(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Health Tips : प्रत्येक ऋतूत मधुमेह नियंत्रणात राहील; 'या' भाज्या खाण्यास आजपासूनच सुरुवात करा
Health Tips : आरोग्य तज्ज्ञ अनेकदा मधुमेहाच्या रुग्णांना आपल्या खाण्याच्या सवयी निरोगी ठेवण्याचा सल्ला देतात.
Health Tips : सध्याच्या काळात मधुमेहाचा (Diabetes) आजार हा फार सामान्य झाला आहे. पूर्वी हा आजार फक्त वयोवृद्ध लोकांना व्हायचा. मात्र, बिघडलेली जीवनशैली आणि चुकीचा आहार यामुळे आजकाल लहान मुलांनाही मधुमेह होऊ शकतो. मधुमेह हा आजार जरी असला तरी मात्र निरोगी जीवनशैलीचे (Lifestyle) पालन करून तुम्ही तो नियंत्रणात देखील करू शकता. आरोग्य तज्ज्ञ अनेकदा मधुमेहाच्या रुग्णांना आपल्या खाण्याच्या सवयी निरोगी ठेवण्याचा सल्ला देतात. अनेकदा आहारातील निष्काळजीपणामुळे रक्तातील साखर वाढण्याचा धोका जास्त असतो.
आपण जे खातो त्याचा थेट परिणाम आपल्या रक्तातील साखरेवर (Blood Sugar) होतो. त्यामुळे आहार मधुमेहासाठी (Diabetes) अनुकूल असणे महत्त्वाचे आहे. रक्तातील साखरेची पातळी सामान्य ठेवण्यासाठी तुम्हाला व्यायामाबरोबरच काही भाज्यांचा आहारात समावेश करू शकता. या ठिकाणी आम्ही कोणत्या भाज्यांचा आहारात समावेश करावा याविषयी थोडक्यात माहिती देणार आहोत. जेणेकरून, तुम्ही आहारात बदल करून मधुमेह नियंत्रित करू शकता.
शिमला मिरची
ज्यांना मधुमेह आहे त्यांनी आपल्या आहारात शिमला मिरचीचा समावेश करावा. यामध्ये व्हिटॅमिन सी, के, पोटॅशियम आणि व्हिटॅमिन बी 6 आढळते, जे मधुमेहाच्या रुग्णांसाठी खूप फायदेशीर आहे.
टोमॅटो
टोमॅटोचा वापर जवळपास प्रत्येक भाजी करण्यासाठी केला जातो. टोमॅटोचा ग्लायसेमिक इंडेक्स तर कमी होतोच, पण त्यात असलेले पोषक घटक मधुमेहाच्या रुग्णांसाठी खूप फायदेशीर ठरतात. त्यामुळे या भाजीचं सेवन तुम्ही करू शकता.
आलं
आल्याचा वापर भाजी आणि मसाला म्हणून केला जातो. उच्च रक्तातील साखर नियंत्रित करण्यासाठी, जिंजरॉल सारखे अनेक विशेष घटक आल्यामध्ये आढळतात, जे इंसुलिनशी संबंधित समस्या कमी करतात. रोजच्या आहारात तुम्ही आल्याचा समावेश केल्यास रक्तातील साखरेची पातळी चांगली राहते.
हिरवी मिरची
हिरवी मिरची जरी मसालेदार असली तरी तिच्याशिवाय जेवणाला चव येत नाही. मधुमेहाच्या रुग्णांनी लाल मिरचीच्या जागी प्रत्येक ऋतूत मिळणाऱ्या हिरव्या मिरच्यांचे सेवन करावे. हिरव्या मिरचीमध्ये कॅप्सेसिन नावाचे विशेष रसायन आढळते, जे इंसुलिन संवेदनशीलता सुधारते.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.
महत्त्वाच्या बातम्या :