World Arthritis Day: तासन् तास बसून काम, सतत तणावात असाल तर सावधान! संधितावाच्या 'या' लक्षणांकडे करू नका दुर्लक्ष, तज्ज्ञांचा इशारा
World Arthritis Day: संधिवात हा आता केवळ वयोवृध्दांपुरता मर्यादित नसून तरूण व्यक्तींमध्येही संधिवाताचे निदान होत आहे आणि रुग्णांची संख्या वाढत चालली आहे.

World Arthritis Day: 12 ऑक्टोबर रोजी जगभरात 'जागतिक संधिवात दिवस' पाळला जातो. बैठी जीवनशैली, ताणतणाव आणि अनुवांशिकतेमुळे तरुणांमध्ये संधिवाताची समस्या वाढत चालली आहे. संधिवात (Arthritis) हा आता केवळ वयोवृध्दांपुरता मर्यादित नसून 20 ते 50 वयेगटातील व्यक्तींमध्येही संधिवाताचे निदान होत आहे आणि रुग्णांची संख्या देखील वाढत चालली आहे.
'या' लक्षणांकडे करू नका दुर्लक्ष; तज्ज्ञांनी दिला इशारा (Arthritis Symptoms)
बरेच तरुण रुग्ण सांध्यांमधील कडकपणा किंवा सूज येणे यासारख्या सुरुवातीच्या लक्षणांकडे दुर्लक्ष करतात, परंतु भविष्यात त्यांना दीर्घकालीन वेदनांचा सामना करावा लागतो. वेळीच निदान, जीवनशैलीत बदल, फिजिओथेरपी आणि मिनीमली इव्हेसिव्ह प्रक्रियांसारख्या प्रगत उपचारांमुळे रुग्णांना सक्रिय जीवन जगता ठेवण्यास येते. याबाबत तज्ज्ञांनी महत्त्वाची माहिती दिलीय.
20 ते 40 वयोगटातील तरुणांमध्ये संधिवाताची वाढ
मुंबईतील अपोलो स्पेक्ट्रा रूग्णालयातील ऑर्थोपेडिक सर्जन डॉ. अमित ग्रोव्हर म्हणाले की, सध्या 20 ते 40 वयोगटातील तरुणांमध्ये संधिवाताच्या प्रकरणांमध्ये 40% वाढ झाली आहे. दर महिन्याला ओपीडीमध्ये उपचारांसाठी दाखल होणाऱ्या 10 पैकी 4 व्यक्तींना सांधेदुखी आणि संधिवाताशी संबंधित कडकपणाची लक्षणे दिसून येतात. जास्त वेळ एकाच ठिकाणी बसुन राहणे, व्यायामाचा अभाव, बसण्याची चुकीची पध्दत, दुखापती, लठ्ठपणा, स्वयंप्रतिकार स्थिती, कौटुंबिक इतिहास आणि ताण हे घटक या स्थितीस कारणीभूत ठरतात. सांधे कडक होणे, वेदना, सूज, उष्णता, हाडांची लवचिकता कमी होणे आणि थकवा जाणवणे अशी लक्षणे दिसून येतात. जर संधिवाताकडे दुर्लक्ष केले तर दीर्घकालीन वेदना, सांध्यांमधील विकृती, अपंगत्व आणि जीवनाची गुणवत्ता खालावू शकते. नियमित व्यायाम, वजन नियंत्रणात राखणे आणि तणावाचे व्यवस्थापन करणे हे जीवनशैलीतील बदल या आजाराची प्रगती रोखण्यात मदत करतात.
ऑस्टियोआर्थरायटिस (सांध्यांची झीज) आणि संधिवात (एक ऑटोइम्यून डिसऑर्डर जिथे शरीर स्वतःच्या सांध्यावर हल्ला करते) असे अनेक संधीवाताचे प्रकार आहेत.
झायनोवा शाल्बी हॉस्पिटलचे ऑर्थोपेडिक आणि जॉइंट रिप्लेसमेंट सर्जन डॉ. श्रीसनत राव म्हणाले की, बरेच तरुण सांध्यामधील कडकपणा किंवा वेदनेकडे दुर्लक्ष करतात, परंतु ही संधिवाताची सुरुवातीची लक्षणे असू शकतात. 20-40 वयोगटातील तरुणांमध्ये संधिवाताच्या प्रकरणांमध्ये 20% वाढ झाली आहे. महिन्याभरात 10 पैकी 2 व्यक्ती सांधेदुखी आणि स्नायुंचा कडकपणा यासारख्या समस्या घेऊन उपचारांसाठी रुग्णालयात दाखल होतात. लवकर निदान केल्याने सांध्यांची सूज नियंत्रित करण्यास, वेदना कमी करण्यास आणि दीर्घकालीन नुकसान टाळण्यास मदत होते.
या समस्येला प्रतिबंध करता येऊ शकतो..
वेळोवेळी फिजिओथेरपी, औषधं आणि प्रगत उपचार प्रक्रिया रुग्णांना दीर्घकालीन आराम देतात आणि अपंगत्व टाळण्यास मदत करतात. नियमित शारीरिक हालचाली, निरोगी, संतुलित आहार, वजन नियंत्रित राखणे, तणावाचे व्यवस्थापन करणे आणि वैद्यकीय उपचारांनी या समस्येला प्रतिबंध करता येऊ शकतो. म्हणून, सुरुवातीच्या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका आणि वेळीच वैद्यकीय मदत घ्यायला विसरु नका.
हेही वाचा :
Women Health: वाढत्या वजनाला वेळीच सावरा! लठ्ठपणानं मूल होण्यास मोठ्या अडचणी, आई-वडील होण्याचं अनेकांचं स्वप्न अपूर्ण? डॉक्टर सांगतात...
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )
























