Vomiting In Pregnancy : गर्भधारणेदरम्यान 'या' महिलांना सर्वात जास्त उलट्या होतात; यामागचं कारण नेमकं काय? जाणून घ्या
Vomiting In Pregnancy : गर्भधारणेदरम्यान साडेतीन महिन्यांनंतरही उलट्या होण्याची दोन मुख्य कारणे आहेत. त्यापैकी एक म्हणजे गर्भाशयात जुळी मुले असणे.
Vomiting In Pregnancy : गरोदरपणात महिलांना अनेक सामान्य समस्या जाणवू लागतात. यापैकी मूड स्विंग होणे, उलट्या होणे, पोटात मळमळणे यांसारख्या समस्या तर गरोदरपणात अगदी सामान्य आहेत. एक प्रकारे, ही लवकर गर्भधारणेची लक्षणे आहेत. कारण साधारणपणे गर्भधारणेच्या सहाव्या आठवड्यापासून ते तीन महिने पूर्ण होईपर्यंत उलट्यांची समस्या कायम राहते. तर काही महिलांना यापेक्षा जास्त दिवस उलट्या होऊ शकतात आणि काहींना संपूर्ण 9 महिने या समस्येचा सामना करावा लागू शकतो. तर काही महिलांना अजिबात उलट्या होत नाहीत. यापैकी कोणती परिस्थिती गरोदर महिलांसाठी चिंताजनक असू शकते किंवा कोणत्या परिस्थितीत सतर्क राहण्याची गरज आहे हे लक्षात घ्या.
गर्भधारणेदरम्यान उलट्या होणे योग्य आहे का?
जेव्हा एखादी स्त्री गरोदर असते, तेव्हा गर्भाशयात अंड्याचे फलित झाल्यानंतर ते गर्भाशयाच्या अस्तराला जोडते. त्यामुळे शरीरात एचसीजी नावाच्या हार्मोनचा स्राव वाढतो, त्यामुळे मळमळ आणि उलट्या सुरू होतात. त्यामुळे गरोदरपणात उलट्या होणे कोणत्याही समस्येशी संबंधित नाही. मात्र, या काळात मळमळ आणि उलट्या होण्याची इतर कारणे असू शकतात.
बहुतेक स्त्रियांना पहिल्या तीन महिन्यांत उलटीची समस्या भेडसावते, तर काही स्त्रियांना ही समस्या तीन महिन्यांपेक्षा थोडा जास्त काळ असू शकते. अशा परिस्थितीत घाबरून जाण्याची गरज नाही. हे पूर्णपणे सामान्य लक्षण आहे.
साडेतीन महिन्यांहून अधिक काळ उलट्या होत असताना तुम्हाला जास्त काळजी घ्यावी लागेल. ज्या महिलांबरोबर असे घडते, त्यामागे वेगवेगळी कारणे आहेत. तुम्हाला याबद्दल माहिती असेलच.
गरोदरपणात जास्त उलट्या होण्याची कारणे?
ज्या महिलांना गर्भधारणेच्या साडेतीन महिन्यांनंतरही उलट्या होत राहतात, त्यांच्या या स्थितीची दोन मुख्य कारणे आहेत. पहिले कारण म्हणजे एचसीजी हार्मोनचा जास्त प्रमाणात स्राव होणे आणि दुसरे प्रमुख कारण म्हणजे गर्भाशयात एकापेक्षा जास्त गर्भ असणे.
म्हणजेच, जेव्हा स्त्रीच्या पोटात जुळी किंवा त्याहून अधिक मुले वाढत असतात, अशा स्थितीतही उलट्यांचा त्रास बराच काळ किंवा कधी कधी संपूर्ण 9 महिने त्रासदायक ठरू शकतो. जर तुम्हाला गर्भधारणेदरम्यान जास्त उलट्या होत असतील तर त्याबद्दल वेळीच तुमच्या डॉक्टरांशी संपर्क साधा.
गरोदरपणात उलट्या होत नाहीत
जर तुम्ही तीन महिन्यांहून अधिक काळ गरोदर असाल आणि तुम्हाला मळमळ किंवा उलट्यांचा त्रास अजून झाला नसेल, तर काळजी करण्याची गरज नाही. कारण उलट्या होणे किंवा नाही, हे सर्व हार्मोन्सच्या पातळीवर अवलंबून असते. तुमच्या आरोग्याशी संबंधित अधिक माहितीसाठी डॉक्टरांशी बोला कारण तुमची शारीरिक तपासणी केल्यानंतर डॉक्टर तुम्हाला नेमके कारण सांगू शकतात.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.