Singham Again Movie Review : रामायणात फसलेला रोहित शेट्टीचा 'सिंघम अगेन'
Singham Again Movie Review in Marathi : सिंघम अगेन चित्रपट लवकरच ओटीटीवर दिसेल, त्यामुळे यासाठी महागडे तिकिट खरेदी करून लक्ष्मी वाया घालवायची की नाही हा विचार प्रेक्षकांनी करावा.
रोहित शेट्टी
अजय देवगण, अक्षय कुमार, दीपिका पदुकोण, करीना कपूर, रणवीर सिंह, टायगर श्रॉफ, अर्जुन कपूर
चित्रपटगृह
Singham Again Movie Review in Marathi : एखाद्या चांगल्या प्रसंगाची सुरुवात राम-रामने होते तर एखाद्याच्या अंतिम प्रवासातही राम नामाचा घोष केला जातो. त्यामुळे तुम्ही राम नामाचा वापर कुठे करता त्यावर सगळे अवलंबून असते. जगातील चित्रपटसृष्टी ही फक्त पाच कथानकांवर चित्रपट तयार करते. यात सूड किंवा बदला घेण्याची कथा क्रमांक एक वर आहे. रामायण आणि महाभारतातल्या प्रसंगांवरून अनेक चित्रपटांची निर्मिती झाली आहे. त्यापैकी काही यशस्वी ठरले तर काही सुपर फ्लॉप, मात्र या कथानकांवरून चित्रपट तयार करण्याची प्रथा काही थांबलेली नाही. आज हे सर्व आठवण्याचे कारण म्हणजे रोहित शेट्टीचा नवा चित्रपट सिंघम अगेन. देशभरात रामनामाचा जप सुरु असल्याने दिग्दर्शक रोहित शेट्टीनेही चित्रपटात रामनामाचा जप करत कोट्यवधींची कमाई करण्याचा घाट घातला आणि त्यासाठी सिंघन अगेनची निर्मिती केली.
रोहित शेट्टीने दक्षिणेच्या सिंघमवर आधारित हिंदीत अजय देवगणला घेऊन सिंघमची निर्मिती केली. हा सिंघम प्रेक्षकांनी डोक्यावर घेतला. त्यानंतर रोहितने लगेचच सिंघमचा दुसरा भाग आणला. सिंघम यशस्वी होतोय हे पाहून त्याने अक्षय कुमारला घेऊन सूर्यवंशीची निर्मिती केली. मूळ गाभा तोच फक्त त्याने चित्रपटाचे नाव बदलले आणि नायक बदलला. प्रेक्षकांनी सूर्यवंशीकडे पाठ फिरवली. मग रोहितने रणवीर सिंहला घेऊन सिंघमच्याच धर्तीवर सिंबाची निर्मिती केली आणि हॉलिवूडच्या धर्तीवर यूनिव्हर्सल कॉप चित्रपटांची श्रृंखला आणतोय असे दाखवले. यूनिव्हर्सल कॉप प्रेक्षकांच्या मनावर बिंबवण्यासाठी त्याने मग सिंघम अगेनचा घाट घातला. त्याच्या सर्व सिंघम, सूर्यवंशी, सिंबा यांना एकत्र आणले आणि सिंघम अगेन तयार केला. यात टायगर श्रॉफलाही त्याने यूनिव्हर्सल कॉप श्रेणीत आणण्याचा प्रयत्न केला. दीपिकालाही शक्ती शेट्टी म्हणून लेडी सिंघमच्या अवतारात आणले आहे.
आता एवढे सगळे कलाकार घ्यायचे तर त्यांच्यासाठी तशी सशक्त कथाही हवी. रोहितला वाटले चला रामायणावर आधारित सिंघम करू. म्हणजे नायकाच्या पत्नीला खलनायक पळवतो आणि मग नायक आणि त्याचे मित्र खलनायकाचा खात्मा करून नायिकेला कसे परत आणतात ते भव्यतेने दाखवू. प्रेक्षक मंदबुद्धी असल्याने मधे-मधे रामायणाचे प्रसंग दाखवू म्हणजे त्याला कळेल की हा चित्रपट रामायणावर आधारित आहे. आणि इथेच रोहित शेट्टी फसलाय. कथेत काहीही दम नाही, केवळ रामायण आहे म्हणून खलनायक श्रीलंकेला पाठवला, अगोदरच्या चित्रपटात जे-जे दाखवले तेच त्याने या चित्रपटात दाखवले आहे. नायकाची एंट्री अॅक्शन दृश्यानेच होते आणि ती अॅक्शन दृश्येही काही खास वाटत नाहीत. क्लायमॅक्समध्ये तर सूर्यवंशीतील गोळीबाराप्रमाणेच, दुसरे काहीच नाही. एवढे सगळे सांगितल्यावर चित्रपटाची कथा सांगण्याची आवश्यकता आहे, असे वाटत नाही.
अजय देवगणने बाजीराव सिंघमची भूमिका पुढे यशस्वीपणे चालवली आहे. करीना कपूर त्याच्या पत्नीच्या अवनीच्या भूमिकेत आहे, जिला खलनायक अर्जुन कपूर (जुबेर हफीज) आपल्या कुटुंबीयांचा बदला घेण्यासाठी पळवतो. मग सिंघम सिंबा (रणवीर सिंह), शक्ती शेट्टी (दीपिका पदुकोण), सूर्यवंशी (अक्षय कुमार), सत्या (टायगर श्रॉफ) यांच्या मदतीने जुबेरला मारतो आणि अवनीला परत आणतो. बस संपली कथा. आणि विशेष म्हणजे 8 जणांची चित्रपटाची कथा लिहिली आहे. ते म्हणतात ना अनेक स्वयंपाकी एकत्र येऊन स्वयंपाक करू लागले की, स्वयंपाक खराब होतो अगदी तसाच प्रकार सिंघम अगेनचा झाला आहे.
रणवीर सिंह चित्रपटात थोडी रंगत आणतो, पण ती काही वेळासाठीच आहे. टायगर श्रॉफला म्हणावी, तशी भूमिका मिळालेली नाही. कदाचित दोन-चार वर्षानंतर रोहित शेट्टी त्याच्या यूनिव्हर्सल कॉप सीरीजच्या एखाद्या चित्रपटात टायगर श्रॉफला मुख्य भूमिका देईल. तसेही चित्रपटाच्या शेवटी रोहितने सलमान खानच्या चुलबुल पांडेला दाखवत सिंघमच्या चौथ्या भागाची तयारी केलेलीच आहे.
चित्रपटाच्या संगीतात काहीही उल्लेख करावे असे नाही. चित्रपटाला दक्षिणेतील संगीतकार रवी बसरूरने संगीत दिलेय. दिवाळीचा आनंद द्विगुणित करण्याऐवजी रंग में भंग करणारा हा चित्रपट मनोरंजन करण्यात संपूर्णपणे अपयशी ठरला आहे. एकही गोष्ट अशी नाही की ज्याची प्रशंसा केली जाऊ शकते.
हा चित्रपट लवकरच ओटीटी आणि सॅटेलाईट चॅनेलवर दिसणार आहे, त्यामुळे यासाठी महागडे तिकिट खरेदी करून लक्ष्मी वाया घालवायची की नाही हा विचार प्रेक्षकांनी करावा.
चित्रपट : सिंघम अगेन
निर्माते : रोहित शेट्टी, ज्योती देशपांडे, अजय देवगण
दिग्दर्शक : रोहित शेट्टी
लेखक : क्षितिज पटवर्धन, यूनूस सजावल, अभिजीत खुमन, संदीप साकेत, अनुषा नंदकुमार आणि रोहित शेट्टी
संवाद : शांतनु श्रीवास्तव, मिलाप झवेरी, विधी घोडगावकर आणि रोहित शेट्टी
कलाकार : अजय देवगण, करीना कपूर, रणवीर सिंह, दीपिका पदुकोण, टायगर श्रॉफ, जॅकी श्रॉफ, अक्षय कुमार, अर्जुन कपूर, रवी किशन, श्वेता तिवारी
संगीतकार : रवी बसरूर
रेटिंग : 2 स्टार