Mahashivratri 2023 : महाशिवरात्रीनिमित्त गरोदर महिला उपवास करत आहात? 'ही' काळजी घ्या
Health Tips : 3 महिन्यांपेक्षा कमी गरोदर असलेल्या महिलांनी उपवासाचा विचारही करू नये, जरी तुमची केस अगदी सामान्य आहे, तर तुम्ही तज्ञांच्या सल्ल्याने उपवास करू शकता.

गर्भवती महिलांसाठी उपवास कितपत योग्य आहे?
बहुतेक डॉक्टर गरोदरपणात कोणत्याही प्रकारचे उपवास न ठेवण्याचा सल्ला देतात. तीन महिन्यांपेक्षा कमी गरोदर असलेल्या महिलांनी उपवासाचा विचारही करू नये कारण सुरुवातीच्या महिन्यांत महिलांना उलट्या, अस्वस्थता, डोकेदुखी, अशक्तपणा, मळमळ यांसारख्या समस्या उद्भवू शकतात. अशा स्थितीत उपवास ठेवल्यास अडचणी वाढू शकतात.
याशिवाय, तिसऱ्या तिमाहीत उपवास करणे देखील सुरक्षित मानले जात नाही, जर तुम्हाला अशक्तपणा असेल किंवा मधुमेहासारखी समस्या असेल तर तुम्हाला उपवास ठेवण्याचा सल्ला दिला जात नाही. पण जर तुम्हाला कोणतीही अडचण नसल्यास तज्ज्ञांच्या सल्ल्याने उपवास करू शकता. या दरम्यान तुम्हाला ही सर्व काळजी घेणे गरजेचे आहे.
गरोदर महिलांनी उपवास करताना 'या' गोष्टी लक्षात ठेवाव्यात
- तुम्ही कितीही उपवास करत असलात तरी निर्जल उपवास ठेवू नये.
- दर 2 तासांच्या अंतराने थोडं-थोडं खात राहा. उपवासात नारळपाणी, ज्यूस यांसारख्या अधिकाधिक द्रव पदार्थ घ्या जेणेकरून शरीराला पोषक तत्वे मिळतील.
- भरपूर पाणी प्या, त्यामुळे डिहायड्रेशनची समस्या उद्भवणार नाही.
- तळलेले पदार्थ टाळा. अधिक पौष्टिक पदार्थ खा, चहा-कॉफीचे जास्त सेवन करू नका.
- दिवसभरात 2 ते 3 अशी फळे खा जी तुम्हाला ऊर्जा देतील.
- सैंधव मिठाचे (रॉक सॉल्ट) सेवन करा, यामुळे अशक्तपणा दूर होतो.
- उपवास करताना तुमच्या बाळाच्या हालचालींची काळजी घ्या, तुम्हाला काही त्रास जाणवल्यास ताबडतोब डॉक्टरांशी संपर्क साधा.
- साबुदाणा, बाजरी, नाचणी यांसारखी ऊर्जा आणि फायबर देणारे संपूर्ण धान्य निवडा.
- फळे, दूध आणि काजू यांसारख्या फायबर आणि प्रथिनांच्या चांगल्या स्रोताने दिवसाची सुरुवात करा. नाश्त्यासाठी मिल्कशेक निवडा.
- जास्त साखर किंवा मीठ खाऊ नका, कारण ते शरीरातील पाणी काढून टाकू शकते.
- अपचन, बद्धकोष्ठता, मळमळ, उलट्या, थकवा, डोकेदुखी, चक्कर येणे, रक्तदाब आणि हृदयाचे ठोके कमी होत असल्यास उपवास ठेवू नका, अशा स्थितीत लगेच डॉक्टरांचा सल्ला घ्या.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.
महत्त्वाच्या बातम्या :
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
