Ashadhi Wari : संत निवृत्तीनाथांच्या पालखीचे राहुरीकडे प्रस्थान, तर मुक्ताबाईंची पालखी आज अंबड मुक्कामी
Ashadhi Wari : संत निवृत्तीनाथांची पालखी 2 जून रोजी निघालेली असून हजारो वारकऱ्यांचा पायी प्रवासाचा आजचा दहावा दिवस आहे.
Sant Nivruttinath Palkhi : 'विठाई माझी, माझी विठाई, माझे पंढरीचे आई, ज्ञानोबा माऊली तुकाराम, हो, हो माझा ज्ञानोबा' अशा असंख्य अभंगांनी पंढरीची वारी भक्तिरसात न्हाहून निघाली आहे. अशा भक्तिमय वातावरणात संत श्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज पालखी (Sant Nivruttinath Palkhi) नगर जिल्ह्यात असून कालच्या बेलापूर येथील मुक्कामानंतर दिंडीने राहुरीकडे प्रस्थान केले आहे. तर काल काजळा फाटा इथे मुक्कामी असलेली मुक्ताबाईंची पालखीचं आज सकाळी मुक्कामाच्या ठिकाणाहून बाहेर पडत अंबड मुक्कामी असणार आहे.
पंढरपुरला विठुरायाच्या दर्शनासाठी लाखो भाविक पायी वारी करीत आहेत. भक्तीत तल्लीन झालेले वारकरी, अभंगांच्या गोडीने अन् विठ्ठलाच्या ओढीने एक एक पाऊल पंढरीच्या दिशेने टाकत आहेत. संत मुक्ताबाईंसह (Sant Muktabai) संत निवृत्तीनाथांची पालखी 2 जून रोजी निघालेली असून हजारो वारकऱ्यांचा पायी प्रवासाचा आजचा दहावा दिवस आहे. ज्या ज्या ठिकाणी पालखी थांबते आहे, त्या ठिकाणी स्वागत करून दुसऱ्या दिवशी गावासह इतर परिसरातील वारकरी दिंडीत सामील होत आहेत. नगर जिल्ह्यातील बेलापूर येथे मुक्कामी असलेली संत निवृत्तीनाथांची पालखी पुढे राहुरी तालुक्याकडे मार्गस्थ झाली आहे. आज बेलापूर येथून निघून पुढे प्रवरा मार्गे मार्गक्रमण करत राहुरी मुक्कामी प्रस्थान करणार आहे.
लांबवरून दिसणाऱ्या भगव्या पताका, दिंडी पालखी, अभंगाचा आवाज, विठुरायाच्या सुरू असलेला गजर या भक्तिमय वातावरणात दिंडी मार्गावरील भाविक आनंदून जात आहेत. विठुरायाच्या दर्शनासाठी राज्यभरातून लाखो भाविक विविध दिंड्यांच्या माध्यमातून पंढरपूरकडे रवाना झाले आहेत. यात संत निवृत्तीनाथांच्या दिंडीसह जळगाव (Jalgaon) जिल्ह्यातील मुक्ताईनगर येथून निघालेली संत मुक्ताबाईंची पालखी काल काजळा फाट्यावर दिंडी मुक्कामी होती. आज पालखीचा नववा दिवस असून मुक्कामाच्या ठिकाणाहून पालखीने प्रस्थान करत दिंडी पुढे मार्गस्थ झाली आहे. तर दुपारी शेवगाव पाटी येथे दुपारचा विसावा घेणार आहे. त्यानंतर संत मुक्ताबाईंची दिंडी याच मार्गाने पुढे अंबड गावातील चौंडेश्वरी देवी संस्थानच्या निवारागृहात विसावा घेणार आहे.
आज पालख्यांचा मुक्काम कुठे?
संत निवृत्तीनाथांची पालखी आज बेलापूर बुद्रुक येथून पायमार्गाने बेलापूर खुर्द, प्रवरा देवळाली या गावावरून जाणार आहे. तर दुपारचे जेवण प्रवरा काठी होणार आहे. तर मुक्कामासाठी संत निवृत्तीनाथांची दिंडी राहुरी येथे जाणार आहे. संत मुक्ताबाईंची पालखी आज काजळा फाटा येथून मार्गस्थ होऊन पायी मार्गक्रमण करणार आहे. या दरम्यान दुपारी शेवगाव पाटी येथील संत मुक्ताबाईं पालखी मंडळाकडून दिंडीला दुपारचे जेवण दिले जाणार आहे. त्यांनतर दिंडीचे मुक्कामाचे ठिकाण अंबड गावी असणार आहे.