Travel : पांढरा शुभ्र..स्वर्गाप्रमाणे भासणारा 'चेन्नई एक्सप्रेस' मधील 'हा' तोच लोकप्रिय धबधबा! आश्चर्यकारक तथ्यं जाणून वाटेल नवल
Travel : भारतातील हा धबधबा शाहरुख खान आणि दीपिका पादुकोण यांच्या 'चेन्नई एक्सप्रेस' या चित्रपटातही दाखवण्यात आला होता. त्यामुळे हा धबधबा पर्यटकांमध्ये खूप लोकप्रिय आहे.
Travel : पावसाळा आला की वेध लागतात ते मान्सून पिकनिकचे... कारण पावसात निसर्ग अगदी बहरलेला असतो. या निसर्गसुखाचा आनंद घेण्यासाठी माणसाने आपल्या व्यस्त जीवनातून स्वत:साठी वेळ काढला पाहिजे. जेणेकरून ताण-तणावापासून थोडे रिलॅक्स व्हाल. सध्या पावसाळा असल्याने निसर्गसौंदर्य खुललंय. पृथ्वीने जणू हिरवी चादर पांघरल्याप्रमाणे वाटते. तर काही ठिकाणी धबधब्यातील पाण्याचा खळखळणारा आवाज तुम्हाला सुख देऊन जातो. पावसाळ्यात जेव्हा निसर्गाचे सौंदर्य जवळून अनुभवायचे असते, तेव्हा अनेकांना धबधबे पाहायला आवडतात. देशातील विविध राज्यांमध्ये अनेक धबधबे आहेत, परंतु त्यापैकी काही खूप लोकप्रिय आणि प्रसिद्ध आहेत. यापैकीच एक म्हणजे दूधसागर धबधबा. हा भारतातील सर्वात सुंदर धबधब्यांपैकी एक मानला जातो. दूधसागर म्हणजे दुधाचा महासागर.
पावसाळ्यात धबधब्यांचे सौंदर्य अनेक पटींनी वाढते
दूधसागर धबधबा हा एक बारमाही धबधबा आहे, परंतु पावसाळ्यात या धबधब्याचे सौंदर्य अनेक पटींनी वाढते. दूधसागर धबधबा कर्नाटकच्या सीमेजवळ गोव्यातील संगेम जिल्ह्यात आहे. तर गोव्याची राजधानी पणजीपासून हा धबधबा 60 किमी अंतरावर आहे. हा धबधबा 1,000 फुटांपेक्षा जास्त उंचीवरून कोसळतो. हा धबधबा पाहण्यासाठी आणि त्यात भिजण्यासाठी लोक लांबून येतात. या धबधब्याशी निगडीत अनेक तथ्यं आहेत, जी जाणून घेतल्यावर तुम्हाला येथे नक्कीच भेट द्यायला आवडेल. तर, आज या लेखात आम्ही तुम्हाला दूधसागर धबधब्याशी संबंधित काही आश्चर्यकारक गोष्टी सांगत आहोत..
...तर असे नाव पडले
दूधसागर धबधबा म्हणजे दुधाचा महासागर. या नावामागे एक दंतकथा आहे. पौराणिक कथेनुसार, धबधब्याच्या सभोवतालच्या जंगलात राहणारी एक राजकुमारी या धबधब्याच्या पाण्यात स्नान करत असे. आंघोळीनंतर सोन्याच्या भांड्यातून साखर मिसळलेले दूध पीत असे. एके दिवशी तिने धबधब्याच्या परिसरात भटकंतीस आलेल्या एक राजकुमाराला पाहिले. त्यावेळी तिला लाज आली, आणि तिच्या सन्मानाचे रक्षण करण्यासाठी तिने दुधाचे सुवर्णभांडे आकाशात उडवले, त्यावेळी दूध खाली पडताच त्याठिकाणी एक दुधाचा पडदा तयार झाला. तेव्हापासून हा धबधबा सतत दुधाचा पडदा निर्माण करत आहे. असं म्हणतात.
सर्वात उंच धबधब्यांपैकी एक
अनेकजण त्यांच्या ट्रॅव्हल बकेट लिस्टमध्ये दूधसागर धबधबा याचा समावेश करतात. कारण हा धबधबा खूप उंच आहे. दूधसागर धबधब्याची उंची अंदाजे 310 मीटर म्हणजेच 1017 फूट आहे, ज्यामुळे तो भारतातील सर्वात उंच धबधब्यांपैकी एक आहे. हा धबधबा भारतातील पाचव्या क्रमांकाचा सर्वात उंच धबधबा आहे.
नैसर्गिक सौंदर्य अप्रतिम
हा धबधबा मांडोवी नदीवर आहे, जी पश्चिम घाटात उगम पावतो, हा धबधबा युनेस्कोच्या माहितीनुसार एक जागतिक वारसा स्थळ आहे. हे ठिकाण समृद्ध जैवविविधतेसाठी ओळखले जाते. एवढेच नाही तर भगवान महावीर वन्यजीव अभयारण्यात धबधबा असल्याने सभोवतालचा परिसर वैविध्यपूर्ण वनस्पती आणि प्राणी यांचे घर आहे. येथे तुम्हाला अनेक पक्ष्यांच्या प्रजाती, फुलपाखरे आणि हरीण आणि बिबट्यासारखे मोठे प्राणीही पाहायला मिळतात.
बॉलीवूडशीही संबंध काय?
दूधसागर धबधब्याचे बॉलिवूडशीही नाते आहे. हा धबधबा अनेक चित्रपटांमध्ये दाखवण्यात आला आहे. हा धबधबा शाहरुख खान आणि दीपिका पदुकोण अभिनीत चेन्नई एक्सप्रेस या बॉलीवूड चित्रपटातही दाखवण्यात आला होता. त्यामुळे हा धबधबा पर्यटकांमध्ये खूप लोकप्रिय असून दूरदूरहून लोक येथे भेट देण्यासाठी येतात.
हेही वाचा>>>
Monsoon Travel : आयुष्यात एकदा तरी पावसाळ्यात 'या' 5 रेल्वे मार्गांवर प्रवास कराच..! हा अनुभव स्वर्गसुखापेक्षा कमी ठरणार नाही
(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )