Shani Amavasya 2023 : एक असं गाव...जिथे घराच्या दरवाजांना कधीच कुलूप नसते! आज दिसणार भाविकांची मोठी गर्दी
Shani Amavasya 2023 : हे ठिकाण संपूर्ण भारतातील स्थानिक लोक आणि भाविकांमध्ये अत्यंत प्रसिद्ध आहे. आज शनि अमावस्येनिमित्त दिवसभर भाविकांची गर्दी पाहायला मिळणार आहे.
Shani Amavasya 2023 : आज सर्वपित्री अमावस्या (Sarva Pitri Amavasya 2023) आहे. ही अमावस्या शनिवारी आली असल्याने अहमदनगरच्या श्री क्षेत्र शनिशिंगणापूर (Shani Shingnapur) येथे भाविकांची मांदियाळी पाहायला मिळणार आहे. आज देशभरातुन लाखोंच्या संख्येने भाविक हे शनिशिंगणापूर येथे शनीदेवाच्या दर्शनासाठी दाखल होत असतात. अशातच नवरात्रोत्सव सुरू होतोय, त्यामुळे देवदर्शनासाठी भाविक हे ठिकठिकाणी भेटी देत असतात, त्यातच शनिवार आणि रविवार सुट्टी असल्याने शनिशिंगणापूर येथे दिवसभर भाविकांची गर्दी असणार आहे. भाविकांचा उत्साह आज दिवसभर शनिशिंगणापूर येथे असणार आहे.
या गावात घरांना दरवाजे किंवा कुलूप लावलेले नाहीत
शनि शिंगणापूर हे महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील एका गावाचे नाव आहे, हे गाव शनिदेवाच्या लोकप्रिय मंदिरासाठी ओळखले जाते. शिर्डीपासून 65 किलोमीटर अंतरावर असलेले शनी शिंगणापूर मंदिर हे प्रसिद्ध मंदिर आहे. हे मंदिर शनि ग्रहाशी संबंधित हिंदू देवता शनिदेव यांना समर्पित आहे. हे मंदिर संपूर्ण भारतातील स्थानिक लोक आणि भाविकांमध्ये अत्यंत प्रसिद्ध आहे. मंदिराव्यतिरिक्त शिंगणापूर हे एक छोटेसे गाव आहे, या संपूर्ण गावातील एकाही घराला दरवाजे नसून, या गावात चोरी होत नाही यासाठी प्रसिद्ध आहे. शनी शिंगणापूर हे एकमेव गाव म्हणून जगभरात ओळखले जाते. जिथे घरांना दरवाजे तसेच कुलूप बसवलेले नाहीत आणि सर्वात मनोरंजक गोष्ट म्हणजे गावात चोरी होत नाही. गावातील राष्ट्रीयकृत युको बँकेच्या शाखेच्या दारालाही कुलूप नाही. असे मानले जाते की, शनिदेवाने संरक्षित केलेल्या गावात चोर चोरी करू शकत नाहीत, जो कोणी चोरी करण्याचा प्रयत्न करतो त्याला दैवी शिक्षा मिळते.
ही देवता स्वयंभू..!
स्वयंभू म्हणजे स्वतःपासून निर्माण झालेली कोणतीही गोष्ट. भाविकांच्या मान्यतेनुसार, भगवान शनी स्वतः काळ्या दगडाच्या रूपात पृथ्वीवरून अवतरले होते. त्यामुळे येथील देवता स्वयंभू आहे असे म्हणतात. शनीदेवाची काळी मूर्ती कलियुगाच्या प्रारंभी काही मेंढपाळांना सापडल्याचे मानले जाते.
मंदिर मोकळ्या आकाशाखाली, पौराणिक कथा जाणून घ्या
शनि शिंगणापूर मंदिरातील शनिदेवाची मूर्ती खुल्या आकाशाखाली आहे. यामागे एक छोटीशी पौराणिक कथा आहे. या कथेनुसार, जेव्हा मेंढपाळांना ही मूर्ती सापडली तेव्हा त्या रात्री भगवान शनी मेंढपाळाच्या स्वप्नात प्रकट झाले. आणि त्याला मूर्तीची पूजा करण्याच्या पद्धती सांगितल्या. मग मेंढपाळांनी शनिदेवाला विचारले की त्यांनी मूर्तीसाठी मंदिर बांधायचे का? यावर शनिदेवाने उत्तर दिले की, त्यांना छताची गरज नाही. संपूर्ण आकाश माझे छत आहे. यामुळेच शनिदेवाची काळी मूर्ती आजही मोकळ्या आकाशाखाली आहे. असे म्हणतात
गर्भगृहात महिलांना प्रवेश दिला जात नव्हता
यापूर्वी शनि शिंगणापूर मंदिराच्या गर्भगृहात महिलांना प्रवेश दिला जात नव्हता. परंतु 26 जानेवारी 2016 रोजी तृप्ती देसाई (सामाजिक कार्यकर्त्या) यांच्या नेतृत्वाखाली 500 हून अधिक महिलांच्या गटाने मंदिराकडे मोर्चा वळवला. त्यांना मंदिराच्या गर्भगृहात प्रवेश करायचा होता, मात्र पोलिसांनी त्यांना रोखले. परंतु 30 मार्च 2016 रोजी मुंबई उच्च न्यायालयाने महाराष्ट्र सरकारला मंदिराच्या गाभाऱ्यात महिलांना प्रवेश देण्याचे आदेश दिले.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
Surya Grahan 2023 : सूर्यग्रहणात 'या' राशीच्या लोकांचे भाग्य उजळणार! चांगले दिवस येणार, ज्योतिषशास्त्रात म्हटंलय...