Health Tips : सकाळी 9 वाजताच नाश्ता का करावा? जाणून घ्या काय म्हणतात तज्ज्ञ?
Health Tips : निरोगी राहण्यासाठी आपण आपल्या खाण्याची वेळ ठरवणं महत्त्वाचं आहे.

Health Tips : खरंतर सकाळचा नाश्ता हा आपल्या आरोग्यासाठी (Health) फार महत्त्वाचा असतो. जर तुमचा सकाळचा नाश्ता चांगला पोटभर असेल तर दिवसभर तुम्हाला ऊर्जावान वाटते तसेच लवकर भूकही लागत नाही आणि कामातही उत्साहीपणा राहतो. यासाठी सकाळचा नाश्ता प्रत्येकाने करणं गरजेचं आहे. पण, अनेकांना सकाळचा नाश्ता किती वाजता करावा याबाबत मनात शंका असते.
शरीरातील पोषण टिकवून ठेवण्यासाठी आपण आपल्या खाण्याची वेळ ठरवणं महत्त्वाचं आहे. यासाठी सर्वात आधी नाश्त्याची वेळ निश्चित करावी. नाश्ता करताना आपण काय आणि कधी खात आहोत याची काळजी घेणं खूप गरजेचं आहे. या ठिकाणी नाश्ता कोणत्या वेळी करावा हे जाणून घेऊयात.
सकाळचा नाश्ता किती वाजता करावा?
आरोग्य तज्ज्ञांच्या मते, सकाळचा नाश्ता हा नऊच्या आधी करावा. सकाळची ही वेळ नाश्त्यासाठी योग्य आहे. कारण त्यानंतर जेवणासाठी चांगला वेळ मिळतो. आरोग्य तज्ज्ञांच्या मते, नऊ नंतर नाश्ता करणं चांगलं नाही. यामुळे रात्रीचे जेवण आणि दुसऱ्या दिवशीचा नाश्ता यामध्ये मोठे अंतर निर्माण होते, जे आपल्या आरोग्यासाठी चांगले नाही. त्यामुळे आजारांपासून दूर राहण्यासाठी सकाळी नऊ वाजण्यापूर्वी नाश्ता करावा.
'या' आजारांमध्ये 9 वाजल्यानंतर नाश्ता करू नये
- तुम्हाला हृदयाशी संबंधित समस्या असल्यास 9 वाजण्यापूर्वी नाश्ता करा आणि वेळेवर औषधं घ्यावीत.
- मधुमेहाच्या रुग्णांनी जास्त वेळ उपाशी राहू नये, यामुळे तुमचे आरोग्य बिघडू शकते.
- रक्तदाब जास्त असो वा कमी, कोणत्याही परिस्थितीत जास्त वेळ उपाशी राहू नका.
- जर शरीरात रक्ताची कमतरता असेल किंवा तुम्ही यासाठी कोणत्याही प्रकारची औषधे घेत असाल तर तुम्ही नाश्ता करायला अजिबात उशीर करू नये.
वेळेवर नाश्ता केलात तर तुम्हाला 'हे' फायदे मिळतील
1. पचनक्रिया निरोगी राहील : जर तुम्ही नाश्ता, दुपारचे जेवण आणि रात्रीचे जेवण वेळेवर केले तर तुम्हाला पचनाशी संबंधित कोणतीही समस्या येणार नाही. पचनक्रिया निरोगी ठेवण्यासाठी सकाळी 7 ते 9 या वेळेत नाश्ता करावा.
2. शरीर मजबूत होईल : योग्य वेळी नाश्ता केल्याने शरीरात पौष्टिकतेची कमतरता भासणार नाही. यामुळे तुम्ही तंदुरुस्त राहता आणि आजारांपासून सुरक्षित राहता.
3. आजारांपासून दूर राहाल : योग्य वेळी नाश्ता केल्याने तुम्ही तुमची औषधे वेळेवर घेऊ शकाल, ज्यामुळे तुम्ही अनेक आजारांपासून दूर राहू शकता.
महत्त्वाच्या बातम्या :
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
