World Chocolate Day 2020 | चॉकलेटचा इतिहास काय? चॉकलेट खाणं फायद्याचं का आहे?
चॉकलेट हा अनेकांचा वीक पॉईंट असतो आणि चॉकलेट वरचं प्रेम व्यक्त करण्याचा दिवस म्हणजे 7 जुलै. चॉकलेट डे का साजरा केला जातो? चॉकलेटचा इतिहास काय हे जाणून घेऊया
मुंबई : आपल्या आयुष्यात एखादा आनंदचा प्रसंग घडला तर गोड पदार्थ खाऊन किंवा वाटून साजरा करतो. मग हा गोड पदार्थ कोणताही असू शकतो, पेढे, जिलेबी, शिरा किंवा अगदी चॉकलेट. चॉकलेट हा अनेकांचा वीक पॉईंट असतो आणि चॉकलेट वरचं प्रेम व्यक्त करण्याचा दिवस म्हणजे 7 जुलै.
दरवर्षी आजच्या दिवशी म्हणजेच 7 जुलैला जागतिक चॉकलेट दिवस साजरा केला जातो. परंतु यंदा कोरोनाच्या संकटामुळे या दिवसाचा गोडवा काहीसा कमी झालेला पाहायला मिळत आहे. वजन कमी करण्यासाठी बरेच जण गोड पदार्थ कमी खाणं कमी करतात, मग त्याच चॉकलेटही आलं. परंतु मूड चेंज करणारं चॉकलेट चविष्ट असतंच पण शरीरासाठी फायदेशीरही ठरु शकतं. 1550 मध्ये 7 जुलै रोजी युरोपमध्ये पहिल्यांदा चॉकलेट दिवस साजरा करण्यात आला. यानंतर संपूर्ण जगभरात हा दिवसा साजरा होऊ लागला.
चॉकलेटचा इतिहास असं म्हणतात की, चार हजार वर्षांपूर्वी चॉकलेटचा म्हणजे ज्या बियांपासून चॉकलेट बनवलं जातं, त्याचा शोध लागला. याचं झाड सगळ्यात आधी अमेरिकेत पाहिल्याचं सांगितलं जातं. या झाडाच्या फळांच्या बियापासून चॉकलेट बनवलं. सुरुवातीला अमेरिका आणि मेक्सिकोमध्ये यावर प्रयोग झाले. त्यानंतर 1528 मध्ये स्पेनच्या राजाने मेक्सिकोवर ताबा मिळवला. तिथे राजाला 'कोको' फार आवडलं आणि त्यानंतर राजाने कोकोच्या बिया मेक्सिकोतून स्पेनमध्ये आणल्या. तेव्हापासून तिथे चॉकलेट प्रचलित झालं, असं सांगितलं जातं.
सुरुवातीला चॉकलेटची चव तिखट होती. ही चव बदलण्यासाठी यामध्ये मध, व्हॅनिलासोबत इतरही पदार्थ एकत्रित करुन यापासून कोल्ड कॉफी बनवण्यात आली. मग डॉक्टर सर हॅन्स स्लोन यांनी द्रव स्वरुपात असलेलं चाऊन खाण्यायोग्य बनवलं आणि त्याला कॅडबरी मिल्क चॉकलेट असं नाव देण्यात आलं.
युरोपमध्ये बदलली चॉकलेटची चव 1828 मध्ये डच केमिस्ट कॉनराड जोहान्स वान हॉटन नावाच्या व्यक्तीने कोको प्रेस नावाचं यंत्र बनवलं. या यंत्राद्वारे कोकोची चव बदलण्यास यश आलं. 1848 मध्ये जे. एर फ्राई अँड सन्स या ब्रिटिश चॉकलेट कंपनीने पहिल्यांदा कोकोमध्ये बटर, दूध आणि साखर एकत्र करुन त्याला घट्ट चॉकलेटंच स्वरुप दिलं.
चॉकलेट खाण्याचे फायदे चॉकलेटमुळे आपल्या शरीराला वेगवेगळ्या प्रकारे फायदे होतात. यामधील नैसर्गिक तत्वे आपल्याला आनंदी आणि तजेलदार ठेवण्यास मदत करतं. विशेषत; चॉकलेटमधील ट्रिप्टोफॅन आपल्याला आनंदी आणि मेंदूमधील इंडॉरफिनच्या पातळीवर प्रभावशील ठरतं. चॉकलेटचं सेवन आपल्या हृदयासाठी सुद्धा उत्तम ठरतं. 'डार्क चॉकोलेट' खाण्यामुळे हृदयाच्या आजारांपासून दूर राहण्यास मदत होते.