Chandu Champion Movie Review : प्रेरक गाथा 'चंदू चॅम्पियन'
Chandu Champion Movie Review : प्रत्येकाने हा 'चंदू चॅम्पियन' चित्रपट पाहावा आणि मनात एक वेगळी उर्मी, उर्जा घेऊन नव्याने कामास सज्ज व्हावे.
Kabir Khan
Kartik Aaryan, Ayan Khan, Rajpal Yadav, Shreyas Talpade, Sonali Kulkarni, Vijay Raaz, Bhuvan Arora, Yashpal Sharma, Aniruddh Dave, Ganesh Yadav, Bhagyashri Borse
Box Office
Chandu Champion Movie Review : जीवनात प्रत्येकाला कधी ना कधी निराशा येतेच. आपण खूप काही करतो पण काहीच होत नाही असे वाटत असते, कधी कधी तर एखादी व्यक्ती शेवटी हार मानते आणि टोकाचे पाऊल उचलते. पण असे टोकाचे पाऊल उचलण्याऐवजी संघर्ष केला तर यश निश्चित मिळू शकते. मात्र त्यासाठी मनपासून प्रयत्न केला पाहिजे. पंगुं लंघयते गिरिम् असं एक सुभाषित आहे, याचा अर्थ असा की, एखादा अपंगही डोंगराच्या शिखरावर पोहोचू शकतो, आणि हे अगदी खरे आहे. आणि अशा लोकांच्या यशोगाथा जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचणे आवश्यक असते. परंतु अशा कथा प्रेक्षकांपर्यंत आणण्याचा प्रयत्न फार कमी केलेला आढळतो. त्यातही गंभीरपणे असे व्यक्तिमत्व पडद्यावर आणण्याचे धाडस कोणी करीत नाही. मराठी चित्रपटसृष्टी तर अशा प्रकारचे चित्रपट आणण्याचे मनातही आणत नाही. अर्थात त्यासाठी बजेट आणि देशभरात रिलीज करण्याची क्षमता त्यांच्या असत नाही हे एक मोठे कारण म्हटले पाहिजे.
नमनाला एवढे घडाभर तेल घालण्याचे कारण म्हणजे कबीर खान दिग्दर्शित चंदू चॅम्पियन चित्रपट. हा चित्रपट एका सत्य कथेवर आधारित असून या कथेचा नायक आहे सांगलीच्या इस्लामपूरमधील पद्मश्री पुरस्कार विजेते मुरलीकांत पेटकर. आता हा मुरलीकांत पेटकर कोण हा प्रश्न तुमच्या मनात नक्कीच आला असेल. तर त्याची कथा म्हणजेच हा चित्रपट आहे आणि त्याची कथा जाणून घेतल्यानंतर तुम्ही त्याला सॅल्यूट केल्याशिवाय राहाणार नाही. लहानगा मुरली ऑलिप्पिक पदक विजेते कुस्तीवीर खाशाबा जाधव यांची मिरवणूक पाहून आपणही ऑलिम्पिकमध्ये पदक मिळवावे असे ठरवतो. ते स्वप्न पाहू लागतो, आणि एवढेच नव्हे तर सगळ्यांना आपल्या या स्वप्नाबाबत सांगू लागतो. खाशाबा जाधव यांची मिरवणूक बघून मुरलीकांत (कार्तिक आर्यन) लाही कुस्ती खेळून पदक मिळवावे वाटू लागते. त्यासाठी तो कुस्तीचे डावपेचही शिकू लागतो. पण काही कारणामुळे मुरलीकांतला गाव सोडून जावे लागते आणि कर्नेल सिंह (भुवन अरोरा) मुळे तो सैन्यात भरती होतो. मात्र सैन्यात कुस्तीचे ऑप्शन नसल्याने मुरलीकांत बॉक्सिंगमध्ये प्राविण्य मिळवतो. टोकियोमध्ये जगभरातील सैन्य दलांच्या स्पर्धेत मुरलीकांत रौप्य पदक मिळवतो. त्यानंतर त्याची नजर ऑलिम्पिकमधील गोल्ड मेडलकडे लागते. पण १९७१ च्या युद्धात मुरलीकांतला नऊ गोळ्या लागतात. आठ गोळ्या काढल्या जातात पण एक गोळी शरीरात तशीच राहिलेली असल्याने मुरलीकांत कमरेखाली अपंग होतो आणि त्याचे ऑलिम्पिकमध्ये जाण्याचे स्वप्न भंगते. तो निराश होतो. आत्महत्येचा प्रयत्न करतो, पण त्यातही अयशस्वी होतो कारण त्याच्या हातून भविष्यात खूप काही घडणार असते.
