Happiness : 'जगी सर्व सुखी असा कोण आहे? जगात 'या' 9 देशांचे लोक सर्वाधिक दु:खी, भारताचा क्रमांक वाचून आश्चर्यचकित व्हाल...
Happiness : सर्वात दुखी देशांच्या यादीत भारताची क्रमवारी थोडी निराशाजनक आहे, तर अफगाणिस्तानचे नाव प्रथम येते
Lifestyle : सुख-दु:खाचे महत्त्व सांगताना, 'जगी सर्व सुखी असा कोण आहे? विचारी मना तूचि शोधून पाहे' असं रामदास स्वामींनी म्हटलंय. तसेच "ही वेळ पण निघून जाईल" हे वाक्य तुम्हाला दुःखात खचून देणार नाही, आणि सुखात भरकटू देणार नाही. महाभारत युद्धाच्या वेळी श्रीकृष्णाने अर्जुनाला काही उपदेश दिले, त्यानंतर अर्जुनाने कौरवांचा पराभव केला. महाभारताचे युद्ध हे वाईटावर चांगल्याचा विजय मानले जाते. तर आचार्य चाणक्यही म्हणतात की, माणसाला जीवनात अनेक प्रकारच्या परीक्षा द्याव्या लागतात. वाईट काळात माणसाला त्याच्या धैर्याची परीक्षा द्यावी लागते. अशी अनेक उदाहरणं आपल्याकडे आहेत. अशातच जगभरात केलेल्या अभ्यासाद्वारे दरवर्षी जागतिक आनंद अहवाल म्हणजेच वर्ल्ड हॅपीनेस रिपोर्ट (World Happiness Report) प्रसिद्ध केला जातो. ज्याच्या आधारे जगातील सर्वात आनंदी आणि सर्वात दुःखी देशांची क्रमवारी निश्चित केली जाते. सर्वात दुखी देशांच्या यादीत अफगाणिस्तानचे नाव प्रथम येते. या अहवालात भारताची क्रमवारी थोडी निराशाजनक आहे, भारताचा क्रमांक जाणून तुम्हाला आश्चर्य वाटेल. जाणून घ्या
'वर्ल्ड हॅपीनेस रिपोर्ट' कोणत्या आधारावर तयार केला जातो?
वर्ल्ड हॅपीनेस रिपोर्ट हा दरवर्षी प्रसिद्ध केला जातो. यंदाच्या अहवालात कोणते देश सर्वात आनंदी आहेत? तर कोणते देश सर्वात दुःखी आहेत? हे सांगण्यात येते. जागतिक स्तरावर आनंदाची पातळी निश्चित करण्यासाठी अनेक गोष्टी विचारात घेतल्या जातात, ज्यामध्ये लोकांचे स्वातंत्र्य, आरोग्य, भ्रष्टाचार, उत्पन्न इत्यादींचा समावेश होतो. सर्वात दुखी देशांच्या यादीत अफगाणिस्तान पहिल्या क्रमांकावर आहे. हा अहवाल तयार करताना प्रामुख्याने 6 गोष्टी लक्षात ठेवल्या जातात. त्या म्हणजे सामाजिक सुरक्षा, आरोग्य, उत्पन्न, स्वातंत्र्य, लोकांमध्ये उदारतेची भावना आणि भ्रष्टाचाराचा अभाव. माणसाला आनंदी राहण्यासाठी या सर्व गोष्टी आवश्यक आहेत. जो देश या सर्व बाबींची पूर्तता करत नाही किंवा कमी गुण मिळवतो तो देश सर्वात दुःखी मानला जातो.
जगातील 9 सर्वात दुःखी देश
अफगाणिस्तान
137 देशांच्या यादीत सर्वात खालच्या स्थानावर अफगाणिस्तान हा देश जगातील सर्वात दुःखी देश आहे. तालिबान राजवटीत, अफगाणिस्तान गरिबी आणि उपासमारीने संघर्ष करत आहे. अफगाणिस्तानातील लोकांना महागाई, बेरोजगारी आणि तालिबानच्या क्रूर राजवटीत निराशाचे जीवन जगावे लागत आहे.
