(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Ashadhi Wari 2023 : नाथांची पालखी सोलापूर जिल्ह्यात; आज संजीवनी समाधी मंदिरात होणार संतभेट
Ashadhi Wari 2023 : नाथांच्या पालखी सोहळ्याचा पंधरावा मुक्काम सोलापूरच्या माढा तालुक्यातील अरण येथील श्रीसंत सावता महाराज यांच्या मळ्यात होणार आहे.
Ashadhi Wari 2023 : आषाढी एकादशीच्या निमित्ताने पैठण येथून निघालेली संत एकनाथ महाराजांची (Sant Eknath Maharaj) पालखी मराठवाड्यातून आता सोलापूरमध्ये दाखल झाली आहे. दरम्यान सोलापूर जिल्ह्यात देखील ठिकठिकाणी नाथांच्या पालखीचं मोठ्या उत्साहाने स्वागत केले जात आहे. तर नाथांच्या पालखी सोहळ्याचा पंधरावा मुक्काम सोलापूरच्या माढा तालुक्यातील अरण येथील श्रीसंत सावता महाराज यांच्या मळ्यात होणार आहे. त्यामुळे आज संतभेट होणार आहे.विशेष म्हणजे यावेळी मोठ्या संख्येने भाविकांची उपस्थिती असण्याची शक्यता आहे.
श्री संत एकनाथ महाराज पालखी सोहळ्याचा पंधरावा मुक्काम श्रीसंत सावता महाराज यांच्या मळ्यात (अरण, ता. माढा) येथे असून यावेळी श्रीसंत एकनाथ महाराज व श्रीसंत सावता महाराज यांच्या संजीवनी समाधी मंदिरात संतभेट सोहळा होणार आहे. याप्रसंगी पालखी सोहळ्याचे प्रमुख नाथवंशज रघुनाथबुवा गोसावी पालखीवाले, योगेश महाराज गोसावी पालखीवाले यांच्या प्रमुख उपस्थितीत विविध मान्यवर महाराज मंडळी यांचे चक्री कीर्तन होईल.
रेल्वे पटरी वारकऱ्यांनी रथासह ओलांडली
श्रीसंत एकनाथ महाराज पालखी सोहळ्याच्या मार्गावर असलेल्या सोलापूर जिल्ह्यातील कुडू परिसरातील रेल्वे पटरी वारकऱ्यांनी रथासह ओलांडली. यावेळी कुर्डुवाडी रेल्वे प्रशासन व पोलिस विभागाकडून योग्य ते खबरदारी घेण्यात आली.श्रीसंत एकनाथ महाराज पालखी सोहळ्याचा तेरावा मुक्काम बिटरगाव येथील गुरुवारी पंचक्रोशीत झाल्यानंतर चौदाव्या मुक्कामासाठी सकाळी संत एकनाथ महाराज पालखी सोहळ्याचे प्रस्थान कव्हेदंड येथे करण्यात आले. तर पालखी सोहळ्याचे चौथी रिंगण भानुदास एकनाथ जयघोषात मोठ्या उत्साहात झाले. दुपारनंतर हा सोहळा पारंपरिक पालखी मार्गावरील महादेववाडी ते कुर्डुकडे प्रस्थान केल्या जातो. मात्र या मार्गावरील रेल्वे पटरी असल्यामुळे येथे उड्डाणपूल उभारावा या मागणीसाठी यापूर्वी आंदोलनदेखील झाले आहे. दिंडी नियोजन बैठकीत अनेक वेळेस निवेदन दिलेले आहे. रेल्वे प्रशासनाने या मागणीकडे दुर्लक्ष केल्याने यंदा देखील आषाढी वारी सोहळ्यासाठी प्रस्थान झालेल्या श्री संत एकनाथ सोहळ्यातील रथासह वारकऱ्यांनी या पालखी मार्गावरील रेल्वे पटरी ओलांडली. कुर्डुवाडी रेल्वे प्रशासनाकडून कुर्डु गावाला जाण्यासाठी दरवर्षीप्रमाणे यंदा देखील तात्पुरत्या स्वरूपात रेल्वे पटरी ओलांडण्याची व्यवस्था करून देण्यात आली.
यावेळी कुर्डुवाडी रेल्वे विभागाचे अधिकारी, कर्मचारी यांच्यासह रेल्वे सुरक्षा रक्षक, माढा पोलिस विभागातर्फे योग्य ते खबरदारी घेण्यात आली होती. सायंकाळी पालखी सोहळा मुक्कामासाठी कुई पंचक्रोशीत दाखल झाला यावेळी गावकऱ्यांच्या वतीने मोठ्या उत्साहात वारकऱ्यांचे स्वागत केले आहे. परिसरातील नागरिकांची दर्शनासाठी गर्दी झाली होती.
इतर महत्वाच्या बातम्या: