Father's Day 2024 :'आईच्या प्रेमासाठी आसुसलेल्या 5 भावंडांसाठी वडिलांनी असं काही केलं..! 'फादर्स डे' ची सुरूवात 'अशी' झाली, जाणून घ्या महत्त्व
Father's Day 2024 : दरवर्षी जून महिन्याच्या तिसऱ्या रविवारी जगभरात 'फादर्स डे' साजरा केला जातो, पण त्याची सुरूवात कधी आणि कुठे झाली? हे तुम्हाला माहिती आहे का?
Father's Day 2024 : मुलांच्या जीवनात वडिलांचे महत्त्व हे खूप मोठं आहे. वडिलांचे ऋण फेडण्यासाठी आयुष्यही कमी पडेल, वडिलांच्या प्रेमाबद्दल आणि त्यागाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी दरवर्षी जूनच्या तिसऱ्या रविवारी फादर्स डे साजरा केला जातो. पण फादर्स डे ची सुरुवात कशी झाली? हे माहित आहे का तुम्हाला, नसेल तर आम्ही आज सांगणार आहोत, जागतिक पितृदिन हा दिवस कधी आणि कसा सुरू झाला? त्याचे महत्त्व काय आहे? या दिवसाशी संबंधित काही खास गोष्टी जाणून घेऊया.
'फादर्स डे' का साजरा केला जातो?
अमेरिका वॉशिंग्टन येथे राहणाऱ्या सोनोरा स्मार्ट डॉड यांच्याकडून प्रथम फादर्स डे साजरा करण्यात आला. सोनोराला आई नव्हती आणि तिच्या वडिलांनीच सोनोरासह इतर पाच भावंडांना आई आणि वडील दोघांचे प्रेम दिले. सोनोराने आपल्या वडिलांबद्दलचे प्रेम आणि आपुलकी व्यक्त करण्यासाठी हा दिवस साजरा करण्यास सुरुवात केली, आईचे मुलांवर प्रेम, त्याग आणि समर्पणाबाबत कृतज्ञता व्यक्त केला जाणारा दिवस म्हणजे 'मदर्स डे',त्याचप्रमाणे फादर्स डे सुद्धा साजरा झाला पाहिजे, अशी कल्पना सोनोराने व्यक्त केली होती.
...आणि पहिला 'फादर्स डे' साजरा करण्यात आला
सोनोराला पहिल्यांदा वाटलं की, तिच्या आईप्रमाणेच तिच्या वडिलांसाठीही एक दिवस तरी असायला हवा. सोनोराच्या वडिलांचा वाढदिवस जूनमध्ये झाला. त्यावेळी सोनोराने जूनमध्ये हा फादर्स डे साजरा करण्यासाठी याचिका न्यायालयात दाखल केली आणि लोकांमध्ये याबाबत जागरूकता वाढवण्यासाठी अनेक शिबिरंही आयोजित केली. अखेर तिची मागणी पूर्ण झाली आणि पहिला 'फादर्स डे' 19 जून 1910 रोजी साजरा करण्यात आला. 1966 मध्ये, राष्ट्राध्यक्ष लिंडन जॉन्सन यांनी फादर्स डे जूनच्या तिसऱ्या रविवारी साजरा करण्याची घोषणा केली. नंतर ते संपूर्ण युनायटेड स्टेट्समध्ये हा दिवस साजरा करण्यात आला, तसेच 1972 मध्ये तर या दिवशी सुट्टीही घोषित करण्यात आल्याचं इतिहासात म्हटलंय.
फादर्स डे चे महत्व
आई-वडिलांचे प्रेम आणि त्याग शब्दात व्यक्त करणे किंवा त्याची परतफेड करणे कोणालाही शक्य नाही. अशा परिस्थितीत वडिलांच्या समर्पण आणि प्रेमाबद्दल आदर आणि आनंद व्यक्त करण्याचा दिवस म्हणजे 'फादर्स डे'. या निमित्ताने वडिलांच्या चेहऱ्यावर हसू आणण्यासाठी लोक आपापल्या परीने प्रयत्न करतात. अशा परिस्थितीत, त्यांना भेटवस्तू देऊन, त्यांच्यासोबत वेळ घालवून आणि जीवनात वडिलांचे महत्त्व लक्षात आणून देऊन हा दिवस जगभरात साजरा केला जातो.
हेही वाचा>>>
Father's Day 2024 : आजपर्यंत तुमच्या इच्छा वडिलांनी पूर्ण केल्या, आता तुमची वेळ! फादर्स डे बनवा खास, या ठिकाणांना भेट द्या
(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )