Sharad Pawar Exclusive | शिवसेनेसोबत आघाडी करण्यासाठी सोनिया गांधींना 'या' गोष्टींची आठवण करुन दिली : शरद पवार
शिवसेना भाजपसोबत जाण्यास तयार नाही, हे लक्षात आल्यानंतर मी कोणत्याही काँग्रेस नेत्यांशी चर्चा केली नाही. मी थेट काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याशी चर्चा केली.

मुंबई : राज्यातील राजकीय नाट्यानंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी एबीपी माझाला एक्स्क्लुझिव्ह मुलाखती दिली. यामध्ये शरद पवारांनी अनेक मुद्द्यांवर आपली भूमिका स्पष्ट केली. राज्यातील सत्तासंघर्षानंतर शरद पवारांनी अनेक अनुत्तरित प्रश्नांची उत्तरं आपल्या मुलाखतीत दिली. विरोधी विचारधारा असताना काँग्रेस शिवसेनेसोबत जाण्यास कशी तयार झाली? सोनिया गांधींची मनधरणी कशी केली? याची माहिती शरद पवारांनी यावेळी दिली.
विधानसभा निवडणुका झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस विरोधी पक्षात बसणार असल्याची जाहीर भूमिका आम्ही घेतली होती. जनतेने आम्हाला विरोधी पक्षात बसण्याचा कौल दिला होता, म्हणून मी तशी भूमिका घेतली होती. आम्ही सत्तेच्या अपेक्षेनं पावलं टाकत नाही, हे दाखवायचं होतं. म्हणून विरोधी पक्षात बसण्याचा जनादेश आम्हाला दिलेला आहे, हे वारंवार सांगत होतो. आम्ही सत्तेच्या दिशेनं पावलं टाकत नाही आहोत, असा आम्हाला विशेष करुन शिवसेनेला संदेश द्यायचा होता.
शिवसेना भाजपसोबत जाण्यास तयार नाही, हे लक्षात आल्यानंतर मी कोणत्याही काँग्रेस नेत्यांशी चर्चा केली नाही. मी थेट काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याशी चर्चा केली. शिवसेनेसोबत आघाडी करण्याबाबत काँग्रेसच्या राष्ट्रीय नेतृत्वाचं मत काय आहे, याची चिंता होती. त्यामुळे काँग्रेसच्या राष्ट्रीय नेतृत्वासोबत मी बोलावं, अशी काँग्रेसच्या राज्यातील नेत्यांची इच्छा होती, अशी माहिती शरद पवारांनी दिली.
काँग्रेसचा शिवसेनेच्या विचारधारेला नेहमीच विरोध होता. मात्र सोनिया गांधींसोबत मी काही मुद्द्यांवर चर्चा केली. शिवसेनेसोबत जाण्यासाठी काँग्रेसच्या राष्ट्रीय पातळीवर थोडा विरोध होता. त्यावेळी मी सोनिया गांधी यांना काही घटना सांगितल्या. इंदिरा गांधी यांनी लागू केलेल्या आणीबाणीला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी पाठिंबा दिला होता, याची आठवण मी त्यांना प्रथम करुन दिली. आणीबाणीनंतर झालेल्या राज्यातील निवडणुकीत काँग्रेसला पाठिंबा देऊन एकही उमेदवार उभा न करण्याची महत्त्वाची भूमिका बाळासाहेबांनी घेतली होती. बाळासाहेबांनी काँग्रेससाठी अनेक महत्त्वाच्या भूमिका घेतल्याचं मी त्यांना सातत्याने सांगितलं, असं शरद पवारांनी सांगितलं.
त्यानंतर राष्ट्रपती निवडणुकीत प्रतिभाताई पाटील यांना शिवसेनेनं जाहीर पाठिंबा दिला होता. त्यावेळी शिवसेनेशी बोलण्याची जबाबदारी काँग्रेसने माझ्यावर सोपवली होती. एनडीएमध्ये असतानाही शिवसेनेने प्रतिभा पाटील आणि प्रणव मुखर्जी यांना पाठिंबा दिला होता. ठाणे महापालिकेत बाळासाहेबांनी कशा प्रकारे काँग्रेसला सहकार्य केले होते, याची आठवण मी सोनिया गांधींना करुन दिली. तसेच राज्यातील काँग्रेस नेत्यांची अस्वस्थताही सोनिया गांधी यांना कळाली असावी. सगळीकडून शिवसेनेसोबत जाण्याचं वातावरण तयार झालं हे लक्षात आल्यानंतर सोनिया गांधी तयार झाल्या असाव्यात, असं शरद पवारांनी सांगितलं.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
