Health Tips : डेंग्यूमुळे हिमोग्लोबिनची पातळी कमी झालीय? शरीरात लोहाची कमतरता भरून काढण्यासाठी 'हे' पदार्थ खा
Health Tips : डेंग्यूमुळे अनेकदा शरीरात प्लेटलेट्सची कमतरता जाणवते. अशा परिस्थितीत प्लेटलेट्सच्या कमतरतेमुळे हिमोग्लोबिनची पातळी देखील कमी होऊ शकते.
Health Tips : आजकाल डेंग्यूच्या (Dengue) रूग्णांची संख्या झपाट्याने वाढतेय. अलीकडच्या काळात देशाच्या विविध भागांत डेंग्यूच्या अनेक केसेस सातत्याने समोर येत आहेत. डेंग्यू हा एक गंभीर आजार आहे, जो डासांच्या चाव्याव्दारे पसरतो. डेंग्यूमुळे अनेकदा शरीरात प्लेटलेट्सची कमतरता जाणवते. अशा परिस्थितीत प्लेटलेट्सच्या कमतरतेमुळे हिमोग्लोबिनची पातळी देखील कमी होऊ शकते.
जर आपल्या शरीरातील हिमोग्लोबिनची पातळी कमी झाली तर शरीराच्या अवयवांना पुरेसा ऑक्सिजन मिळणे कठीण होतं. याचा थेट परिणाम आपल्या आरोग्यावर होतो आणि त्यामुळे थकवा, चक्कर येणे, डोकेदुखी, श्वास घेण्यास त्रास होणे, त्वचा पिवळी पडणे इत्यादी समस्या उद्भवू शकतात. हिमोग्लोबिनच्या कमतरतेमुळे अॅनिमिया होतो. अशा परिस्थितीत हिमोग्लोबिन सुधारण्यासाठी तुम्ही तुमच्या आहारात बदल करणं गरजेचं आहे. शरीरात हिमोग्लोबिन वाढवणारे पदार्थ नेमके कोणते याविषयी जाणून घेऊयात.
व्हिटॅमिन सी समृद्ध अन्न
शरीरातील लोहाची कमतरता पूर्ण करण्यासाठी व्हिटॅमिन सी खूप उपयुक्त आहे. तुम्ही तुमच्या आहारात व्हिटॅमिन सी समृद्ध संत्री, लिंबू, शिमला मिरची, टोमॅटो, द्राक्षे, बेरी इत्यादींचा समावेश करू शकता.
लोहयुक्त पदार्थ
नॅशनल अॅनिमिया अॅक्शन कौन्सिलच्या मते, लोहाची कमतरता हे हिमोग्लोबिनची पातळी कमी होण्याचे मुख्य कारण आहे. अशा परिस्थितीत तुम्ही लोहयुक्त हिरव्या पालेभाज्या, पालक, अंडी, संपूर्ण धान्य, कडधान्ये आणि बीन्स, मांस, मासे, ड्रायफ्रूट्स इत्यादींचा तुमच्या आहारात समावेश करू शकता.
फॉलिक ऍसिडचे सेवन
फॉलिक ऍसिड हे बी कॉम्प्लेक्स जीवनसत्व आहे, जे आपल्या शरीरात लाल रक्तपेशी तयार करण्यात महत्त्वाची भूमिका बजावते. फॉलिक अॅसिडच्या कमतरतेमुळे हिमोग्लोबिनच्या पातळीवरही परिणाम होतो. अशा परिस्थितीत शक्य तितक्या हिरव्या पालेभाज्या, मोड आलेले कडधान्य, शेंगदाणे, केळी, ब्रोकोली इत्यादींचे सेवन करा.
बीटचे सेवन करा
बीट तुमची हिमोग्लोबिन पातळी वाढविण्यास तसेच लाल रक्तपेशी सक्रिय करण्यात मदत करते. यामध्ये लोह मुबलक प्रमाणात असते. तुम्ही ते सॅलडमध्ये किंवा भाजी म्हणून घेऊ शकता. याचे सेवन तुम्ही ज्यूसच्या स्वरूपातही करू शकता.
डाळिंबाचा रस
डाळिंब हे प्रथिने, कार्बोहायड्रेट्स आणि फायबर तसेच कॅल्शियम आणि लोहाचा चांगला स्रोत आहे. हिमोग्लोबिन वाढवायचे असेल तर रोज एक ग्लास डाळिंबाचा रस प्या. किंवा फ्रूट सॅलड आणि रायत्याच्या स्वरूपात सेवन करा.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.
महत्त्वाच्या बातम्या :