(Source: Poll of Polls)
Health Tips : कमी वयात टळणार हृदयविकाराचा धोका! फक्त 'या' 4 सवयी बदला
Health Tips : बिघडलेली जीवनशैली, खाण्यापिण्याच्या चुकीच्या वेळा, अति ताणतणाव, धूम्रपान, कोलेस्ट्रॉल, रक्तदाबाच्या समस्या आणि लठ्ठपणा यांचा हृदयाच्या आरोग्यावर वाईट परिणाम होतोय.
Health Tips : तुम्हाला तुमचे हृदय (Heart) निरोगी ठेवायचं असेल, तर योग्य जीवनशैली (Lifestyle) तसेच आहाराचं पालन करणं गरजेचं आहे. गेल्या काही वर्षांत हृदयविकाराच्या घटनांमध्ये झपाट्याने वाढ होत आहे. भारतातही हृदयरुग्णांची संख्या सातत्याने वाढतेय. अलीकडेच एका चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान अभिनेता श्रेयस तळपदेलाही (Shreyas Talpade) हृदयविकाराचा झटका (Heart Attack) आला. त्यानंतर त्याच्यावर त्वरित अँजिओप्लास्टी शस्त्रक्रिया करण्यात आली. याआधीही सुष्मिता सेन तसेच इतर कलाकार हृदयविकाराच्या झटक्याला बळी पडले आहेत.
हृदयविकाराचा धोका केवळ वृद्ध लोकांमध्येच नाही तर तरुणांमध्येही वाढतोय. अमेरिकन हार्ट असोसिएशनच्या मते, जर तुम्हाला हृदयविकाराचा झटका टाळायचा असेल, तर योग्य जीवनशैलीचे पालन करणे महत्त्वाचे आहे. लहान वयातच हृदयविकाराच्या झटक्याने अनेक तरुण आपला जीव गमावत आहेत. हे टाळण्यासाठी आठवड्यातून 150 मिनिटे वेगवान वॉक करा. या धोकादायक आजाराचा धोका कमी करण्यासाठी आपल्या जीवनशैलीत इतर कोणते बदल केले पाहिजेत या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात.
धुम्रपानापासून दूर राहा
धूम्रपानाचा आपल्या हृदयावर वाईट परिणाम होतो. बिडी, सिगारेट आणि इतर धूम्रपानाच्या पदार्थांच्या धुरामुळे हृदयाला गंभीर धोका निर्माण होतो. जे लोक दिवसातून अनेक वेळा धूम्रपान करतात त्यांना हृदयविकाराचा झटका येण्याचा धोका वाढतो. अशा परिस्थितीत व्यक्तीने ताबडतोब धुम्रपानापासून दूर राहावे.
साखरयुक्त पेयाचं सेवन टाळा
जास्त साखर आणि जंक फूड देखील हृदयासाठी धोकादायक आहे. त्यामुळे कोलेस्ट्रॉल, रक्तदाब आणि रक्तातील साखर वाढण्याचा धोका असतो. याबरोबरच या आजारांची तपासणीही वेळोवेळी करावी.
तणावापासून दूर राहा
आजच्या काळात बहुतांश लोक तणावाचा सामना करतायत. हळूहळू त्याचे रूपांतर चिंता आणि नैराश्यात होते. त्यामुळे हृदयविकाराचा धोका अनेक पटींनी वाढतो. यासाठी जास्त ताण न घेता तणावावर नियंत्रण ठेवणं गरेजचं आहे.
दररोज नियमित व्यायाम करा
हृदयविकाराचा धोका कमी करण्यासाठी, शक्य तितके शारीरिकरित्या सक्रिय व्हा. तासन् तास एकाच जागी बसणे टाळा. वेळेवर झोपणे आणि उठणे आणि सकस आहार घेणे खूप महत्वाचे आहे. तसेच, दररोज किमान 7-8 तास पुरेशी झोप घ्या.
महत्त्वाच्या बातम्या :
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.