(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Monsoon Tips: पावसाळ्यात निरोगी राहण्यासाठी लक्षात ठेवा 5 गोष्टी; अशा पद्धतीने काळजी घेतल्यास आजार राहतील दूर!
Monsoon Care Tips: पावसाळा एन्जॉय करायचा असेल तर आरोग्याची काळजी घेणं महत्त्वाचं आहे. पावसाळ्यात निरोगी आरोग्यासाठी काही गोष्टींची जरुर काळजी घेतली पाहिजे.
Monsoon Health Care: पावसाळा सुरू होण्यास अवघे काही दिवस राहिले आहेत, यात तुम्हाला पावसाचा आनंद घ्यायचा असेल तर निरोगी राहणं देखील म्हत्त्वाचं आहे. मात्र, पावसाळ्यात पाण्यामुळे अनेक रोग देखील उद्भवतात. पावसाळा म्हणजे सगळीकडे हिरवंगार निसर्ग आणि वाहणारे धबधबे, पण आरोग्यासाठी मात्र पावसाळा म्हणावा तितका चांगला नाही. पावसाळ्यातील सततच्या दमट हवामानामुळे हवेत जंतूंचं प्रमाण वाढतं. पाणी दूषित होत असल्याने पचनाच्या समस्या देखील उद्भवतात. पावसाळा एन्जॉय करता यावा आणि आजारपण दूर राहावे यासाठी आहाराची जास्त काळजी घेणं आवश्यक असतं.
पावसाळ्यातील थंडगार हवेमुळे या काळात भूक फार लागते. मात्र, पचनशक्ती कमी झाल्याने अन्न म्हणावं तसं पचत नाही आणि त्यामुळे गॅस, अॅसिडीटी सारखे त्रास उद्भवतात. त्याचप्रमाणे, या काळात गारठ्यामुळे सर्दी-ताप आणि खोकला यांसारखे संसर्गजन्य आजार देखील वाढतात. या आजारांपासून दूर राहण्यासाठी काही गोष्टींची विशेष काळजी घ्यायला हवी.
पावसाळ्यात पचायला हलका आणि गरम आहार घ्यावा
पावसाळ्यामध्ये पचनक्रिया मंद झाल्याने अन्नाचं पचन नीट होत नाही. पचनक्रिया नीट राहावी यासाठी पावसाळ्यात पचनास हलका आणि गरम आहार घ्यावा. पावसाळ्यात ताजे अन्न खा. शिळे, आंबवलेले पदार्थ खाणं टाळा. मुगाचे वरण, फळभाज्या, तूप घालून वरणभात, भाज्यांचे गरम सूप याचा आहारात समावेश करावा. पावसाळ्यात भूक वाढवणारे आणि अन्नाचे पचन करणाऱ्या गोष्टींचा आहारात समावेश करा.
पावसाळ्यात काय खावं आणि काय खाणं टाळावं?
पावसाळ्यात शक्यतो कडधान्य खाणं टाळलेलं चांगलं. वाटाणे, हरभरे, छोले अशा पदार्थांचा आहारात समावेश करणं टाळा. हे पदार्थ खायचे असल्यास जास्त शिजवून घ्यावे. पावसाळ्यात पालेभाज्या शक्यतो कमी प्रमाणात खाल्ल्या पाहिजेत. पावसाळ्यात आहारात सुंठ किंवा आल्याचा आवर्जून वापर करावा, त्यामुळे इन्फेक्शनपासून दूर राहणं शक्य होतं.पावसाळ्यात आहारात गाईच्या तूपाचा समावेश करावा.
पावसाळ्यात बाहेरचं खाणं टाळा
पावसाळा सुरू झाला की वातावरण दमट असतं, अशा वेळी उघड्यावरील माशांचं प्रमाण वाढतं. या माशा उघड्यावरील पदार्थांवर जाऊन बसतात आणि तेच पदार्थ आपण खातो. पावसाळ्यात बाहेरचं खाणं खाऊन आपण स्वत:च आजाराला आमंत्रण देत असतो. बाहेरचं अन्न किती शिळं आहे, ते बनवताना कोणते पदार्थ, पाणी वापरलं असेल हे आपल्याला माहित नसतं. तसेच बाहेर अन्न बनवताना स्वच्छतेची कितपत काळजी घेतली असेल हेही माहित नसल्याने या दिवसांत बाहेरच्या खाण्यातून आजार होण्याची शक्यता नेहमीपेक्षा जास्त असते. त्यामुळे पावसाळ्यात शक्यतो घरातील ताजं अन्न खावं.
पाणी उकळून प्या
पावसाळ्यात अनेकदा पाणी गढूळ येते आणि त्यामुळे शक्यतो पाणी उकळून प्या आणि पाण्यावर तुरटी फिरवून मगच पाणी प्यायला हवं, त्यामुळे आजार दूर राहण्यास मदत होईल. पाण्यात सुंठ घालून उकळून प्यायल्यास पावसाळ्यामुळे कमी झालेली भूक वाढण्यास मदत होते.
अंग जास्त वेळ ओले ठेऊ नये
पावसाळा म्हंटलं की आपण बऱ्याच ठिकाणी फिरायला जातो, त्यावेळी पाण्यात जास्त भिजू नये. जास्त काळ पाण्यात राहिल्यास आजारी पडण्याची शक्यता असते, त्यामुळे पाण्यात भिजलात तरी लगेच अंग आणि डोकं कोरडं करावं आणि शक्यतो उबदार कपडे वापरावे. जास्त काळा पाण्यात राहिल्यामुळे पायांना चिखल्या देखील होतात, त्यामुळे पाय स्वच्छ आणि कोरडे ठेवावेत.
हेही वाचा:
Blackheads Removing Tips : चेहऱ्यावरचे ब्लॅकहेड्स काढण्याचे 5 घरगुती उपाय; त्वचा होईल मऊ आणि सुंदर!
Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )