Pregnancy Period : गरोदरपणात आईचं आनंदी राहणं गरजेचं; स्वत:ला सकारात्मक ठेवण्यासाठी कोणते उपाय कराल? वाचा तज्ज्ञांचं मत
Pregnancy Period : तसं पाहायला गेलं तर, प्रत्येक आईला गरोदरपणात तणाव येतो, पण हा ताण दूर करून आई आणि मूल दोघांनीही आनंदी राहणं गरजेचं आहे.
Pregnancy Period : आई होणं हा कोणत्याही स्त्रीसाठी आनंदाचा काळ असतो. गर्भधारणेचा (Pregnancy) कालावधी शारीरिक आणि मानसिक बदल घडवून आणतो आणि अशा परिस्थितीत, आईने तिच्या तसेच तिच्या बाळाच्या आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे. गरोदरपणात आईने आनंदी राहावे असे आरोग्य तज्ज्ञांचे म्हणणे आहे. तसं पाहायला गेलं तर, प्रत्येक आईला गरोदरपणात तणाव येतो, पण हा ताण दूर करून आई आणि मूल दोघांनीही आनंदी राहणं गरजेचं आहे. गरोदरपणाच्या काळात आनंदी राहणे किती महत्त्वाचे आहे आणि या काळातील ताणतणावांना कसे सामोरे जावं? याविषयी अधिक माहिती जाणून घेऊयात.
योगासने आणि व्यायामाकडे लक्ष द्या
मनातील तणाव दूर करण्यासाठी योगासन हा उत्तम पर्याय आहे. त्यामुळे गर्भधारणेदरम्यान योगासने केली पाहिजेत. त्यामुळे तुमच्या शरीराची लवचिकताही वाढेल. तुमच्या योगा ट्रेनरकडून गरोदरपणात करता येतील अशा व्यायामाविषयी जाणून घ्या. याशिवाय पोहणे, चालणे आणि हलका व्यायाम करूनही तुम्ही तणावमुक्त राहू शकता. योग आणि व्यायामामुळे शरीरात एंडोर्फिन नावाचे हार्मोन वाढते, ज्यामुळे मनाला आराम मिळतो आणि झोपेची समस्या उद्भवत नाही.
तुमच्या मनात जे आहे ते उघडपणे बोला
गरोदरपणाच्या काळात तणाव येणं ही सामान्य गोष्ट आहे. पण, या काळात गरोदर मातेने अधिक ताण न घेण्याचा सल्लाही डॉक्टर देतात. काही अडचण असल्यास घरातील सदस्यांशी मनमोकळेपणाने चर्चा करून तोडगा काढावा. या काळात तणाव आणि चिंता वाढवणारे कोणतेही काम करणे टाळावे. तुमच्या जवळच्या, मित्र किंवा कुटुंबातील सदस्यांशी बोला असे अनेक पर्याय शोधणं गरजेचं आहे.
विश्रांती घेणं गरजेचं
गरोदरपणात शरीर आणि मनाला विश्रांतीची गरज असते. त्यामुळे भरपूर विश्रांती घ्या. मुलाच्या जन्मानंतर, आईला विश्रांतीसाठी फारसा वेळ मिळत नाही. म्हणून या काळात शरीराला विश्रांती द्या. तुम्हाला हवे ते काम करा, गाणी ऐका किंवा तुमचे आवडते काम करा. यामुळे तुमचे शरीर आणि मन तणावमुक्त आणि आनंदी होईल.
तुमच्या शरीराच्या बदलत्या आकाराबद्दल तणावग्रस्त होऊ नका
गर्भधारणेदरम्यान, शरीराचा आकार बदलतो, पोटाचा आकार वाढतो आणि कधीकधी महिलांना स्ट्रेच मार्क्सची चिंता वाटते. याचा सकारात्मक विचार करा, ते स्वीकारा आणि कालांतराने या सर्व गोष्टी पुन्हा सुरळीत होतील. म्हणून तुमच्या शरीराचा जास्त विचार करू नका.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.
महत्त्वाच्या बातम्या :