सैन्यात असताना टायगर अली (विजय राज) बॉक्सिंगचे धडे देत असतात. ते पुन्हा मुरलीकांतच्या जीवनात येतात आणि त्याला लढण्यास प्रवृत्त करतात. मुरलीकांत पुन्हा तयार होतो मात्र यावेळी तो स्वीमिंगमध्ये प्राविण्य मिळवतो. आणि पॅरा ऑलिम्पिकमध्ये भाग घेतो. १९७२ च्या म्युनिच ऑलिम्पिकमध्ये मुरलीकांत भाग घेतो, मात्र तेथे दहशतवादी हल्ला झाल्यानंतर स्पर्धा दुसऱ्या ठिकाणी घेतली जाते आणि तेथे मुरलीकांत सुवर्ण पदक मिळवतो आणि आपले स्वप्न पूर्ण करतो. म्युनिच दहशतवादी हल्ल्याबाबत फार कमी प्रेक्षकांना ठाऊक असेल. त्या दहशतवादी हल्ल्यावरही हॉलिवूडचा प्रसिद्ध दिग्दर्शक स्टीव्हन स्पीलवर्गने म्युनिच या नावानेच चित्रपट काढलेला आहे. ही कथा पाहताना असे वाटते की आपण कुठल्या तरी दुसऱ्या ग्रहावरील काल्पनिक कथा पाहात आहोत. इतकी की ही अविश्वसनीय कथा आहे.
लहानग्या मुरलीकांतच्या डोळ्यातील ऑलिम्पिक सुवर्ण पदकाचे स्वप्न ते, ते स्वप्न पूर्ण होईपर्यंतचा प्रवास कबीर खानने अत्यंत उत्कृष्टपणे पडद्यावर मांडला आहे. भावनिक दृश्य दाखवण्यात कबीर खानचा हातखंडा आहे, त्याने यापूर्वी ट्यूबलाईट आणि ८३ चित्रपटात दाखवलेच होते. आणि यातही त्याने याचा योग्यरित्या वापर केला आहे. एक था टायगर या स्पाय यूनिव्हर्सच्या बाहेर येत त्याने चंदू चॅम्पियन आणला आहे. मराठी माणसाची, मराठी मातीतली कथा त्याने मराठी फ्लेवरमध्येच पडद्यावर मांडली आहे. त्याने मराठीपणाशी खेळ खेळण्याचा प्रयत्न केलेला नाही हे आवर्जून नमूद करावे वाटते. हा चित्रपट ऑस्करसाठी पाठवावा इतक्या उत्कृष्ट पद्धतीने तयार करण्यात आला आहे. मुरलीकांत पेटकर यांची कथा निवडून ती पडद्यावर आणण्याचे धाडस करणाऱ्या कबीर खानचे कौतुक केलेच पाहिजे. ही कथा पाहताना प्रत्येक भारतीयाला नक्कीच गौरवास्पद वाटेल. चित्रपटाच्या शेवटी मुरलीकांत जेव्हा सुवर्णपदक जिंकतो तेव्हा तुम्हालाही चित्रपटगृहातील खुर्चीतून उठून टाळ्या वाजवण्याचा मोह आवरणार नाही.
कबीर खानसोबतच मुरलीकांत पेटकरांची भूमिका करणाऱ्या कार्तिक आर्यनचेही कौतुक करावे लागेल. कार्तिक मुरलीकांतची भूमिका अक्षरशः जगला आहे. कार्तिकने यात त्याच्याकडे असलेल्या अभिनयाचे सर्व गुण दाखवलेले आहेत. त्याच्या कारकिर्दीतील ही सर्वश्रेष्ठ भूमिका आहे असे म्हणावेसे वाटते.
मुरलीकांतच्या लहानपणीची भूमिका बाल कलाकार अयान खानने खूपच चांगल्या प्रकारे साकारली आहे. विजय राज यांनी टायगर अलीच्या भूमिकेत चांगला रंग भरला आहे. मुरलीकांतच्या प्रत्येक सुख-दुखाशी ते समरस झालेले दिसले. अन्य कलाकारांमध्ये राजपाल यादव, श्रेयस तळपदे, हेमांगी कवी, नितीन भजन, गणेश यादव, सोनाली कुलकर्णी यांनी त्यांच्या वाट्याला आलेल्या भूमिका चांगल्या प्रकारे साकारल्या आहेत.
आणखी एका व्यक्तीचे कौतुक करावे लागेल आणि ते म्हणजे साजिद नाडियाडवाला यांचे. त्यांनी अशा या वेगळ्या चित्रपटाच्या निर्मितीला हात घातला. खरे तर अशा अज्ञात हीरोंच्या बायोपिकला हात लावायला कोणी तयार नसते आणि त्यातही अज्ञात हीरो मराठी असेल तर बघायलाच नको. मात्र साजिद नाडियाडवाला आणि कबीर खान यांनी हे धाडस केले, त्यांचे हे धाडस खरेच कौतुकास्पद आहे.
प्रत्येकाने हा चित्रपट पाहावा आणि मनात एक वेगळी उर्मी, उर्जा घेऊन नव्याने कामास सज्ज व्हावे एवढेच सांगावेसे वाटते. मात्र चित्रपटाचे नाव चंदू चॅम्पियन का आहे हे तुम्हाला चित्रपट पाहिल्यावरच समजेल.