(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Health Tips : फळं की फळांचा ज्यूस हिवाळ्यात काय जास्त फायदेशीर? वाचा तज्ज्ञांचं मत
Fruit Juice vs Fruit : संपूर्ण फळे खाल्ल्याने तुमच्या शरीराला भरपूर फायबर मिळते, जे पचन सुधारण्यास आणि रक्तातील साखर नियंत्रित करण्यास मदत करते.
Fruit Juice vs Fruit : शरीर सक्रिय आणि तंदुरुस्त ठेवण्यासाठी फळांचा आहार घेणं गरजेचं आहे हे आपल्या सर्वांनाच माहीत आहे. पण, सध्या थंडीचे दिवस (Winter Season) सुरु आहेत. अशा वेळी तुम्हालाही अनेकदा असा प्रश्न पडला असेल की, थंडीत फळांचं सेवन करणं जास्त फायद्याचं आहे की फळांच्या रसाचं (Fruit Juice)? या दोघांपैकी कोणती निवड करावी? आज या ठिकाणी आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की तुमच्या शरीरासाठी दोघांपैकी कोणता पर्याय चांगला आहे.
फळं खाण्याचे फायदे
फळांचं सेवन केल्याने आपल्या शरीराला भरपूर फायबर मिळते, जे पचन सुधारण्यास आणि रक्तातील साखर नियंत्रित करण्यास मदत करते. ताजी फळे खाल्ल्याने तुमच्या शरीराला भरपूर जीवनसत्त्वे, अँटिऑक्सिडंट्स आणि फायटोकेमिकल्स देखील मिळतात. फळे खाल्ल्याने लठ्ठपणा आणि दिर्घकालीन आजारांचा धोकाही कमी होतो. फळे आणि भाज्या खाल्ल्याने शरीराला पुरेसे पोषण मिळते. याशिवाय फळे खाल्ल्याने वजन कमी होण्यास मदत होते. फळांमध्ये कॅलरीज कमी असतात आणि फायबरचे प्रमाण जास्त प्रमाणात न घेता तुम्हाला त्वरीत ताजेतवाने करते. वजन कमी करण्यात मदत करणार्या फळांमध्ये बेरी, सफरचंद, नाशपाती, लिंबूवर्गीय फळे आणि द्राक्षांचा समावेश होतो.
फळांच्या रसाचे फायदे आणि तोटे
एक किंवा अधिक फळे मिक्स करून फळांचा रस तयार केला जातो. फळांचे सेवन करण्याचा हा एक सोपा मार्ग असू शकतो. तसेच, रसामध्ये संपूर्ण फळांमध्ये आढळणारे फायबर नसतात आणि संपूर्ण फळातील सर्व पोषक आणि अँटिऑक्सिडंट्स टिकवून ठेवत नाहीत. त्यात साखर आणि कॅलरी देखील जास्त प्रमाणात वापरली जाते. विशेषतः जर तुम्ही पॅकेज केलेला रस पीत असाल तर तो आरोग्यासाठी घातक असतो.
वजन कमी करण्यासाठी ज्यूस प्यावा का?
ज्यूस पिणे 'निरोगी' मानले जात असले तरी पण ज्यूस प्यायल्याने वजन कमी होण्यास मदत होते असा दावा करणं चुकीचं आहे. वजन कमी करण्यासाठी फळांचा रस हा सर्वोत्तम पर्याय असू शकत नाही. संपूर्ण फळे खाण्याऐवजी ज्यूस प्यायल्याने एकूणच जास्त कॅलरी खर्च होऊ शकतात. फळे आणि फळांचे रस दोन्ही आरोग्यासाठी चांगलं आहे. पण, फळं खाणं हा चांगला पर्याय आहे. तसेच, जर तुम्हाला फळांचा रस प्यायचा असेल तर तो ताजा प्यावा.
महत्त्वाच्या बातम्या :
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.