Mumbai Travel : पावसाळ्यात लांब फिरायला वेळ कुठंय? मुंबईतच नालासोपाऱ्यात असलेली 'ही' ऑफबीट ठिकाणं तुम्हाला भुरळ घालतील
Mumbai Travel : नालासोपारा हे एक असे ठिकाण आहे, जिथे इतिहास, संस्कृती आणि निसर्ग यांचा अनोखा मिलाफ पाहायला मिळतो. येथे तुम्ही तुमच्या मित्र आणि कुटुंबासमवेत ट्रीप प्लॅन करू शकता.
Mumbai Travel : बदलती जीवनशैली, कामाचा ताण, अनेक जबाबदाऱ्यांमुळे अनेकांना स्वत:साठी वेळ देता येत नाही. परंतु पावसाळा हा असा एक ऋतू आहे. की त्या दिवसात प्रत्येकाला फिरण्याची इच्छा असते. थोडा वेळ का होईना व्यस्त काम बाजूला सारून निसर्गाच्या सानिध्यात, पावसाच्या पाण्याचे थेंब झेलत ओलेचिंब होण्यात एक वेगळीच मजा असते. म्हणूनच लांब न जाता मुंबईतच अशी काही ठिकाणं आहेत. जिथे गेल्यानंतर तुम्हाला फ्रेश झाल्यासारखं वाटेल.
नालासोपाऱ्यातील काही प्रसिद्ध ठिकाणं जाणून घ्या...
मुंबईतील नालासोपारा हे नाव तुम्ही ऐकले असेलच. हे मुंबईच्या उत्तरेस 45-50 किलोमीटर अंतरावर आहे आणि हे शहर वसई-विरार अंतर्गत येते. हा परिसर मुख्यत्वे रहिवासी परिसर आहे, त्यामुळे येथे भेट देण्यासारखे काही नसेल असे लोकांना वाटते. म्हणूनच बहुतेक लोक याचा विचार करून या ठिकाणी फिरायला जात नाहीत. आज आम्ही तुम्हाला नालासोपाऱ्यातील काही प्रसिद्ध ठिकाणांची सविस्तर माहिती देणार आहोत.
नालासोपारा तलाव
शहराच्या गोंगाटापासून दूर असलेल्या शांत ठिकाणी जायचे असेल तर तुम्ही नालासोपारा तलाव या ठिकाणी फिरायला जाऊ शकता. हा तलाव स्थानिक लोक आणि पर्यटकांसाठी प्रमुख आकर्षण आहे. सकाळ-संध्याकाळ येथे लोक शांततेत वेळ घालवण्यासाठी येतात. तलावाच्या आजूबाजूला पसरलेली हिरवळ आणि पाण्यावर पडणारी सूर्यकिरणं हे सुंदर आणि मनमोहक दृश्य तुम्हाला अनुभवता येईल. हा तलाव एक प्रसिद्ध पिकनिक स्पॉट आहे, जिथे लोक त्यांच्या कुटुंबासह एकटे वेळ घालवण्यासाठी जातात. तलावाभोवती फिरणे, नौकाविहार आणि इतर गोष्टी करण्याची संधी मिळेल.
बौद्ध स्तूप
नालासोपारा येथील बौद्ध स्तूप हे ऐतिहासिक आणि सांस्कृतिक दृष्टिकोनातून पाहण्यासाठी एक चांगले ठिकाण आहे. हा स्तूप बौद्ध कला आणि वास्तुकलेचा उत्तम नमुना सादर करतो. बौद्ध धर्माच्या अनुयायांसाठी हे एक आदरणीय स्थान आहे. विविध सणांना येथे विविध धार्मिक कार्यक्रम आणि उपक्रमही होतात. पुरातत्व आणि इतिहासाची आवड असणाऱ्यांसाठीही हे ठिकाण आकर्षणाचे केंद्र आहे. असे मानले जाते की, येथे उत्खननात एका प्राचीन बौद्ध स्तूपाचे अवशेष सापडले आहेत, ज्यामध्ये स्तूपाचा पाया, दगडी शिलालेख आणि इतर बौद्ध धार्मिक चिन्हे सापडली आहेत. हे महाराष्ट्रातील सर्वोत्तम ठिकाणांपैकी एक आहे.
कळंब बीच
नालासोपारा येथील नैसर्गिक सौंदर्य लोकांना या बीचकडे आकर्षित करते. इथले स्वच्छ आणि शांत वातावरण, समुद्राच्या लाटा आणि हलक्या थंड वाऱ्यामुळे तुमचा दिवस आरामशीर जाईल. लोकांना पिकनिक आणि हायकिंगसाठी संपूर्ण कुटुंबासह येथे यायला आवडते. कळंब बीचच्या आसपास अनेक हॉटेल्स, रेस्टॉरंट्स आणि पर्यटन सुविधा आहेत. त्यामुळे 2 दिवसांच्या सहलीचे नियोजन करूनही तुम्ही येथे येऊ शकता.
हेही वाचा>>>
Women Safety Travel : महिलांसाठी 'ही' हिल स्टेशन्स मानली जातात सुरक्षित, Solo Trip साठी बेस्ट .
(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )