Women Health: वाढत्या वजनाला वेळीच सावरा! लठ्ठपणानं मूल होण्यास मोठ्या अडचणी, आई-वडील होण्याचं अनेकांचं स्वप्न अपूर्ण? डॉक्टर सांगतात...
Women Health: डॉक्टर सांगतात, दररोज अनेक जोडप्यांना लठ्ठपणाशी संबंधित समस्या सतावतात आणि ही संख्या सातत्याने वाढत आहे.

Women Health: देशभरात लठ्ठपणाची (Obesity) समस्या वाढत आहे, प्रामुख्याने प्रजनन वयातील महिलांमध्ये (Women Health) ही समस्या वेगाने वाढत असल्याचे दिसून येते. व्यस्त वेळापत्रक, शारीरिक हालचालींचा अभाव, वाढता ताणतणाव आणि आहाराच्या चुकीच्या सवयी ही लठ्ठपणाची काही प्रमुख कारणं आहेत. लठ्ठपणाचा सामना करणारी जोडपी जीवनशैलीतील काही ठराविक बदलांनी देखील पालकत्वाचे स्वप्न पूर्ण करु शकतात, याव्यतिरिक्त काही प्रकरणांमध्ये इंट्रायूटरिन इन्सेमिनेशन (IUI). आणि इन विट्रो फर्टिलायझेशन (IVF) सारख्या प्रगत प्रजनन उपचारांचा देखील अवलंब केला जाऊ शकतो. याबाबत डॉ. कैश्रीन खान( प्रसूती आणि स्त्रीरोगतज्ज्ञ, मदरहूड हॉस्पिटल्स, खराडी, पुणे) यांनी महत्त्वाची माहिती दिलीय.
60 ते 70% महिला लठ्ठपणाचा सामना करतायत... (Women Health)
लठ्ठपणा हा सर्वात सामान्य आरोग्य समस्यांपैकी एक आहे आणि जेव्हा महिला प्रजननासंबंधी समस्यांवर उपचाराकरिता आमच्याकडे येतात त्यातल्या 60 ते 70% महिला लठ्ठपणाचा सामना करत असल्याचे आढळून येते. म्हणजेच २५ ते ३५ वयोगटातील 10 पैकी 6 ते 7 महिलांना वंधत्वाच्या समस्यांचा सामना करत असल्याचे पहायला मिळते. या जोडप्यांचा विचार केला तर, दररोज सुमारे 10 ते 12 जोडप्यांना लठ्ठपणाशी संबंधित समस्या सतावतात आणि ही संख्या सातत्याने वाढत आहे. महिलांमध्ये जास्त चरबीमुळे हार्मोनल असंतुलनाची समस्या उद्भवते आणि इन्सुलिन तसेच इस्ट्रोजेनची पातळी वाढते ज्यामुळे ओव्हुलेशन आणि मासिक पाळीत व्यत्यय येतो. महिलांमध्ये लठ्ठपणाचा परस्पर संबंध वंध्यत्वाशी जोडलेला आहे, ज्यामध्ये पीसीओएस (पॉलीसिस्टिक ओव्हेरियन सिंड्रोम) सारख्या स्थितीमुळे मासिक पाळी अनियमित होते आणि स्त्रीबीज तयार होण्यात अडचणी येतात. यामुळे मधुमेह, हायपोथायरॉईडीझम आणि हायपरटेन्शन (HTN), गर्भपाताचा धोका आणि प्रीक्लेम्पसिया सारखी गुंतागुंत देखील वाढत आहे ज्याचा थेट परिणाम प्रजनन क्षमता आणि गर्भधारणेवर होतो. प्रजनन उपचारांवरही याचा परिणाम होतो, कारण लठ्ठ महिलांमध्ये स्त्रीबीजांची गुणवत्ता आणि दर्जा कमी होत असतो आणि आयव्हीएफ प्रक्रियेद्वारे यशाचा दर देखील कमी होते. याव्यतिरिक्त, जास्त वजन वाढल्याने व्हेरिकोसेल्स खराब होऊ शकतात, टेस्टिक्युलर नसांना सुज येऊ शकते ज्यामुळे प्रजनन क्षमता आणखी कमी होते.
पुरुषांना कोणता धोका?
पुरुषांमध्ये लठ्ठपणा, शुक्राणूंचे आरोग्यावर दुष्परिणाम आणि टेस्टोस्टेरॉन पातळी कमी होते. इरेक्टाइल डिसफंक्शन, शुक्राणूंची गुणवत्ता खालावणे यासह "अस्थेनोटेराटोझोस्पर्मिया (शुक्राणूंची हालचाल कमी होणे आणि शुक्राणूंचा असामान्य आकार) अशा आजारांचा सामना करावा लागतो. यामुळे प्रजनन क्षमता कमी होऊ शकते आणि जोडप्यांसाठी गर्भधारणा होण्यास विलंब होऊ शकतो, असे डॉ. कैश्रीन खानयांनी स्पष्ट केले.
काय काळजी घ्याल?
डॉ. कैश्रीन पुढे सांगतात की, जोडप्यांनी पुरक आहार घेणे, आठवड्यातून पाच वेळा किमान 45 मिनिटे व्यायाम करणे, चांगली झोप घेणे, योग आणि ध्यान यासारख्या विश्रांती तंत्रांचा सराव करणे आणि पीसीओएस व्यवस्थापनासाठी वेळीच उपचार करणे यासारख्या जीवनशैलीतील बदलांचे पालन करणे गरजेचे आहे. भूक नसताना खाणे टाळावे, प्रथिनांचे सेवन नियंत्रित करावे, शर्करायुक्त आणि प्रक्रिया केलेल्या अन्नाचे सेवन कमी करणे गरजेचे आहे. दैनंदिन हालचालींमध्ये वाढ करणे खूप महत्वाचे आहे, काही सोपे पर्याय म्हणजे लिफ्टचा वापर न करता पायऱ्या चढणे, अधुन-मधुन जागेवर उभे राहून स्ट्रेचिंग करणे, जेवणानंतर चालणे. वजन व्यवस्थापन आणि पोषण आहाराच्या बाबतीत तज्ज्ञांचा सल्ला घेणे योग्य राहिल. केवळ शरीराच्या वजनावर लक्ष केंद्रित करण्याऐवजी निरोगी बीएमआय राखल्याने नक्कीच फायदा होऊ शकतो. तुम्हाला पुरेसे व्हिटॅमिन डी मिळेल याची खात्री करा, हायड्रेटेड राहा आणि धूम्रपान आणि मद्यपानाचे सेवन टाळा कारण ते वजन आणि प्रजनन क्षमतेवर थेट परिणाम करतात.
प्रजनन क्षमतेवर लठ्ठपणाचे गंभीर परिणाम
जागतिक आरोग्य संघटनेनुसार (WHO) बॉडी मास इंडेक्स (BMI) श्रेणी ही 18-25 दरम्यान सामान्य मानली जाते. 25 पेक्षा जास्त बीएमआय असल्यास, त्याला जास्त वजन म्हटले जाते आणि 30 पेक्षा जास्त असल्यास त्यास लठ्ठपणा म्हणून ओळखले जाते. प्रजनन क्षमतेवर लठ्ठपणाचे परिणाम दिसून येतात. महिलांमध्ये, लठ्ठपणा हा हार्मोनल असंतुलन, पीसीओएसशी जोडलेला असतो. पस्तीसानंतर प्रजनन क्षमता कमी होऊ शकते. पुरुषांमध्ये, जर वय ४० पेक्षा जास्त असेल तर ते शुक्राणूंची गुणवत्ता कमी करते आणि अनुवांशिक विकृतींचा धोका वाढतो. लहान वयाच्या लठ्ठ रुग्णांना जीवनशैलीतील बदलांमुळे गर्भधारणा होऊ शकते, परंतु वयस्कर लठ्ठ रुग्णांना वय आणि लठ्ठपणा या दोन्हींमुळे दुप्पट धोका असू शकतो,असे डॉ. बुशरा खान(नोवा आयव्हीएफ फर्टिलिटी, खराडी, पुणे येथील फर्टिलिटी स्पेशालिस्ट) यांनी स्पष्ट केले
ग्रामीण लोकसंख्येच्या तुलनेत शहरात लठ्ठ रुग्णांची संख्या अधिक
डॉ. बुशरा खान पुढे सांगतात की, जगभरात वंध्यत्वाशी संबंधित समस्या आणि लठ्ठपणाचा सामना करणाऱ्या जोडप्यांची संख्या वाढत चालली आहे, फर्टिलिटी क्लिनिकमध्ये उपचाराकरिता येणाऱ्या अशा जोडप्यांची संख्या 15 ते 20 टक्के इतकी आहे. वंध्यत्वावर उपचार घेणाऱ्या सुमारे 40 टक्के महिला लठ्ठ असल्याचे आढळले आहे. ग्रामीण लोकसंख्येच्या तुलनेत शहरी लोकसंख्येमध्ये लठ्ठ रुग्णांची संख्या अधिक आहे. लठ्ठपणा असलेल्या प्रत्येकी तीन जोडप्यांपैकी जवळजवळ एकाला वंध्यत्वाचा त्रास होतो. लठ्ठपणा आणि वंध्यत्व हे महिलांमध्ये जास्त आहे की पुरुषांमध्ये याचे प्रमाण जास्त आहे हे सांगणे कठीण आहे. पीसीओएसचे बरेचसे रुग्ण लठ्ठ असू शकतात, विशेषतः जर त्यांना इन्सुलिन प्रतिरोधकता, ओव्हुलेटरी डिसफंक्शन असेल तर लठ्ठपणाचा सामना करावा लागू शकतो. पुरूषांमध्ये कंबरेचा वाढता घेर हे वंध्यत्व आणि शुक्राणूंमध्ये डीएनएचे नुकसान दिसून येते, परंतु एकूणच, दोन्ही जोडीदाराच्या तुलनेत महिलांमध्ये स्थूलपणामुळे वंध्यत्वाचा धोका वाढतो.
डॉक्टर म्हणतात...
लठ्ठपणामुळे प्रजननक्षमतेव्यतिरिक्त इतर आरोग्य समस्या निर्माण होतात. लठ्ठपणाने पिडीत रुग्णाला मधुमेह, इन्सुलिन प्रतिरोध, चयापचयासंबंधी गुंतागुंत, हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी समस्या, उच्च रक्तदाब, हृदयविकाराचा झटका, स्ट्रोक, हार्मोनल असंतुलन, पीसीओएस आणि थायरॉईड समस्येची शक्यता अधिक असते असते, अशी प्रतिक्रिया डॉ. बुशरा खान यांनी व्यक्त केली.
हेही वाचा :
Neechbhang Yog 2025: 9 ऑक्टोबर तारीख चमत्कारिक! शुक्राचा पॉवरफुल नीचभंग राजयोग, 'या' 3 राशींसाठी कुबेराचा खजिना उघडणार, तुमची रास?
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )


















