(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Health Tips : सावधान! पावसाळ्यात वाढू शकतो मधुमेहाचा धोका; आजाराला टाळण्यासाठी 'अशी' घ्या काळजी
Diabetes Health In Monsoon : पावसाळ्यात मधुमेहाचे रुग्ण आजारी पडण्याची शक्यता जास्त असते कारण यावेळी हवामानात चढ-उतार पाहायला मिळतात.
Diabetes Health In Monsoon : पावसाळ्याला चांगलीच सुरुवात झाली आहे. कडक उन्हाळ्यानंतर पाऊस हा खरंतर सुखद आनंद देणारा असतो. पण पावसाळा हा आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत धोकादायक ठरू शकतो. कारण तो अनेक संसर्गजन्य आजारांना सोबत घेऊन येतो. विशेषत: जे लोक आधीच आजारी आहेत, त्यांच्या आरोग्यासाठी हा ऋतू अत्यंत संवेदनशील असू शकतो. मधुमेहाचे रुग्णही याच ऋतूत सर्वाधिक आजारी पडतात. खरंतर मधुमेहाचे रुग्ण संसर्गजन्य आजारांना लवकर बळी पडतात, त्यामुळे या रुग्णांना पावसाळ्यात आरोग्याची विशेष काळजी घेण्याचा सल्ला दिला जातो.
मधुमेहाच्या रुग्णांसाठी पावसाळा धोकादायक का?
तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, पावसाळ्यात मधुमेहाचे रुग्ण आजारी पडण्याची शक्यता जास्त असते. कारण यावेळी हवामानात चढ-उतार पाहायला मिळतात. याशिवाय जलप्रदूषण, शिळे अन्न, घाण पाणी यामुळे होणारे अनेक आजारही या रुग्णांसाठी धोकादायक ठरतात. त्यामुळे या ऋतूमध्ये मधुमेहाच्या रुग्णांनी आपल्या आरोग्याबाबत गाफील राहू नये.
पावसाळ्यात मधुमेहाचे रुग्ण 'या' आजारांना बळी पडू शकतात
आरोग्य तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, मधुमेहाच्या आजारात, रुग्ण लवकरच जिवाणूजन्य आजाराच्या विळख्यात येतात. अशा परिस्थितीत जर तुम्हाला मधुमेह असेल तर बुरशी, त्वचेचा संसर्ग आणि पचनाशी संबंधित आजारांपासून बचाव करणे आवश्यक आहे. याशिवाय कमकुवत प्रतिकारशक्तीचाही मधुमेहाच्या रुग्णांना त्रास होतो आणि पावसाळ्यात कमकुवत प्रतिकारशक्ती असलेले मधुमेहाचे रुग्ण लवकरच संसर्गजन्य आजारांना बळी पडतात. अशा स्थितीत डेंग्यू, चिकुनगुनिया, पायात बुरशीजन्य संसर्ग, अपचन, जुलाब याबरोबरच त्वचा संसर्गाचा धोका साखर रुग्णांना सतावू शकतो.
पावसाळ्यात मधुमेहाच्या रुग्णांनी 'अशी' काळजी घ्यावी
मधुमेहाच्या रुग्णांनी पावसाळ्यात ताजे अन्न खावे आणि स्वच्छ पाणी प्यावे. पाणी उकळून प्यावे. या दरम्यान तुमची प्रतिकारशक्ती मजबूत ठेवा जेणेकरून बॅक्टेरियाचे आजार तुमच्या आजूबाजूला पसरणार नाहीत. यासाठी रोगप्रतिकारशक्ती वाढवणारे मसाले आणि भाज्यांचे सेवन योग्य राहील याची काळजी घ्या. बाहेरचे अन्न खाणे टाळा कारण अन्न नीट शिजले नाही किंवा शिळे झाले तर तुम्ही अतिसाराचा बळी होऊ शकता. बुरशीजन्य संसर्ग टाळण्यासाठी चांगल्या दर्जाचे चप्पल, सॅंडल घालूनच बाहेर जा. डासांपासून बचाव करणे आवश्यक आहे कारण कमकुवत प्रतिकारशक्तीमुळे डेंग्यूचा धोका जास्त असू शकतो. सतत पाणी पीत राहा आणि शारीरिक व्यायामाकडेही लक्ष द्या.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.
महत्त्वाच्या बातम्या :