Health Tips : अपुऱ्या झोपेमुळे वाढते हायपरटेन्शनची समस्या; रात्रीच्या वेळी शांत झोप लागण्यासाठी करा 'हे' उपाय
Health Tips : अपुऱ्या झोपेमुळे रक्तवाहिन्यांच्या कार्यातही अडथळा निर्माण होतो.

Health Tips : जर तुम्हाला निरोगी राहायचं असेल तर फक्त योग्य आहार घेऊनच चालत नाही तर त्याचबरोबर पुरेशी झोपही मिळणं गरजेचं आहे. अपुऱ्या झोपेमुळे देखील उच्च रक्तदाबाची समस्या उद्भवू शकते. त्यामुळे रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यासाठी पुरेशी झोप घेणं गरजेचे आहे. झोपेचा अभावामुळे आरोग्याच्या विविध समस्या निर्माण होतात. तज्ज्ञ डॉक्टरांनी केलेल्या सर्वेक्षणानुसार, जे लोक सलग झोप घेत नाहीत त्यांना सर्वसामान्यांच्या तुलनेत उच्च रक्तदाबाचा धोका अधिक असतो. जेव्हा आपल्याला पुरेशी झोप मिळत नाही, तेव्हा आपले शरीर कॉर्टिसॉल नावाचे संप्रेरक तयार करते. ज्यामुळे रक्तदाबाचं प्रमाण वाढतं.
अपुऱ्या झोपेमुळे रक्तवाहिन्यांच्या कार्यातही अडथळा निर्माण होतो आणि संपूर्ण शरीरात ऑक्सिजन पुरवठा करण्यासाठी हृदयाला कठोर परिश्रम घ्यावे लागतात. औषधांशिवाय उच्च रक्तदाब कमी होत नाही. गाढ झोपेत, आपले शरीर रक्तवाहिन्यांच्या कार्यातील अडथळे दूर करते आणि हार्मोनल संतुलन राखते. नियमित आणि पुरेशा झोपेला प्राधान्य दिल्यास आपण केवळ उच्चरक्तदाबचा धोका कमी करू शकत नाही तर त्याच्याशी संबंधित लक्षणे देखील कमी करू शकतो.
रात्रीच्या वेळी शांत झोप लागावी यासाठी काही महत्त्वाच्या गोष्टी
- रात्रीच्या वेळी तुम्हाला शांत झोप लागावी यासाठी झोपण्याची एक वेळ निश्चित करा.
- झोपण्यापूर्वी मोबाईल वापरणं, टीव्ही पाहणं टाळा.
- पुस्तक वाचणे, ध्यान करणे किंवा दीर्घ श्वासोच्छवासाचा व्यायाम करणे तसेच गरम पाण्याने आंघोळ केल्यास नक्कीच फायदा होईल.
- झोपण्यापूर्वी किमान 30 मिनिटे आधी सर्व काम संपवा आणि मन एकाग्र करण्याचा प्रयत्न करा.
- झोपण्यासाठी चांगले वातावरण तयार करा. तुमच्या बेडरुममधील लाईट बंद करुन शांत आणि चांगल्या झोपेसाठी वातावरण निर्मिती करा.
- खोलीतील वातावरण थंड असेल याची खात्री करून घ्या.
- रस्त्यावरील दिवे किंवा आवाज यांसारख्या बाह्य घटकांमुळे तुमच्या झोपेत व्यत्यय येत असल्यास ब्लॅकआउट पडदे, इअरप्लग किंवा व्हाईट नॉइज मशीनचा वापर करा.
- नियमित व्यायाम केल्याने झोपेचा कालावधी आणि गुणवत्ता हे दोन्ही सुधारण्सास मदत होते.
- दिवसभरात किमान 30 मिनिटे मध्यम तीव्रतेचा व्यायाम करण्याचा प्रयत्न करा.
- रात्रीच्या वेळी कॅफिनयुक्त पेयांचा वापर करणे टाळा.
अपुरी झोप आणि उच्च रक्तदाब यांच्यातील परस्परसंबंध ओळखून संपूर्ण हृदय आणि रक्तवाहिन्यासंबंधी आरोग्य उत्तम राखण्यासाठी झोपेच्या सवयींकडे लक्ष द्या. रात्रीच्या वेळी पुरेशी विश्रांती मिळाल्यास दिवसाची सुरुवात चांगली होते. उच्चरक्तदाबासारख्या गंभीर आरोग्य समस्येला प्रतिबंध करण्यासाठी चांगल्या सवयींचे पालन करा.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.
महत्त्वाच्या बातम्या :


















