Sankashti Chaturthi 2023 : आज संकष्टी चतुर्थी! बाप्पाला करा प्रसन्न, पूजा करण्याची पद्धत, चंद्रोदयाची वेळ, महत्त्व जाणून घ्या
Sankashti Chaturthi 2023 : भगवान गणेश ही बुद्धिमत्ता, शक्ती आणि बुद्धीची देवता आहे. तो आपल्या भक्तांच्या सर्व अडचणी आणि अडथळे दूर करतो.
Sankashti Chaturthi 2023 : हिंदू धर्मात कोणतेही शुभ कार्य करण्यापूर्वी गणेशाची पूजा केली जाते. सर्व देवी-देवतांमध्ये पूजल्या जाणार्या गणपतीला पहिले मानले जाते. देवी-देवतांना प्रसन्न करण्यासाठी अनेक उपवास केले जातात. यापैकी श्रीगणेशासाठी संकष्टी चतुर्थी व्रत खूप लोकप्रिय आहे. चतुर्थी महिन्यातून दोनदा येते. संकष्टी चतुर्थीचे व्रत केल्यास सर्व मनोकामना पूर्ण होतात. अशी लोकांची धारणा आहे.
गणपतीची पूजा करण्याचा विशेष दिवस
संकष्टी चतुर्थी हा गणपतीची पूजा करण्याचा विशेष दिवस मानला जातो. या महिन्याची संकष्टी चतुर्थी 30 नोव्हेंबर रोजी म्हणजेच आज साजरी होत आहे. संकष्टी चतुर्थी म्हणजे संकटाचा पराभव करणारी चतुर्थी. या दिवशी गणपतीची पूजा केल्याने सर्व प्रकारच्या दुःखांपासून मुक्ती मिळते. चतुर्थीच्या दिवशी गौरीपुत्र गणेशाची पूजा करणे फार फलदायी असते. या दिवशी सूर्योदयापासून चंद्रोदयापर्यंत उपवास केला जातो.
संकष्टी चतुर्थीसाठी पूजा मुहूर्त
हिंदू पंचांगानुसार, मार्गशीर्ष महिन्याच्या कृष्ण पक्षाची चतुर्थी तिथी गुरुवार, 30 नोव्हेंबर रोजी दुपारी 2.24 पासून सुरू होईल, ती शुक्रवार 1 डिसेंबर रोजी दुपारी 3.31 वाजता समाप्त होईल. उदयतिथीच्या आधारे संकष्टी चतुर्थीचे व्रत 30 नोव्हेंबरला केले जाईल, कारण चतुर्थी तिथीचा चंद्रोदय ३० नोव्हेंबरलाच होत आहे. संकष्टी चतुर्थीला सकाळी पूजा केली जाईल. त्यावेळी शुभ योग राहील. त्या दिवशीचा शुभ मुहूर्त सकाळी 06.55 ते 08.14 पर्यंत आहे. लाभ-उन्नती मुहूर्त दुपारी 12.10 ते 01.28 पर्यंत आणि अमृत-सर्वोत्तम मुहूर्त दुपारी 01.28 ते 02.47 पर्यंत आहे.
गणाधिप संकष्टी चतुर्थी 2023 चंद्रोदय वेळ
30 नोव्हेंबर रोजी गणाधिप संकष्टी चतुर्थीच्या रात्री 07.45 वाजता चंद्रोदय होईल. यावेळी चंद्राला अर्ध्य अर्पण करून व्रत पूर्ण होईल, त्यानंतर पारणा होईल.
संकष्टी चतुर्थीची पूजा पद्धत
संकष्टी चतुर्थीच्या दिवशी गणपतीचा आशीर्वाद घेण्यासाठी पहाटे सूर्योदयापूर्वी उठून स्नान करून उपवासाचा संकल्प करावा. या दिवशी लाल रंगाचे कपडे घालणे खूप शुभ मानले जाते. स्वच्छ वस्त्र परिधान करून गणपतीची पूजा सुरू करावी. गणपतीची पूजा करताना व्यक्तीने आपले तोंड पूर्वेकडे किंवा उत्तरेकडे ठेवावे. गणपतीची मूर्ती फुलांनी सजवा. पूजेच्या वेळी तीळ, गूळ, लाडू, फुले, तांब्याच्या कलशात पाणी, धूप, चंदन, केळी किंवा नारळ प्रसाद म्हणून ठेवावे.
दुर्गादेवीची मूर्ती ठेवणे अत्यंत शुभ
गणपतीच्या पूजेच्या वेळी दुर्गादेवीची मूर्ती जवळ ठेवणे अत्यंत शुभ मानले जाते. गणपतीला चंदनाचा टिळा लावावी, फुले, पाणी अर्पण करावे. संकष्टीच्या दिवशी गणेशाला लाडू आणि मोदक अर्पण करावेत. गणपतीच्या मंत्राचा जप करावा. उपवास करणाऱ्यांनी पूजेनंतर फक्त फळे, शेंगदाणे, खीर, दूध किंवा साबुदाणा खावा. संध्याकाळी, चंद्र उगवण्यापूर्वी, गणपतीची पूजा करा आणि संकष्टी व्रत कथा पाठ करा. रात्री चंद्र पाहिल्यानंतरच उपवास सोडला जातो.
संकष्टी चतुर्थीचे महत्व
संकष्टीच्या दिवशी गणपतीची पूजा केल्याने घरातील नकारात्मक प्रभाव दूर होतो आणि शांतता कायम राहते. असे म्हटले जाते की, श्रीगणेश घरातील सर्व संकटे दूर करतात आणि व्यक्तीच्या मनोकामना पूर्ण करतात. या दिवशी चंद्र दिसणे खूप शुभ मानले जाते. सूर्योदयापासून सुरू होणारे हे व्रत चंद्रदर्शनानंतर संपते.
महाराष्ट्रातील महत्त्वाच्या शहरातील चंद्रोदयाच्या वेळा
मुंबई 8.35 रात्री
पुणे 8.35 रात्री
नाशिक 8.31 रात्री
नागपूर 8.07 रात्री
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा :