(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Kids Eyesight : मुलांच्या डोळ्यांच्या समस्या वाढण्यामागे 'ही' कारणे असण्याची शक्यता; चष्म्याचा नंबर कमी करण्यासाठी 'हे' पदार्थ ठरतील फायदेशीर
Kids Eyesight : आजकाल, वाढत्या स्क्रीनच्या वेळेमुळे, मुलांसाठी चष्मा घालणे सामान्य झाले आहे. यामागे इतरही अनेक कारणे असू शकतात.
Kids Eyesight : पूर्वीच्या काळी कमकुवत दृष्टी हा वृद्धांचा आजार मानला जात होता, पण आता लहान मुलांनी लहान वयातच चष्मा लावायला सुरुवात केली आहे. किंबहुना, मोठ्यांसोबतच मुलंही आपला जास्तीत जास्त वेळ मोबाईल, कॉम्प्युटर, लॅपटॉप यासारख्या गॅजेट्सच्या वापरात घालवतात. स्क्रीनवर जास्त वेळ डोळे लावून राहिल्याने दृष्टी कमजोर होणे, डोळा दुखणे, डोकेदुखी, खाज सुटणे आणि डोळ्यांमध्ये जळजळ होणे यांसारख्या समस्या उद्भवू शकतात. यामुळेच अनेक मुले लहान वयातच चष्मा घालतात. मात्र, यामागे इतरही अनेक कारणे असू शकतात.
मुलांची कमकुवत दृष्टी ही खरोखरच कोणत्याही पालकांसाठी अत्यंत चिंतेची बाब असते. यामागील कारण जाणून घेतल्यानंतर काही गोष्टी लक्षात ठेवल्या तर लहान वयातच डोळे कमकुवत होण्यापासून वाचता येऊ शकतात.
पौष्टिक कमतरता
मुलांचे डोळे कमजोर होण्यामागे पोषणाचा अभाव हे देखील कारण असू शकते. आधुनिक जीवनशैलीत मुले फास्ट फूडला प्राधान्य देतात आणि त्यामुळे पोषक तत्वांनी युक्त अशा गोष्टी खात नाहीत, ज्यामुळे डोळ्यांवर वाईट परिणाम तर होतोच पण इतर अनेक आजारांना बळी पडण्याची भीती असते.
मधुमेहामुळे डोळ्यांवर परिणाम होतो
टाईप 1 मधुमेहाचा मुलांच्या दृष्टीवरही विपरीत परिणाम होतो. त्यामुळे मधुमेहाने त्रस्त असलेल्या मुलांनी वेळोवेळी डोळ्यांची तपासणी करून घेणे अत्यंत आवश्यक आहे आणि त्याचबरोबर त्यांनी आपल्या आहाराचीही विशेष काळजी घेणे आवश्यक आहे.
तुमचा आहार बदला
मुलांचे डोळे कमकुवत होण्यापासून वाचवण्यासाठी त्यांना केवळ गॅजेट्सपासून दूर ठेवू नये, तर त्यांच्या आहारात पौष्टिक पदार्थांचा समावेश करावा. अक्रोड, बदाम, बिया, चिया, फ्लेक्ससीड इत्यादी ओमेगा 3 फॅटी ऍसिडमध्ये समृद्ध असलेले अन्न मुलांना खायला द्या. दूध, दही, अंडी, पालक यांसारख्या हिरव्या पालेभाज्यांचा रोजच्या आहारात समावेश करावा.
'या' गोष्टी लक्षात ठेवा
डोळे हा आपल्या शरीरातील सर्वात महत्वाचा भाग आहे. डोळे अतिशय संवेदनशील आणि नाजूक आहेत, म्हणून अतिरिक्त काळजी घेणे आवश्यक आहे. प्रौढ असो किंवा लहान मूल, नियमित तपासणी दरम्यान किमान दर सहा महिन्यांनी तुमचे डोळे तपासले पाहिजेत.
महत्त्वाच्या बातम्या :
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.