लेबनॉन
सर्वाधिक दुःखी देशांच्या यादीत लेबनॉन दुसऱ्या क्रमांकावर आहे. हा देश सामाजिक-राजकीय अशांतता आणि आर्थिक अस्थिरतेचा सामना करत आहे. जेथे लोक समाज आणि सरकारवर नाराज आहेत.
सिएरा लिओन
सर्वात दुःखी देशांच्या यादीत सिएरा लिओन हा देश जगात तिसऱ्या आणि आफ्रिकेत पहिल्या क्रमांकावर आहे. येथील आर्थिक परिस्थिती अत्यंत बिकट असून, राजकीय अस्थिरतेमुळे लोकांमध्ये असंतोषाची भावना आहे. सामाजिक संकटाशी झगडणाऱ्या या देशातील नागरिकांना त्यांच्या अन्नाची गरजही भागवता येत नाही.
झिंबाब्वे
वर्ल्ड हॅपीनेस रिपोर्टमध्ये झिम्बाब्वे चौथ्या स्थानावर आहे. झिम्बाब्वेलाही सध्या अनेक आव्हानांचा सामना करावा लागत असल्याने तेथील लोकांमध्ये दु:ख आणि निराशा आहे.
काँगो
गेल्या काही काळापासून संघर्ष, राजकीय गोंधळ, हुकूमशाही राजवट आणि लोकांच्या जबरदस्तीने स्थलांतराचा सामना करत असलेला काँगो देश सर्वात दुःखी देशांच्या यादीत पाचव्या स्थानावर आहे. सर्व बाजूंनी आव्हानांनी वेढलेल्या काँगो देशाचे लोक त्यांच्या देशातील परिस्थितीबद्दल असमाधानी आणि निराश आहेत.
बोत्सवाना
बोत्सवानामध्ये राजकीय-सामाजिक स्थैर्याचाही अभाव आहे. ज्यामुळे लोक समाधानी नाहीत आणि हा देश सर्वात दुःखी देशांच्या यादीत सहाव्या स्थानावर आहे.
मलावी
वाढती लोकसंख्या, नापीक जमीन आणि सिंचन सुविधांचा अभाव अशा अडचणींचा सामना करत असलेला मलावी दुखी देशांच्या यादीत सातव्या क्रमांकावर आहे. इथल्या लोकांकडे अन्नधान्याचा तुटवडा आहे आणि अर्थव्यवस्थेची अवस्था बिकट आहे. मर्यादित संसाधनांमध्ये वाढत्या लोकसंख्येच्या ओझ्याने दबलेल्या मलावीच्या लोकांमध्ये निराशा आहे.
कोमोरोस
कोमोरोस देश हा 8 वा सर्वात दुखी देश आहे. हा देश इतका अस्थिर आहे की त्याला 'कूप कंट्री' म्हणतात. सामाजिक-राजकीय अस्थिरतेमुळे येथील लोक कमालीच्या निराशेच्या अवस्थेत आहेत.
टांझानिया
आर्थिक, सामाजिक आणि राजकीय अस्थिरतेचा सामना करत असलेला टांझानिया सर्वाधिक दुःखी देशांच्या यादीत 9व्या स्थानावर आहे.
भारताचा क्रमांक आश्चर्यकारक!
या यादीत भारताचा समावेश नसला तरी दु:खाच्या बाबतीत देशाची स्थिती फारशी चांगली नाही. 137 देशांच्या यादीत 12 व्या क्रमांकावर आहे, म्हणजेच तो जगातील 12 व्या क्रमांकाचा दुःखी देश आहे. जागतिक स्तरावर भारत एक उदयोन्मुख अर्थव्यवस्था म्हणून वेगाने उदयास येत असला तरी या देशातील लोक काही मुद्द्यांबाबत दु:खी आहेत.
(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )
हेही वाचा>>