील त्याचं काम पाहून टाळ्या आणि शिट्ट्या वाजवल्या जातात. 22 वर्षांपूर्वी त्याची असलेली क्रेझ आजही कायम आहे. त्याचं स्क्रीन प्रेझेन्स आणि डायलॉग डिलिव्हरीचं खूप कौतुक. सनी जेव्हा 'हिंदुस्तान जिंदाबाद' म्हणतो तेव्हा सिनेमागृहातील सर्व प्रेक्षकही 'हिंदुस्तान जिंदाबाद' म्हणतात.
अमिषा पटेलनेही (Ameesha Patel) चांगलं काम केलं आहे. सकिनाला योग्य न्याय देण्यात ती यशस्वी ठरली आहे. उत्कर्ष शर्मानेही आपली भूमिका चोख निभावली आहे. सिनेमातील नायकांप्रमाणे खलनायकांनीदेखील आपल्या भूमिकेला 100% दिले आहेत. अमरीश पुरींच्या कामाचंही विशेष कौतुक.
'गदर 2' कसा आहे?
'गदर 2' हा एक भावनिक सिनेमा आहे. सिनेमाची सुरुवात तारा सिंह आणि सकिनापासून होते. सिनेमाचं कथानक कुठेतरी थोडसं खटकणारं आहे. पण एकंदरीतच हा सिनेमा प्रेक्षकांना मनोरंजनाची मेजवानी देणारा आहे. सिनेमाचा पहिला भाग अत्यंत संथ असला तरी दुसऱ्या भागात गती आहे. अनिल शर्मा यांचं दिग्दर्शन चांगलं झालं आहे. पण पहिल्या भागावर त्यांनी आणखी मेहनत घ्यायला हवी होती, असं वारंवार वाटतं. सिनेमातील गाणी चांगली आहेत. जर तुम्ही सनी देओल किंवा 'गदर'चे चाहते असाल तर 'गदर 2' हा सिनेमा नक्की पाहा.